मौजे जाधवनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री देवबा बाळू जाधव यांचे गतवर्षी आकस्मित निधन झाले. जाधव कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांचे आप्तेष्ट आणि मित्र परिवार यांनी सहकार्य केले. बिंटूराजे यांच्या नावाचा आणि कार्याचा जागर त्यांच्या पश्चात ही होत रहावा यासाठी त्यांच्या मुलांनी विविध उपक्रम हाती घेतले आणि यशस्वी पणे राबविण्यास सुरुवात देखील केली.
दिनांक २३ जानेवारी रोजी जाधवनगर च्या शाळेत बिंटूराजे वक्तृत्व स्पर्धेचे आणि मौजे जाधवनगर येथील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला बिंटूराजे विशेष प्राविण्य पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविणारे कु.शिवांजली महेश जाधव, धीरज संजय जाधव आणि कु.आर्या सोमनाथ रासकर या विद्यार्थ्याना रोख बक्षीस, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आले.
तसेच या वर्षीचा बिंटूराजे विशेष प्राविण्य पुरस्काराचा मानकरी कुलदीप शिवाजी गोरे हा ठरला. या विद्यार्थ्याने स्कॉलरशिप च्या परीक्षेत मिळविलेल्या देदीप्यमान यशाबद्दल त्याचा रोख रक्कम आणि बिंटूराजे सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.देवबा जाधव यांच्या दोन्ही मुलांनी गावासाठी देऊ केलेल्या प्रवेश कमानी च्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे उदघाटन २६ जानेवारी रोजी गाव कामगार तलाठी श्री अहिवळे, सरपंच श्री सतीश जाधव, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ आणि तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी जाधव नगर शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभल्याचे श्री अशोक जाधव यांनी यांनी सांगितले. तसेच या उपक्रमांना भविष्यात अजून व्यापक आणि मोठे स्वरूप देण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले.