फलटण, दि. 15 : मकर संक्रांतीनिमित्त प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही बुधवार दि. 15 रोजी फलटण शहर व तालुक्यातील आणि शेजारील तालुक्यातील असंख्य महिलांनी ऐतिहासिक संस्थानकालीन श्रीराम मंदिरात सितामाईला वाणवसा देवून प्रभू श्रीराम व सीतामाईचे दर्शन घेतले. श्रीराम मंदीर परिसर सुवासीनींनी गजबजुन गेला होता.
मुधोजी मनमोहन राजवाड्यानजिक असलेल्या श्रीराम मंदिरात आज पहाटे प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मणाच्या मूर्तीला विधीवत अभिषेक करण्यात आला त्यानंतर भाविकांनी प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मणाचे दर्शन घेतले. यावर्षी सुर्याचा मकर राशीत प्रवेश मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी उत्तर रात्री 2.3 मिनिटांनी प्रवेश झाल्याने यावर्षी मकर संक्रांतीचा सण दि. 14 ऐवजी 15 जानेवारी रोजी साजरा होत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दि. 15 रोजी पहाटेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असल्याने संपूर्ण दिवसभरात वाणवसा देणे/घेणे व सीतामातेचे दर्शन घेता येणार आहे. तरीही सकाळी लवकर शहर व परिसरातील महिलांनी सीतामातेला वाणवसा देवून दर्शन घेवून आपल्या कुटुंबासाठी सणाच्या स्वयंपाकाला लवकर सुरुवात केल्याचे दिसून आले.
मकर संक्रातीला सीतामाईचे दर्शन घेवून तीच्याकडून अखंड सौभाग्याचा वसा घ्यायचा अशी प्रथा व भावना असून त्यामुळे अखंड सौभाग्य लाभत असल्याची श्रध्दा महिलांमध्ये आहे. त्यामुळे मकर संक्रांतीदिवशी भल्या पहाटे उठून स्नान उरकून भरजरी काठा पदराची साडी, अंगावर सोन्याचे दागिणे, केसात माळलेले सुगंधी फुलाचे गजरे अशा सजलेल्या वेषभूषेत अनेक महिला तीळगुळ घ्या, गोड बोला अशा स्नेहपूर्ण उद्गाराने एकमेकींना शुभेच्छा देत श्रीराम मंदिराकडे येताना दिसत होत्या. साहजिकच त्यामुळे मंदिर परिसर भावपूर्ण वातावरणाने भारल्याचे जाणवले.
श्रीराम मंदिर मुख्य मंदिराशेजारील दत्त मंदिर परिसरात आणि मंदिर परिसरातील रिकाम्या जागेत महिला विडे मांडून, पूजा करीत होत्या. संक्रांतीमध्ये (मातीची सुगडे) तीळ, गाजर, गुळ, बोरे, ऊस, पावटा, घेवडा शेंग, हरभरा घेवून सुगड्या व वसा पूजन करुन महिला एकमेकींच्या ओट्या भरुन शुभेच्छा देत होत्या. मंदिर परिसरात हळदी कुंकवाचा सडा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मकर संक्रांतीला श्रीराम मंदिर व मुधोजी मनमोहन राजवाडा परिसरात गर्दी होत असल्याने नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि फलटण नगर परिषदेने मंदिर परिसर स्वच्छ करुन सुलभ दर्शनाची व्यवस्था केली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवून सर्वांना सहजतेने दर्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत रांगेने व शिस्तीने जाण्यासाठी बॅरेगेटींग लावून व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन घेतल्यानंतर दत्त मंदिरासमोरील दरवाजातून बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आल्याने येण्या/जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध असल्याने प्रवेशद्वारात होणारी गर्दी टाळण्यात यश आल्याचे दिसून आले. सकाळी काही काळ सीतामाईच्या दर्शनासाठी जाणार्या महिलांची रांग श्रीराम मंदिर, मुधोजी मनमोहन राजवाडा, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक, जब्रेश्वर मंदिर या बाजूने गजानन चौकापर्यंत पोहोचली होती. मंदिर परिसरात होणारी चुडा, बांगड्यांची, लहान मुलांची खेळणी, मेवा मिठाई आणि वाणवस्याच्या साहित्यासह सुपारी, हळद कुंकू वगैरे वस्तुंची दुकाने गजानन चौक परिसर आणि शिंपीगल्ली परिसरात लावल्याने मंदिरासमोर होणारी गर्दी टाळून येणार्या महिलांना सहजतेने मंदिर प्रवेशाची सुविधा उपलब्ध झाल्याचे दिसून आले.
शहर पोलीस ठाणे त्यांच्या सहकार्यांनी येणारी वाहने छ. शिवाजी वाचनालय पलीकडे, गजानन चौक परिसरात लावल्याने वाहनांमुळे मंदिर परिसरात होणारी कोंडी टाळणे शक्य झाले. त्यामुळे मंदिर परिसर, जब्रेश्वर मंदिर परिसर येथे होणारी वाहनांची गर्दी व वाहतूकीची कोंडी गतवर्षीपासून बंद झाल्याने महिला मुक्तपणे मंदिरापर्यंत जावून सीतामातेचे दर्शन घेवू शकल्याने त्यांच्यामध्ये वेगळा आनंद दिसून आला.
शहर पोलीस यंत्रणेला अनिरुध्दाज अॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या 56 स्वयंसेवकांनी मंदिर परिसरात महिलांना रांगेतून दर्शन घेण्यासाठी, दर्शन घेवून परतताना आपल्या वाहनापर्यंत व्यवस्थीत पोहोचता येईल यासाठी केलेली व्यवस्था उत्तम होती त्यामुळे शहर पोलीस यंत्रणा आणि अनिरुध्द उपासना केंद्राच्या स्वयंसेवकांना अनेकांनी धन्यवाद दिले.