फलटण दि. 10 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगाराच्या बसमध्ये प्रवाशाचा विसरुन राहिलेला सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज या बसच्या चालक/वाहकांनी स्थानक प्रमुखांमार्फत सदर प्रवाशाचा शोध घेऊन त्याला परत केल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरावरुन अभिनंदन होत आहे.
गुरुवार दि. 9 रोजी फलटण आगाराची एस. टी. बस (एम. एच. 11 बीएल 9355) फलटण-तुळजापूर मार्गावर धावत असताना एस टी मध्ये गेली 5 वर्षे कार्यरत असलेले चालक रोशन गोरखनाथ गार्डे (रा. ढवळ, ता. फलटण) आणि एस टी मध्ये गेली 10 वर्षे कार्यरत असलेल्या महिला वाहक सौ. ज्योती वसंतराव बोराटे (रा.राणंद, ता. माण हल्ली फलटण) हे सदर बस घेऊन जात असताना पंढरपूर बस स्थानकावर बसमधील महिला प्रवासी उतरुन जाताना बसमध्ये त्यांची पिशवी राहिली. चालक/वाहकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पंढरपूर येथील स्थानक प्रमुख आर. आर. लाड यांना त्याबाबत माहिती देऊन सदर पिशवी त्यांचेकडे सुपूर्द केली.
स्थानक प्रमुखांनी सदर प्रवाशाचा शोध घेऊन पिशवी त्यांच्या स्वाधीन केली. सदर पिशवीमध्ये सुमारे 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेे, कपडे आणि 6 हजार 326 रुपयांची रोकड असा सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज होता. तो परत मिळाल्याने प्रवाशी महिलेच्या चेहर्यावरील आनंद ही एस. टी. ची देणगी असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.
सदर चालक/वाहकांचा पंढरपूर स्थानक प्रमुख लाड व त्यांच्या सहकार्यांनी तसेच बस फलटण येथे पोहोचल्यावर फलटण प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, स्थानक प्रमुख वाडेकर, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय महानवर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक धीरज अहिवळे, नंदकुमार सोनवलकर, प्रवाशी संघटना अध्यक्ष शिवलाल गावडे, सर्व संघटना पदाधिकारी, एस. टी. चे अधिकारी/कर्मचारी आणि प्रवाशांनी चालक रोशन गार्डे व वाहक सौ. ज्योती बोराटे यांचे अभिनंदन केले आहे.