महिमंडणगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोर्यातला एक सातवाहनकालीन किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये असला तरी कोयना धरणाच्या पसार्यामुळे तिथे जाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गावातून जावे लागते.
मुंबई-गोवा महामार्गावरच्या खेडजवळच्या भरणे नाक्यानंतर जगबुडी नदीवरचा पूल ओलांडला की चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव-खोपीचा फाटा लागतो. खोपी गावातून रघुवीर नावाच्या वळणावळणाच्या मोटारेबल घाटातून गेल्यावर मेटशिंदी गाव लागते. खोपी ते मेटशिंदी हा अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे. मेटशिंदी हे घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवरचे गाव आहे. गावातून अर्ध्या-पाऊण तासाच्या चढाईनंतर घाटमाथ्यावर एक जोडशिखरांच्या मधली खिंड लागते. या खिंडीच्या उजव्या बाजूला महिमंडणगड आहे.
खिंडीपाशी महिमंडणगडचा ताशीव कडा कोकणात कोसळताना दिसतो, तर तिकडे दूर वासोटा, नागेश्वरचा सुळका आणि झाडीभरले डोंगर दिसतात. या डोंगरांच्या पिछाडीला असलेले कोयना धरणाचे बॅक-वॉटर मात्र आपल्याला दिसू शकत नाही.
खिंडीच्या दक्षिण बाजूने एक वळसा मारल्यावर गडाचा माथा लागतो. थोडेसे पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याची कोरीव टाक्यांची एक मालिकाच लागते. एका टाक्यावर काही कोरीव काम, आणि कोण्या देवीचे मूर्तिकाम आहे.
शिवाजीच्या काळात या गडाने नेमकी काय भूमिका बजावली असेल याचा थांगपत्ता लागत नाही. पण बहुधा येथील घाटांवर आणि प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाची योजना असावी असे वाटते.