फलटण : भारतीय पत्रकारितेला फार मोठा इतिहास असला तरीही तीन – चार हजार लोकसंख्या असलेल्या अनेक गावांमध्ये आजही फार कमी वर्तमानपत्रे पोहचली आहेत. ग्रामीण भागात जर विकासात्मक आणि सकारात्मक पत्रकारिता केली तर वृत्तपत्रांना त्याठिकाणी अजूनही विस्तारण्याची संधी आहे. सोशलमिडीयामुळे समाजाचा सेतू खूप मोठा विस्तारला आणि पत्रकारितेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पण त्या आव्हानांना संधीमध्ये रुपांतरीत करण्यातही पत्रकार यशस्वी झाले आहेत. आजचा काळ हा पत्रकारितेतील फार मोठा संक्रमणाचा काळ आहे. त्यामुळे या बदलत्या काळात पत्रकारांनी आता स्मार्ट फोन जर्नालिझमवर भर द्यावा, असे मत सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 208 व्या जयंतीनिमित्त (दि.20 फेब्रुवारी) अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौरव समारंभ युवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, संस्थेचे प्रशासन अधिकारी व्यंकटेश देशपांडे, संस्थेचे नियामक मंडळ सदस्य प्राचार्य शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवराज पाटील पुढे म्हणाले, लोकजागृतीसाठी पत्रकारिता हे माध्यम महत्त्वाचे आहे, यासाठी बाळशास्त्रींनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. तर शिक्षण क्षेत्रासाठी ‘दिग्दर्शन’ हे मासिक सुरु केले. त्यांनी पत्रकारिता व शिक्षण क्षेत्राबरोबरच पुरातत्त्व संशोधनातही मोलाचे काम केले आहे. स्वातंत्र्यचळवळीत पत्रकारितेचे मोलाचे योगदान आहे. पत्रकार हा स्वातंत्र्यचळवळीचा मुळ आधार होता आणि आजही तो कायम आहे. आज माध्यम क्षेत्र मोठ्या गतीने विस्तारत आहे. भारतामध्ये सुमारे 70 हजार वर्तमानपत्र आणि नियतकालिके प्रकाशित होतात. जवळजवळ 15 कोटी लोक वर्तमानपत्र व नियकालिके विकत घेतात. आणि एक वर्तमानपत्र पाच व्यक्ती वाचतात. यावरुन माध्यमांचं महत्त्व किती आश्वासक आहे हे कळते. आज भारतामध्ये 400 वृत्तवाहिन्या आहेत. सोशलमिडीयाचा वापर करणार्यांची वाढती संख्या लक्षात घेवून पत्रकारांनी फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्वीटर, यु-ट्युब आदी विविध माध्यमांच्या आधारे वृत्त प्रसारित केल्यास वाचकसंख्या वाढण्यास आणखी मदत होऊ शकते, असेही पाटील यांनी शेवटी नमूद केले.
रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांचे पत्रकारितेबरोबरच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय होते. त्यांच्याविषयी संशोधन कार्य करीत असताना प्रत्येक वेळी त्यांनी केलेल्या विशेष कार्याचा उलगडा होत असतो. तत्कालिन ब्रिटीश राजवटीत बाळशास्त्रींनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान लाखमोलाचे आहे. 1829 मध्ये बाळशास्त्री जांभेकर ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल अँड बुक सोसायटी मुंबई’ येथे गणित अध्यापक होते. पुढे मार्च 1830 मध्ये ते डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी झाले. मार्च 1832 पासून ते पूर्णकाळ नेटिव्ह सेक्रेटरी झाले. नोव्हेंबर 1834 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल मुंबई टाऊन हॉल येथे असिस्टंट प्रोफेसर झाले. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते 1846 पर्यंत प्रोफेसर होते. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे महत्त्व लक्षात घेवूनच संस्थेने त्यांच्या नावे माध्यमिक विद्यालय सुरु केले असल्याचे सांगून एवढ्या मोठ्या महापुरुषाच्या नावे सुरु असलेले हे एकमेव विद्यालय असल्याचेही बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.
अरविंद मेहता म्हणाले, सुरुवातीच्या काळात या संस्थेला अनुदान नव्हते, साधनांची कमतरता होती मात्र या परिस्थितीवर मात करुन विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीनं शिक्षण कसे देता येईल आणि विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी कोणत्या दिशेने गेले पाहिजे त्याचा विचार करुन संस्थेने ज्ञानदानाचे व आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. सातत्याने विविध उपक्रम राबवून फलटण शहरात ही संस्था नावारुपाला आली आहे, असे सांगून संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी युवराज पाटील व मान्यवरांनी विद्यालयात आयोजित केलेल्या रांगोळी, हस्तकला व पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाविष्कारांचे सर्वच मान्यवरांनी कौतुक केले. त्यानंतर जयंतीनिमित्त बाळशास्त्री जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शैक्षणिक वर्षातील विविध क्रिडा प्रकार व स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देवून पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ ननावरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अरुण खरात यांनी केले तर आभार उपशिक्षक भिवा जगताप यांनी मानले.
कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ सदस्य बापूसाहेब मोदी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीच्या चेअरमन सौ.अलका बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनिष निंबाळकर, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे उपाध्यक्ष बापुराव जगताप, पत्रकार अॅड.रोहित अहिवळे, प्रदीप चव्हाण, प्रसन्न रुद्रभटे, रोहित वाकडे, निलेश सोनवलकर यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील. समवेत रविंद्र बेडकिहाळ, व्यंकटेश देशपांडे, विशाल शहा, प्राचार्य शांताराम आवटे, कानिफनाथ ननावरे, अरविंद मेहता, प्रसन्न रुद्रभटे, अॅड.रोहित अहिवळे, प्रदीप चव्हाण.