सातारा जिल्यातील पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
या गडाचा इतिहास पाहिला असता दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. गडावर शिवाजी महाराजस्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
या गडावर गेले असता पाहण्यासाठी खूप जुन्या वास्तू मिळतात तसेच इतिहासाची उजली होते
पश्चिम तटावरील भग्न दरवाज्याशेजारी सहा फूट उंचीची गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्तीशेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची हनुमंताची मूर्तीही आहे. हा सर्व परिसर पाहून परत पायर्यांच्या मार्गाने वर गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. तिच्या पायर्यांनी खाली तळाकडे गेल्यानंतर पाण्याच्या थोडे अलीकडे डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे देऊळ लागते. या छोट्या मंदिरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. ही विहीर पाहून परत वर येऊन गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात ८-१० फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.