फलटण, दि. 31 : कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर देशात महाराष्ट्र राज्यात लाॅकडाऊन झाले व सर्व उद्योग व्यवसाय बंद झाले आहेत. कोरोना (कोविड-19) हा संसर्गजन्य आजार संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्याकडे झपाट्याने पसरत असून या आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे होताना दिसत नसल्याचे नमूद करत या आजाराचे गांभीर्य ओळखून सातारा जिल्ह्यातील जनतेने अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.
आपला देश खूप कठीण परिस्थितीतून जात असून कोरोना विरुद्धच्या लढ्यातील तिसरा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे, या टप्यातच खरी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, मात्र सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या भागातील गल्ली बोळासह मुख्य रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नाही शहरी भागातही लोक एकत्र जमत आहेत तर काही लोक विनाकारण फिरताना दिसत असल्याचे निदर्शनास आणून देत हे टाळण्याची नितांत आवश्यकता असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनासह सर्वच तालुक्यातील प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू, औषधे, किराणा, भाजीपाला, फळे या जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या आहेत, काही वस्तू घरपोहोच उपलब्ध होत आहेत तर काही बाबतीत गर्दी टाळून खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याबाबत आपण स्वतः प्रशासनाच्या संपर्कात असून योग्य त्या सूचना केल्या असल्याचे नमूद करीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी जिल्हावासीयांना केले आहे.
अजून वेळ गेलेली नाही, सर्व ठिकाणची गर्दी पूर्णपणे थांबवून मीच माझा रक्षक या न्यायाने आपण सर्वजण सतर्क राहु आणि कोरोनाची भयानक साथ आटोक्यात आणू, त्यावर नियंत्रण आणू असा विश्वास व्यक्त करीत अशा कठीण व महत्वाच्या प्रसंगात आम्ही सर्व तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही श्रीमंत रामराजे यांनी दिली आहे.
हा टप्पा सर्वात महत्वाचा व घातक असल्याचे स्पष्ट करीत सातारा जिल्ह्यातील सर्व जनतेने जिद्द, संयम, धैर्य दाखवावे असे आवाहन श्रीमंत रामराजे यांनी केले आहे.