सातारा : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शभुंराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समीतीची पहिलीच बैठक आयोजित केली होती. कॅबीनेट तसेच राज्यमंत्री पदी वर्णी लागलेल्या दोन्ही सातारा जिल्ह्यातील मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नियोजनाची महत्वपुर्ण बैठक होत असताना. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केल्याने सातारा शहरातील पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीनी जिल्हा नियोजन समीतीनंतर झालेल्या पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.
जिल्ह्यात नवनिर्वाचित झालेल्या दोन्ही मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याला काही महत्वपूर्ण निर्णयानुसार माहिती घेण्याच्या हेतूने दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विविध दैनिकांचे प्रतिनिधी तसेच छायाचित्रकार माध्यमांचे प्रतिनिधी वार्ताकनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गेले होते. आपण फोटो काढून जावा, थांबू नका, असा इशाराच पत्रकारांना पालकमंत्र्यांनी दिला. यामुळे पत्रकारानी आपल्या अधिकारावर गदा येत असल्याची माहिती उपस्थित आमदारांना दिली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीमध्ये पत्रकारांना निमंत्रीत करा असे सुचविले. मात्र याची दखल न घेता पत्रकारांना बैठकीनंतर माहिती दिली जाईल अशी सुचना केल्याने सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच शहर पत्रकार संघाच्या सदस्यांनी तसेच छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडीया संघटनेच्या पदाधिकार्यांनी या बैठकीचे वृत्तांकन न करण्याचा पवित्रा घेत जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.
पत्रकारांनो जिल्हा नियोजन सभेच्या बैठकीला बसू नका, अशी सुचनाच पालकमंत्र्यांनी केल्यानंतर याबाबत सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे व सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधून आम्हाला बसू दिले जात नसल्याचे सांगितले. हरिष पाटणे बाहेरगावी असल्यामुळे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. उपस्थित पत्रकारांच्या संतप्त भावना होत्या. यामध्ये सुजीत आंबेकर, उमेश भांबरे, दिपक शिंदे, ओंकार कदम, तसेच विविध दैनिकांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी आपल्या संतप्त भावना विनोद कुलकर्णी यांच्यासमोर मांडल्या. कुलकर्णी यांनी पाटणे यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत, असे पाटणे यांनी कुलकर्णी यांना सांगितले.
त्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जर पत्रकारांना बैठकीला बसण्याची परवानगी दिली नाहीतर या पुढच्या त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जागेवरच घेण्यात आला. जिल्हा नियोजन समीतीत जे घडते ते लोकांसमोर आले पाहिजे. एकतर्फी बातम्या आपण छापू शकत नाही. लोकसभेचे अधिवेशन जर लाईव्ह प्रसारित केले जात असेल तर सातारा जिल्हा नियोजन समीतीची बैठक बंद कमर्यात घेण्यामागचे कारण काय ? असा प्रश्न यावेळी विनोद कुलकर्णी यांनी उपस्थित केला. बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांच्या शिष्टमंडळाची बैठक बोलवली. यावेळी दिपक शिंदे, अजित जगताप, सुजीत आंबेकर, उमेंश भांबरे, ओंकार कदम, सनी शिंदे, सम्राट गायकवाड, गिरीष चव्हाण, आदेश खताळ, गुरूनाथ जाधव, प्रशांत जगताप, संदीप कुलकर्णी, निखिल मोरे, प्रतिक भद्रे, इजाज शेख, सचिन पवार, शुभम शेलार, नंदकुमार निपाणे, आदी पत्रकार छायाचित्रकार इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. पत्रकारांनी आपले म्हणने सांगितल्यानंतर देखील पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पुढच्या मिटींगला ठरवू असे सांगून निर्णय देण्यास नकार दिल्याने सर्व पत्रकारांनी बाळासाहेब पाटील यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.