सातारा दि. 1 (जि.मा.का.): महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणा प्रसंगी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्यांच्या विचारातूनच महाराष्ट्र राज्य प्रगतीची वाटचाल करीत आहे, असे सांगून सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर आर्थिक ताण येत आहे. कोरानाला हद्दपार करण्यासाठी कुणीही आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून समाजामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे हाच उपाय आहे. समाजामध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध केले आहेत या निर्बंधाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहनही त्यांनी केले.
कामगारांबद्दल अत्मीयता असणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. कामगारांनी प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे त्यांचा महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मोठा सहभाग आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व पर राज्यातील कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज जरी वाईट दिवस असले तरी भविष्यात कामगारांना चांगले दिवस येतील. कामागारांनी चांगले काम करण्याच्या दृष्टीने दक्ष रहावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या शेवटी शुभेच्छा दिल्या.