सातारा दि. 6 ( जि. मा. का ): जावली तालुक्यात 27 गावांसह मेढा नगरपंचायतीमध्ये क्रिमीनल प्रोसीजर कोडचे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश 26 एप्रिल रोजी जारी केले होते. आता या मनाई आदेशातील तरतूदी फक्त म्हाते मुरा व म्हाते खुर्द या दोन गावांसाठीच लागू राहणार असून इतर गावांना लागू राहणार नाहीत, अशी माहिती सातारा उपविभागीय अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर, मिनाज मुल्ला यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यापूर्वी जावली तालुक्यातील धनकवडी, निझरे, करंदी त.मेढा, मालचौंडी, सायळी, काळोशी, कसुंबी, गांजे, मोहाट, पिंपरी त मेढा, जवळवाडी, म्हाते खुर्द, म्हाते बु., वागदरे, गोंदेमाळ, गाळदेव, निपाणी मुरा, करंजे, चोरांबे, मामुर्डी, गवडी, आंबेघर त.मेढा, आसणी, केळघर, नांदगणे, सांगवी त. मेढा, सावली ही गावे व मेढा नगर पंचायतीमध्ये मनाई आदेश लागू करण्यात आले होते. आत्तापर्यंत निझरे गावामध्ये 4 व म्हातेमुरा गावामध्ये 2 असे एकूण 6 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. निझरे व म्हातेमुरा व 3 कि.मी परिसरामध्ये कंटेनमेंट झोन लागू करण्यात आलेला आहे. जावली तालुक्यातील या सर्व कोरोना बाधित 6 व्यक्तींचा 14 व 15 व्या दिवसानंतरचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने व निझरे गावचा कंटेनमेंट झोन रद्द करण्याबाबत तसेच म्हातेमुरा व म्हाते खुर्द कंटेनमेंट झोन सुरु करुन 14 दिवसाचा कालावधी झाला असल्याने अजून काही दिवस सुरु ठेवणे आवश्यक असल्याचे जावली तहसीलदार यांनी नमुद केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कंटेनमेंट झोनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मौजे निझरे हे गाव केंद्रस्थानी धरुन 3 किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषीत केलेला आदेश रद्द करण्यात आलेला आहे.
दि. 7 मे पासून पुढील आदेशापर्यंत जावली तालुक्यातील 27 गावे व मेढा नगर पंचायत वगळता म्हाते मुरा व म्हाते खुर्द या दोनच गावांसाठी क्रिमीनल प्रोसीजर कोड चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत. इतर गावांना हे आदेश लागू राहणार नाहीत. जिल्हाधिकारी सातारा यांचे 5 मे रोजीच्या आदेशातील सर्व मार्गदर्शक सूचना व अटी यापूढेही लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.