फलटण दि.१९ : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन/प्रशासनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपाय योजनांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठींबा लाभत असल्याने तरडगाव येथील एक घटना वगळता तालुका अद्याप कोरोना मुक्त राखण्यात यश आले आहे, त्या पार्श्वभूमीवर श्रीराम सहकारी साखर कारखान्याने नागरिकांना दर्जेदार हॅण्ड सॅनिटायझर सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी दिली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे हॅण्ड सॅनिटायझर सवलतीच्या दरात उपलब्ध
शहर व तालुक्यातील नागरिक, शेतकरी, दूध उत्पादक, व्यापारी, विद्यार्थी, अधिकारी/कर्मचारी वगैरे सर्व समाज घटकांसाठी सद्यस्थितीत असलेली सॅनिटायझरची गरज ओळखून मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), मा.आ.दिपकराव चव्हाण, मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या सुचने नुसार श्रीराम कारखाना अर्कशाळेद्वारे सॅनिटायझर उत्पादन करणेबाबत योजना प्रत्यक्षात आणल्याचे मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.
दररोज सुमारे २ हजार लिटर सॅनिटायझर उत्पादन करण्यात येत असून ५ लिटर, १ लिटर, अर्धा लिटर पॅक मध्ये सदर सॅनिटायझर सुनिल मेडिकल्स व अन्य औषध विक्रेत्यांमार्फत सर्वांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आले असून शहर व तालुक्यातील सर्व समाज घटकांनी त्याचा लाभ घ्यावा, कोणत्याही परिस्थितीत आवश्यकते शिवाय घराबाहेर पडू नये, बाहेर पडणे आवश्यक असेल तर मास्क वापरावा तसेच सतत हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी केले आहे.
अर्कशाळा चालविणारे मे.वाळवेकर ब्रदर्स अँण्ड कंपनीचे मालक मा.श्री.किरण वाळवेकर, मा.श्री.मनोज वाळवेकर यांनी सदर सॅनिटायझर श्रीराम कारखाना सभासद, कामगार व अन्य समाज घटकासाठी सवलतीच्या दरात रविवार दि.१९ एप्रिल पासून फलटण मधील मेडिकल स्टोअर्स मध्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करुन दिले असल्याची माहीती श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन भोसले यांनी दिली आहे.