साठोत्तरी महाराष्ट्र कुठे चाललाय?

आज आपल्या पुनर्निमित संयुक्त महाराष्ट्राला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. हिरक महोत्सव पूर्ण करणारा आपला महाराष्ट्र नेमका कोणत्या दिशेने चालल ाय याचा मागोवा, आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. या नवमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आरुढ झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या अपेक्षा खुल्या मनाने, या महाराष्ट्राच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांच्या उपस्थितीत सांगितले होत्या की, ‘‘महाराष्ट्राचे हे जे राज्य निर्माण झाले आहे ते मराठी जनतेच्या कल्याणाचे काम तर करीलच, शिवाय मराठी भाषिकांच्या जवळ जे देण्यासारखे आहे, त्यांच्या जीवनामध्ये जे चांगले आहे, जे उदात्त आहे, त्याचा त्याग जर करावयाचा असेल तर तो आम्ही भारतासाठी प्रथम करु, कारण आमचा हा पहिल्यापासून विश्‍वास आहे की, भारत राहिला तर महाराष्ट्र राहिल, भारत मोठा झाला तर महाराष्ट्र मोठा होईल.’’ याबरोबरच महाराष्ट्राच्या सर्व विभागाची समान विकास धोरणाने प्रगती करु, मराठी भाषा विकासासाठी स्वतंत्र भाषा विभाग संचालनालय, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून धर्मांतर करुन बौद्ध झालेल्यांना हरिजनांप्रमाणेच सर्व सुविधा चालू राहतील, आणि महार वतनाची समाप्ती हे तीन क्रांतिकारी निर्णय घेतले. 
यशवंतरावांनी हे मराठी राज्य भारत देशात अव्वल दर्जाचे व्हावे यासाठी उद्योग, ग्रामविकास, कायदा व सुव्यवस्था, कृषि, सहकार, जलसंपदा (पाटबंधारे), शिक्षण, रोजगार हमी, सामाजिक न्याय, मराठी भाषा व साहित्य संस्कृती अशा विविध क्षेत्रात मूलभूत विकासाचे व दूरदृष्टीचे धोरण अवलंबले म्हणूनच त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ असे म्हटले गेले. 
पण पुढे राजकारण बदलले, यशवंतराव दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून गेले (1962) ते तिथेच राहिले (1984). हळूहळू त्यांचा जम दिल्लीत बसला, पण इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर काँग्रेसपक्षातील राजकारण, महाराष्ट्रात यशवंतरावांना समांतर अशा अन्य काँग्रेस नेत्यांना जवळ करुन पाठिंबा अशा अनेक राजकीय कारवायांमुळे यशवंतराव शेवटी शेवटी विचलित झाले, निराश झाले. तिथून खर्‍या अर्थाने आधुनिक महाराष्ट्राच्या विकासालाही थोडे ग्रहण लागल्यासारखे झाले. त्यांच्या काळातला महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्‍न तसाच अनिर्णित राहिला. काँग्रेस नेतृत्त्वात फाटाफूट झाली. त्यांच्यानंतर मारोतराव कन्नमराव, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए.आर.अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर पाटील, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. पण त्यातील वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, शरद पवार यांच्याच कारकीर्दी ठळक झाल्या. 
आज लौकीक अर्थाने आकडेवाडीनुसार महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे असे दिसते. सर्व क्षेत्रात भौतिक प्रगती आहे, पण अजूनही विभागवार प्रगतीचा विसंवादही दिसून येतो. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे पश्‍चिम महाराष्ट्र जवळपास सर्वच क्षेत्रात आघाडीवर गेला पण त्या गतीने विदर्भ, मराठवाडा, कोकण अजूनही मोठ्या विकास क्षेत्राच्या प्रभावाखाली नाही. यशवंतराव ते सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रवासात महाराष्ट्राचा हुकमी नेता या पदावर अजूनतरी राजकीय प्रभावाचे यशवंतराव, वसंतदादा व शरद पवार ही तीनच नावे पुढे येतात आणि ही सारी पश्‍चिम महाराष्ट्राची आहेत. परंतु मुख्यमंत्रीपदावर नसूनसुद्धा ‘मासलीडर’ (समाजनेता) होण्याचे भाग्य शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच जाते हे विशेष आहे. 
आजच्या महाराष्ट्रात शिक्षण, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, संगणक शिक्षण, अत्यंत आधुनिक पद्धतीने सार्वजनिक झाले, पण त्याच गतीने लोकसंख्या वाढीमुळे मनुष्यबळाच्या विकासाच्या नेमक्या अनियोजनामुळे प्रचंड वाढलेली बेरोजगारी हे 60 वर्षातले ठळक अपयश आहे. तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात (78 तालुके) कायमस्वरुपी पारंपारिक दुष्काळ अजूनही आहे. कोयना, जायकवाडी, धोम अशी नाव घेण्यासारखी मोठी धरणे दुष्काळी भागात विशेषत: विदर्भात झाली नाहीत. हेही 60 वर्षातल्या शेती व पाण्याचे नीट नियोजन न झाल्यामुळेच आहे. 
एकसंघ विचाराच्या काँग्रेस शिवाय अनेक प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात निघाले. यामुळे महाराष्ट्राची दिल्लीतली राजकीय ताकदही विभागली गेली. हेही अपयशच आहे, युती किंवा आघाडीशिवाय पूर्वीप्रमाणे एकसंघ एका पक्षाची राजवट आता हिरकमहोत्सवी महाराष्ट्राच्या नशिबी नाही. विकासाबाबत यशवंतरावांच्याच पंचायत राज धोरणांमुळे खेड्यापाड्यातून नवं नेतृत्त्व पुढे येत गेले. आता तर ते इतके विस्तारले आहे की, गल्लीबोळातसुद्धा ‘फलकी’ (बॅनर) नेतृत्त्वाचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे ‘नेता’ हा शब्द आता ध्येयवादी, गौरवाचा असा राहीला नाही. 
असे असले तरी महाराष्ट्राचा संस्थात्मक विकास सर्व क्षेत्रात झाला आहे हे निर्विवाद आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी दाखवलेली दूरदृष्टी नंतरच्या मुख्यमंत्र्यांत दिसून आली नाही; एक दोन अपवाद सोडले तर. या 60 वर्षात अनेक नैसर्गिक संकटे महाराष्ट्रावर आली. महापूर, वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, भूकंप, साथीचे रोग, जातीय दंगली, त्यातून झालेले बॉम्बस्फोट, सामाजिक विषमतेचे बळी, आरक्षणाची आंदोलने, कायमपणे चालणारी शेतीविषयक आंदोलने अशा अनेक संकटातूनसुद्धा महाराष्ट्राने एकजूट दाखवत या प्रसंगांना तोंड दिले आहे. 
शेवटचा मुद्दा :
देशाप्रमाणेच महाराष्ट्रावर ‘कोरोना’ विषाणूची गंभीर जीवघेणी साथ आज आहे. या रोगावर अजूनि औषध नाही, प्रतिबंधात्मक लस नाही. सार्‍या जगालाच या ‘विषाणू’ ने अजगरासारखा विळखा घातला आहे. धर्म, पंथ, जाती, काळा, गोरा, श्रीमंत, गरीब या सर्वांमध्ये भेदभाव न करता या ‘विषाणू’मुळे भयानक प्रसार वाढतच आहे. देश आणि महाराष्ट्र यामुळे चिंतेत आहे. सर्व क्षेत्रात अव्वल असणारा महाराष्ट्र या भीषण साथीच्या प्रसारातसुद्धा देशात पहिल्या क्रमांकावर आहे हे हिरकमहोत्सवातील दुर्दैव आहे. पण याही संकटात उभा महाराष्ट्र मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या व प्रशासनाच्या पाठीशी आहे. या संकटामुळे मराठी माणसाला महाराष्ट्राचा हा आनंदी हिरकमहोत्सवी वर्धापनदिन (1 मे) घरात राहूनच साजरा करावा लागतोय. सर्व मराठी माणसाची याबाबत एकजूट आहे. ‘राकट देशा, कणखर देशा’ असे वर्णन असलेला महाराष्ट्र या अतिशय भीषण अशा ‘कोरोना’शी युद्ध करण्यासाठी एकजुटीने सज्ज आहे. घराबाहेर न जाणे, घरातच थांबणे, अत्यावश्यक कामासाठी बाहेर गेलोच तर शारिरिक अंतर राखणे, गर्दी न करणे, घराबाहेर चेहर्‍यावर मास्क (मुखपट्टी) घालणे, सतत साबणाने हात धुणे, घरात निर्जंतुके वापरणे यातूनच मराठी माणूस या ‘कोरोना’ला महाराष्ट्रातून कायमचा ‘चले जाव’ करणार आहे आणि हीच हिरकमहोत्सवाची शुभेच्छा आहे. 
****
रविंद्र बेडकिहाळ,
संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी.
9422400321.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!