शिवाजी कॉलेज सातारा येथे नागरिकांसाठी वैद्यकिय प्रमाणपत्र उपलब्ध होणार जिल्हा रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन

 

            सातारा दि. 6 (जिमाका) : क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे आज दि. 6 मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास अंदाजे 800 ते 1000 नागरीकांनी त्यांच्या स्वतःच्या गावी जाण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकिय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी केली. या घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अमोद गडीकर, अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, प्रशासकीय अधिकारी डॉ.सुधीर बक्षी,  डॉ.रामचंद्र जाधव, डॉ.सुनिल सोनावणे यांच्यासह सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांच्या मदतीने सोशल डिस्टेन्स पाळण्याबाबत व गर्दी कमी करण्याबाबत सर्वांना आवाहन करण्यात आले.  

            या नागरीकांची तपासणी करण्याकरीता रुग्णालयातील आयुष विभागात 8 तपासणी टेबल लावण्यात आले होते. आज दिवसभारात  एकूण ८४८ प्रमाणपत्र  वितरीत करण्यात आली आहेत. उद्या दि. 7 मे पासुन  ही व्यवस्था शिवाजी कॉलेज सातारा येथे होणार आहे.  त्यामुळे नागरिकांनी जिल्हा रुग्णालयामध्ये गर्दी करु नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी  केले. तसेच नजीकच्या खाजगी वैद्यकीय व्यवसायीक यांच्याकडून सुध्दा असे वैद्ययिक प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.

            जिल्हाधिकारी  शेखर सिंह व  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर व IMA असोसिएशनचे अधिकारी यांनी  खाजगी व्यवसायिकांना वैद्यकिय प्रमाणपत्र देण्याबाबत आवाहन केले आहे.  गरजूंनी आपल्या कार्यक्षेत्रातील जवळच्या डॉक्टरांकडुन वैद्यकिय प्रमाणपत्र घ्यावे जेणेकरुन जिल्हा रुग्णालय प्रशासनावर अतिरिक्त ताण होणार नाही.           

दिलेल्या वेळेतच नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन

              स्वतःच्या गावी जाण्यासाठी एकूण चार हजार नागरिकांचे बॅचेस तयार करण्यात आले आहेत.  या नागरिकांना तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत मोबाईलद्वारे कळविण्यात आले आहे.  दिलेल्या वेळेनुसार नागरिकांनी आरोग्य तपासणीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!