खरीप हंगाम बैठक संपन्न खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्या – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा दि. 29 : खरीप हंगाम 2020 मध्ये खतांचा व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी. तसेच खतांच्या व बियाणांच्या बाबतीत कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहत संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी खरीप हंगाम 2020 च्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. सातारा जिल्ह्यास माहे मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीसाठी एकूण 1 लाख 2 हजार 923 मे. टन रासायनिक खतांचे आवंटन मजूर केले असल्याचेही श्री. झेंडे यांनी या बैठकीत सांगितले

खतांचा व बियाणांचा पुरवठा करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्याची खातरजमा करावी यासाठी योग्य खबरदारी घ्यावी. गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी कृषी विभागाने स्थापन केलेल्या भरारी पथकामार्फत 100 टक्के कृषी सेवा केंद्रांची तपासणी करावी व निकषानुसार काम न करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी वीज कनेक्शन उपलब्ध करुन द्यावेत. कोविड विषाणू संक्रमण कालावधीत शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन खरीप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

भात उत्पादक पट्टयात युरिया ब्रिकेटचा वापर केल्यामुळे भात उत्पादनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे भात उत्पादक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांनी केल्या.

सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत जास्तीत जासत शेतकऱ्यांना सहभागी करुन घेवून त्यांना अनुदानाचा लाभ द्यावा. पारंपारिक सिंचन पद्धतीपेक्षा सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली आणता येईल तसेच पाण्याचीही बचत होईल, असे आमदार जयकुमार गोरे यांनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!