फलटण : साखरवाडी ता. फलटण येथील आयडीबीआय बँकेतील लॉकर मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी सोने तारण कर्ज प्रकरणातील ४३ ग्राहकांचे ८० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँक साखरवाडी शाखेचे मॅनेजर अशोक शिवपुरी गोसावी (वय ५७ )यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवार दि. २४ रोजी रात्री आठच्या सुमारास बँकेचे कामकाज संपवून त्यांच्यासह सर्व कर्मचारी बँकेला कुलूप लावून आपापल्या घरी निघून गेले होते, आज शनिवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास बँकेतील कॅशियर नंदकुमार गद्रे यांनी त्यांना बँकेत चोरी झाल्याचे कळविल्यावर ते बँकेत गेले असता बँकेच्या पाठीमागील खिडकीचे गज वाकविलेले दिसले त्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले पोलीसआल्यानंतर बँकेचा मुख्य दरवाजा उघडून सर्व जण आत गेले असता बँके इमारतीच्या पाठीमागील खिडकीचे उभे लोखंडी गज वाकविले होते त्यातून चोरट्यानी बँकेत प्रवेश करुन बँकेतील स्ट्रॉंग रुम दरवाजाचे कुलुप तोडलेले दिसले स्ट्राँग रुम मधील दोन पैकी एक तिजोरी फोडलेली दिसली तिजोरीतून प्लॅस्टिकच्या सीलबंद पॅकेटमध्ये ठेवलेले दागिने लंपास झाल्याचे दिसून आले. सदरचे दागिने ग्राहकांनी सोने तारण कर्ज म्हणून ठेवले होते. 43 ग्राहकांचे जुने वापरते एकूण दोन किलो 640 ग्रॅम वजनाचे अंदाजे 80 लाखाचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.