फलटण :- राजुरी ता. फलटण येथील गाव कामगार तलाठी आत्माराम गिऱ्हे यांच्या कामकाजा विषयी दिवसेंदिवस तक्रारी वाढू लागल्या असून त्यांच्या विरोधात राजुरी ग्रामपंचायतीचे ठराव करुन त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे.
तलाठी गिऱ्हे हे गेली तीन ते चार वर्षे झाले राजुरी या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे राजुरी, भवानीनगर, कुरवली बु ॥ , दत्तनगर ही चार महसुली गावे आहेत. या चारही महसुली गावात रोजच मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. ७/१२ खाते उतारा, उत्पन्न दाखला, जमिनीच्या दस्ताची नोंद, वारस नोंद ,पिक पाणी नोंद, शाळकरी विद्यार्थ्यांना लागणारे विविध दाखले, सोसायट्यांचे ई करार नोंद आदींसह शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील लोकांना देण्याची मुख्य जबाबदारी गाव कामगार तलाठ्याची असते. पण राजुरी येथील गाव कामगार तलाठी आत्माराम गिऱ्हे या सुविधा लोकांना देण्यास टाळाटाळ करत आहेत.
तलाठी गिऱ्हे हे राजुरी येथील त्यांच्या सज्या मध्ये कमी प्रमाणात उपलब्ध असतात. राजुरी येथील तलाठी कार्यालय नेहमीच बंद असते. अनेक लोक आपल्या विविध कामांसाठी तलाठी कार्यालयासमोर तासोनतास बसून असतात. फोन करुन गावात येणार आहात का असे विचारावे तर त्यांचा फोन नेहमीप्रमाणे संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतो. त्यामुळे दाद मागायची तर कोणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तलाठ्याने ४० दिवसात दस्ताची नोंद करणे बंधनकारक आहे पण असे होत नाही. कित्येक महिने त्या संबंधित शेतकरी त्यांच्याकडे हेलपाटे घालताना दिसत आहेत. तर काही लोकांच्या दस्ताची नोंद गेली दोन वर्षे झालेली नाही अशी माहिती समोर आली आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी अवस्था या चारही महसुली गावातील लोकांची झाली आहे.
फलटण चे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे कुरवली, राजुरी, दत्तनगर व भवानीनगर येथील शेतक-यांनी भेटू तक्रार केली होती. पण प्रांताधिकारी यांनी लेखी स्वरुपात तक्रार द्या लेखी तक्रार दिल्यानंतर मी त्यांच्यावर कार्यवाही करु शकतो. तलाठी गिऱ्हे हे राजुरी गावातील त्यांच्या कार्यालयात उपस्थित नसतात, संबंधित गावातील लोकांना उद्धट पणे बोलतात, शासकीय योजनांची माहिती लोकांना देत नाहीत अशा विविध कारणांमुळे राजुरी ग्रामपंचायतीने त्यांच्या विरोधात ठराव बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे.