गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला : रमेश खरमाळे

मुजरा : छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन चढत होती. थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजिवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातुन छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमूरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तीने आवाज दिला दादा सरबत,पाणी, ताक घ्या की… मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं बाळा कुठची राहणार. पाली गावच नाव सांगितलं. शाळेत जातेस का? २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले. खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतली.  व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला. 

    गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला.
     जय जिजाऊ जय शिवराय..
   लेखक व छायाचित्र – रमेश खरमाळे
            माजी सैनिक खोडद
              ८३९०००८३७०
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!