फलटण तालुक्यातील रुग्ण यांना आता एक रुपयांमध्ये उपचार मिळणार : उमेश चव्हाण

फलटण : आजच्या २१  वे शतकात धकाधकीचे जीवन जगताना  प्रत्येक माणूस रोजगार आणि कुटुंब चालविण्याच्या शर्यतीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून कष्टाचे काम करणाऱ्या कामगार, मजूर, शेतमजूर, गरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्याच्या समस्येला तोंड देताना त्यांचे आर्थिक बजेट कोलमडून जात असल्याने आता फलटण तालुक्यातील नागरिक यांना एक रुपयांमध्ये उपचार मिळणार असल्याची घोषणा रूग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली. 
रूग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्यातील तिसऱ्या व सातारा जिल्ह्यातील पहिल्या दवाखान्याचे उदघाटन रविवारी फलटण येथे परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यशराज क्लिनिकचे डॉ. श्रीराज गांधी डॉ. सौ. स्वप्नजा गांधी, रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सचिव संध्याराणी निकाळजे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुनील मोटे, जिल्हा संघटक कमलाकर मोहिते, फलटण तालुका अध्यक्ष नाथा रणदिवे, अर्जुन आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
दुर्धर रोगावर उपचार किंवा ऑपरेशनसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याने दुर्दैवाने पैसे नाहीत म्हणून अनेकांचा मृत्यू होताना दिसतो परंतु पैसे नाहीत म्हणून आता कोणाला आपला जीव गमवावा लागणार नाही. फलटण येथील यशराज क्लिनिकमध्ये नागरिकांना आता मोफत उपचार मिळणार असल्याचे रूग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सांगितले.
  सुमारे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेली रुग्ण हक्क परिषद ही संघटना राज्यभर विस्तारली गेली असून जनसंपर्क व लोकसंग्रहामुळे कोणतीही जात पात, धर्म पंथ, असा भेदभाव न करता प्रत्येकाला जगविण्याचे काम रूग्ण हक्क परिषद करीत आहे. सर्वांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात फलटणकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन उमेश चव्हाण यांनी केले.
 कमलाकर मोहिते यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील मोटे यांनी शेवटी आभार मानले. 
कार्यक्रमास पृथ्वी मेडिकल फाउंडेशनच्या वैशाली जनारोग्य सुरक्षा योजनेचे आरोग्यदूत आणि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!