फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय, फलटण मराठी विभागाच्या वतीने दि. 22 फेब्रुवारी 2020 रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे आणि मातृभाषेचे जतन व संरक्षण करण्याच्या हेतूने संपूर्ण देशभर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन स्तरावर प्रबोधनात्मक व्याख्याने, वक्तृत्व, वाद-विवाद व प्रश्नमंजुषा स्पर्धा इ. उपक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित असते. सदर उपक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयात ‘भारतीय भाषांची सांस्कृतिक विविधता’ या विषयावर मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर पवार यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. या विषयावर प्रमुख वक्ता म्हणून बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले की मानवी जीवनामध्ये मातृभाषेचे स्थान आई इतकेच महान असते. मातृभाषा ही संस्काराची व जीवनाच्या जडणघडण आणि व्यक्तिमत्त्व विकासाची भाषा आहे. या भाषेतून होणारे आकलन इतर भाषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास व ज्ञानाच्या कक्षा विस्तृत कराव्यात. यावेळी बोलताना डाॅ. प्रभाकर पवार पुढे म्हणाले की जागतिक स्तरावर प्लेटो, ऍरिस्टॉटल, हेगेल, मार्क्स यांचे वैचारिक साहित्य संस्कारशील आहे. भारतीय भाषांमधील साहित्यामध्ये कबीर, तुलसीदास व प्रेमचंद यांचे साहित्य अनेक स्थित्यंतराची प्रेरणा व आदर्श घेऊन निर्माण झालेले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी बोलीभाषा बरोबर प्रमाणभाषा यांच्याकडेही लक्ष देऊन ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अरुण गायकवाड म्हणाले मातृभाषेचे जीवनातील स्थान महत्त्वपूर्ण आहे. मातृभाषेतील अभिव्यक्ती नैसर्गिक आणि प्रभावी असते. मातृभाषेचा सन्मान आणि अभिमान विद्यार्थ्यांनी बाळगला पाहिजे व आपली शैक्षणिक व सामाजिक प्रगती साधली पाहिजे.
कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विविध शाखांतील प्राध्यापक प्राध्यापिका व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कु. उषा मदने हिने आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.