फलटण : विरोधात बातमी का दिली? याचा राग मनात धरुन बुध ता.खटाव येथील पत्रकार प्रकाश प्रल्हादराव राजेघाटगे यांना घरात जाऊन मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचेवतीने जाहीर निषेध करण्यात आला असून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बरडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन संचारबंदी असताना विनापरवाना तळेगाव दाभाडे (पुणे) येथून बुध येथे असलेल्या नातेवाईकांकडे आलेल्या इक्बाल कादर शेख व सलमा इक्बाल शेख यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबतची बातमी प्रकाश राजेघाटगे यांनी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली होती.
याचा राग मनात धरून बुध येथील संबंधित कुटुंबाचे नातेवाईक आमीर शमशुद्दीन शेख व त्याचा भाऊ जहांगीर शमशुद्दीन शेख यांनी पत्रकार प्रकाश राजे घाटगे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली याचा फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचेवतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत संबंधितांवर कडक कारवाई करावी यासाठी आज ( सोमवार दि. २७ एप्रिल) रोजी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बरडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे पुणे विभागीय संपर्क प्रमुख श्रीरंग पवार, सातारा जिल्हा अध्यक्ष विनायक शिंदे, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य स.रा.मोहिते, सुर्यकांत निंबाळकर, तानाजी भंडलकर, प्रदीप चव्हाण, अशोक सस्ते, अजय निगडे उपस्थित होते. निवेदनावर फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या सह्य़ा आहेत.