पुण [फलटण टुडे वृत्तसेवा] :- बारामाती ८ रुग्ण होते त्यातील ७ रूग्ण कोरोनामुक्त झाले होते.पण शहरामधील जो कोरोना रुग्ण होता त्या एका ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता बारामती ‘कोरोनामुक्त’ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बारामतीमध्ये एकही अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण नाही, यामुळे बारामती पॅटर्न यशस्वी झाल्याचे चित्र आहे. शहरात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर ८ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले होते.
बारामतीत कोरोनाचा प्रवेश होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात राजस्थानातील ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर शहरात ‘बारामती पॅटर्न’ राबविण्यात आला आणि त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली. बारामती पॅटर्नमुळे अवघ्या महिन्याभरात शहर कोरानामुक्त झाले.मागील महिनाभरापासून बारामतीकरांचा कोरोनाशी मुकाबला सुरू होता. त्याला आता यश आल्याचे दिसून येत आहे. बारामती शहरातील श्रीरामनगर येथे पहिला रुग्ण आढळून आला होता. तो रुग्ण उपचारानंतर बरा झाला. त्यानंतर समर्थनगर भागातील भाजी विक्रेत्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील मुलगा-सून व दोन नाती यांना ही कोरोना झाल्याचे आढळून आले. भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला मात्र त्याच्या कुटुंबातील चौघांनी कोरोना वर यशस्वी मात केली. यामध्ये एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. त्यानंतर शहरातील म्हाडा वसाहतीतील एका जेष्ठाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. परंतु या ज्येष्ठानेही कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे बारामती शहर कोरोनामुक्त झाले आहे