फलटण , दि.8: कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या आवारातील कॅन्टीनमध्ये गरीब, गरजू व्यक्तींना केवळ 5 रुपयांमध्ये शासनाची शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येत असून गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणूसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड, फलटण येथे गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यास बाजार समिती उत्सुक असून डिसेंबर 2019 मध्ये दाखल केलेल्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी सूचना बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक -निंबाळकर यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना केल्यानंतर प्रशासनाने सदर प्रस्ताव तातडीने मंजूर केल्याने बाजार समिती आवारात शिवभोजन थाळी उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक -निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली काम करीत असताना, बाजार समितीच्या आवारात शेतमाल विक्रीसाठी येणार्या शेतकर्यांना मालोजी शिदोरी या उपक्रमांतर्गत केवळ 12 रुपयांमध्ये जेवण गेल्या अडीच वर्षापासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्याचप्रमाणे विविध नाविन्यपूर्ण व विधायक उपक्रम राबविण्याचे निर्णय बाजार समिती संचालक मंडळाने घेतले असल्याची माहिती समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर यांनी दिली.
बाजार समिती आवरामध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणारा शेतकरी व अन्य गरीब अन्नापासून वंचीत राहणार नाही याबाबत सर्वतोपरी दक्षता घेणेच्या सूचना श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या असल्याचे निदर्शनास आणून देत या पार्श्वभूमीवर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात आली आहे. शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक भाजी, वरण, एक मुद भाताचा समावेश करणेत आला असल्याचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी सांगितले.
कोरोना विषाणू (कोविड 19) बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाजार समितीच्या आवारातील अन्नपूर्णा शेतकरी कॅन्टीनमध्ये काम करणार्या लोकांसाठी मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात आले आहेत. कॅन्टीनमध्ये हात धुण्यासाठी हँडवाश व बेसिनला मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. रोजच्या रोज कॅन्टीनची स्वच्छता करण्यात येत असल्याचे सोनवलकर यांनी सांगितले.
सुरक्षीत अंतर ठेऊन सवलतीच्या दरातील शिवभोजन थाळीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे यांनी केले आहे.