बारामती : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर बारामतीच्या इतिहासातील पहिला रणजी सामना महाराष्ट्र विरुध्द उत्तराखंड दरम्यान येत्या 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान रंगणार
बीसीसीआयने बारामतीच्या स्टेडीयमवर रणजी सामने खेळविण्यास मान्यता दिल्यानंतर हा पहिला सामना या खेळपट्टीवर खेळविला जाणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता या रणजी सामन्याचा प्रारंभ होणार आहे.
महाराष्ट्राच्या संघात ऋतुराज गायकवाड, अंकीत बावने, नौशाद शेख, राहुल त्रिपाठी या सारखे दिग्गज खेळणार आहेत. बारामतीकरांना प्रथमच या रणजी सामन्याच्या निमित्ताने प्रथम श्रेणी सामन्याचा थरार अनुभवता येणार आहे. *बारामतीत होणारे सर्व सामने बारामतीकरांना विनामूल्य पाहण्यास खुले* असतील अशी माहिती धीरज जाधव यांनी दिली.
बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमच्या खेळपट्टीला बीसीसीआयने मान्यता दिल्याने येथे प्रथम दर्जाचे सामने खेळविले जाणे शक्य असल्याने ग्रामीण भागातूनही क्रिकेटपटू तयार होण्यासाठी याचा फायदा निश्चित होईल, असे जाधव म्हणाले. ग्रामीण भागात प्रथमच रणजी सामना खेळविला जात असून या निमित्ताने बारामतीच्या क्रीडा वातावरणाला अधिक चालनाही मिळणार आहे.