पाल्यांना आवडीनुसार त्यांच्या क्षेत्रात जाणेसाठी पाठबळ द्यावे तर आईवडीलांची कदर करावी व मुलींनी पालकांचा विश्वास जपवा : अभिनेत्री सौ. अलका कुबल

कोळकी  : पालकांनी  आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना त्यांच्या क्षेत्रात जाणेसाठी पाठबळ द्यावे. ज्या आई-वडिलांनी आपल्या पंखात बळ दिले आपल्यावर विश्वास ठेवला अशा आईवडीलांची कदर सर्वांनीच केली पाहिजे. मुलींनी समाजात वावरत असताना पालकांचा विश्वास जपला पाहिजे. आपले ध्येय साध्य करीत आयुष्यात पुढे सरसावले पाहिजे असे प्रतिपादन सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.
 फलटण येथे स्वयंसिद्धा महिला  संस्था समूहाच्या वतीने आयोजित स्वयंसिद्धा महोत्सव 2020 च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ. अलका कुबल बोलत होत्या. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. अध्यक्षस्थानी ॲड सौ.मधुबाला भोसले उपस्थित होत्या. 
आजही समाजात मुलगा हवा अशी भूमिका पाहिली जाते मात्र आजच्या युगात मुली सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी करीत आहेत. मला सुद्धा दोन मुली असून त्या चांगल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. माझी आई   अलकाची आई म्हणून ओळखली जाते .यशस्वी पुरुषाच्या यशाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते जेव्हा स्त्रीच्या मागे सारे कुटुंब राहते तेव्हा ती स्त्री यशस्वी होत असल्याचे सौ. अलका कुबल यांनी सांगितले. 
खरे पाहिले तर स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे असे दिसते. आपल्या सासूला आईसारखे माना, त्यांच्याशी आईसारखे वागा, त्यांच्याशी मैत्रीचे नाते निर्माण करा. त्यांच्याकडे बोट दाखवताना स्वतःचे आत्मपरीक्षण करा.आजही ग्रामीण भागात चांगले वातावरण आहे. मोठ्या शहरात आज वृद्धाश्रम दिसत आहेत मात्र ग्रामीण भागात आजही थोरांना मानाचे स्थान दिले जाते आहे ही चांगली बाब असल्याचे सौ. अलका कुबल यांनी स्पष्ट केले. 
 चित्रपटाविषयी बोलताना अलका कुबल म्हणाल्या , सुरुवातीला चित्रपटात रडण्याचा भूमिका माझ्याकडे येत होत्या. तशीच प्रतिमा माझी  महिलांच्या मनात निर्माण झाली व महिलांच्यामध्ये एक वेगळे स्थान माझे निर्माण झाले. कलाकार म्हणून या भूमिकांचा खूप कंटाळा आला होता. मी वैयक्तिक अन्याय कधीही सहन  केला नाही.  व्यवसाय म्हणून असे चित्रपट स्वीकारत गेले व  वाहत गेले. यश मिळत होते त्यामुळे अशा चित्रपटात मी आणखीनच अडकत गेले.शेवटी  असे सिनेमे  मी स्वीकारणे बंद केले. नुकतेच वेडिंगचा सिनेमा व धुरळा हे  वेगळ्या विषयाचा चित्रपट असल्यामुळे मी  स्वीकारला. धुरळा चित्रपटात मी दारू पिण्याचा एक सीन केला आहे, आयुष्यात कधीही दारूला स्पर्श केला नाही, मात्र हे आव्हान मी स्वीकारले. अशा वेगळ्या विषयाचे चित्रपट मी यापुढे स्वीकारत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
फलटण शहरात स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या  वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.स्वयंसिद्धामुळे फलटणमधील महिला घराबाहेर पडत आहेत व स्वतःचा व्यवसाय सुरु करीत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध उपक्रमातून स्वयंसिद्धा त्यांना संधी देत असते असे सातारा जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी सांगून स्वयंसिद्धाच्या या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲड. सौ मधुबाला भोसले म्हणाल्या, महिला स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही जे पाऊल उचलले त्यास  फलटणकर यांनी प्रचंड प्रतिसाद दिला.आमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे ते फलटणकर यांच्या आशीर्वादामुळेच मिळत आहे. महिलांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा, त्या आर्थिकदृष्ट्या सबळ व्हाव्यात म्हणून स्वयंसिद्धाच्या वतीने विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात. या उपक्रमासाठी सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाची आम्हास मोलाची साथ मिळते. 
प्रारंभी ॲड सौ मधुबाला भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केले .स्वयंसिद्धाच्या उपाध्यक्षा सौ श्रद्धा कुलकर्णी यांनी आभार मानले. 
कार्यक्रमास स्वयसिद्धाच्या पदाधिकारी सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे पदाधिकारी फलटणकर नागरिक महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!