फलटण : महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्या 27 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी केली. संस्थेतर्फे विशेष दर्पण पुरस्कार फलटण येथील जेष्ठ पत्रकार व दैनिक पुण्यनगरी, फलटणचे तालुका प्रतिनिधी सुभाष भांबुरे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी केले. दर्पण पुरस्काराचे स्वरुप रोख रु.2,500/- व सन्मानपत्र, जांभेकर चरित्र, ग्रंथ व माहितीपट सी.डी., शाल, श्रीफळ असे आहे. या पुरस्काराचे वितरण बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीदिनी दिनांक 17 मे 2020 रोजी पोंभुर्ले, ता.देवगड येथील ‘दर्पण’ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही यावेळी बेडकिहाळ यांनी सांगितले.
युवाशक्ती, युवामित्र तरुण मंडळाची स्थापना त्यातून विद्यार्थी व युवकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या होत्या. प्रत्येक युवकास व्यवसायाभिमुख करणे त्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे या सर्व बाबी करत असताना सामाजिक सेवेच्या अंगभुत गुणांमुळे पत्रकारीतेचे क्षेत्र त्यांनी स्विकारले या माध्यमातून फलटण शहर व तालुक्यातील विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली त्यातून अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लागले. पत्रकारीता क्षेत्रातील अनेक तरुणांना मार्गदर्शन व सहकार्य करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यांनी घडविलेले नवीन पत्रकार आज विविध वृत्तपत्रामधून उत्तम प्रकारे काम करीत आहेत.
शिवसंदेशकार कॉ. हरीभाउ निंबाळकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुका पत्रकार संघाचे पुनरुज्जीवन करुन कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता सर्व कार्यक्रमांचे नियोजन करुन देण्याचे काम सुभाष भांबुरे यांनी केले, आजही ते करत आहेत. पत्रकारांचे प्रशिक्षण शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, संगणक प्रशिक्षण शिबीर, आदी विधायक कार्यक्रम त्यांनी पार पाडले आहेत. कोणत्याही मान अपमानाची तमा न बाळगता पत्रकारीतेच्या क्षेत्रात त्यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. या सोबतच आपल्या लेखणीच्या माध्यमातून दैनिक शिवसंदेश, दैनिक तरुण भारत (बेळगाव), दैनिक प्रभात, दैनिक नवराष्ट्र व सध्या दैनिक पुण्यनगरी अशा विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्या लेखणीद्वारे अनेकांना ज्ञाय देण्या बरोबरच सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक नवोदितांचा राजकीय व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी मार्गदर्शन केले. अनेक गोरगरिबांना वृत्तपत्राच्या माध्यमातून ज्ञाय देण्याचे काम प्राधान्याने केले आहे.
सुभाष भांबुरे हे छत्रपती शिवाजी वाचनालय, फरांदवाडी कृषी क्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी, नामदेव समाज उन्नत्ती परिषद, नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट अश्या विविध संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून काम करीत आहेत.
भांबुरे यांच्या कल्पनेतुन कॉ. हरिभाउ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करुन सातत्याने संपर्कात असणार्या राजकीय नेते, पोलिस, पत्रकार, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक कारखाना, नगरपरिषद , तहशील कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आगळ्या वेगळ्या स्पर्धा घेउन त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून एक वेगळा आनंद प्राप्त करुन दिला. दुसर्याला मोठेपणा देण्यात आपला मोठेपणा असल्याची भावना उराशी बाळगून फलटण शहरातील विविध स्तरातील व्यक्तींशी सुसंवाद साधणारे व्यक्तिमत्व म्हणून आज भांबुरे यांच्याकडे पाहिले जाते.
अत्यंत प्रतिकुल आर्थिक परिस्थितीतून सुभाष भांबुरे यांनी कलाशाखेतील पदवी पदविका, विधी शाखेचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम, पत्रकारिता पदवी प्राप्त केली. विविध छोट्या व्यसायांबरोबर क्रिडाक्षेत्रातही त्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये बास्केट बॉल, मॅरेथॉन स्पर्धा, क्रिकेट यामध्ये प्राविण्य मिळवले. त्याचवेळी साहित्य क्षेत्रातील ज्ञानही त्यांनी अवगत केले. मुधोजी महाविद्यालयामधील त्याकाळी अत्यंत खर्चिक अशा विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकांमध्ये एकही पैसा खर्च न करता निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.
नामांकित यात्रा कंपनी म्हणून सुभाष भांबुरे यांच्या श्रीहरी टॅ्रव्हल्सचे नाव आज घेतले जाते. गेली ३० वर्षे ते या व्यवसायात अग्रेसर असून यात्रेकरुंची आपुलकीने सेवा करणे, धार्मिक सहलींचे सुंदर नेटकेपणाने नियोजन व संयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. धार्मिक, प्रेक्षणीय सहलींबरोबरच केंद्र व राज्य शासनाद्वारे आयोजित करण्यात येणार्या प्रशिक्षण सहलींमध्ये अभ्यासपूर्ण रितीने ते प्रशिक्षणार्थ्यांना योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करतात. गेल्या १० वर्षांच्या कालावधीमध्ये अभ्यास दौर्यांच्या जवळपास 125 शासकीय सहलींचे त्यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजन केले आहे.
भांबुरे यांनी पत्रकार संघटना आणि शहर व तालुक्यातील पत्रकार यांच्या सहकार्यातून गत १० वर्षांपूर्वी माजी आमदार स्व. कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन केले व सदरील केंद्र स्थापन करत असताना कोणत्याही संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडून डोनेशन न घेता केंद्र सुरु केलेले आहे. त्याच बरोबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी केंद्रात येतात त्यांच्याकडून कोणतीही फी अथवा इतर शुल्क घेतले जात नाही. ह्या केंद्रात जवळपास दररोज १०० हुन अधिक विद्यार्थी अभ्यास करत असून सुमारे १५० हुन अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेले आहेत. सदरील पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर कला, क्रीडा, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सुभाष भांबुरे यांचे अभिनंदन केले.