आ. दिपक चव्हाण 30981 मताधिक्य घेवून तिसर्‍यांदा विजयी

फलटण, दि. 24 : 255 फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस-अ.भा. काँग्रेस व मित्र पक्षांचे अधिकृत उमेद्वार आ. दिपक चव्हाण 30981  मताधिक्य घेवून तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत. आ. दिपक चव्हाण यांनी हॅटट्रीक करीत भाजपा महायुतीचे उमेद्वार दिगंबर आगवणे यांचा दुसर्‍यांदा पराभव केला आहे. या निवडणूकीत आ. दिपक चव्हाण यांना मिळालेली मते पहाता महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठिशी मतदार संघ ठामपणे उभा राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. 
आज (गुरुवारी) सकाळी 8 वाजता येथील शासकीय धान्य गोदामात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात अत्यंत शांततेत मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. प्रथम 4 टेबलवर पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर 14 टेबलवर एकुण 25 फेर्‍यांच्या माध्यमातून ईव्हीएम मशिनद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करण्यात आली. पहिल्या फेरीपासून अखेरपर्यंत राष्ट्रवादीचे उमेद्वार आ. दिपक चव्हाण यांनी सतत आघाडी घेत अखेरच्या फेरी अखेर एकुण 1 लाख 17 हजार 617  मते मिळविली तर विरोधी भाजपा महायुतीचे उमेद्वार दिगंबर आगवणे यांना दुसर्‍या क्रमांकाची 86 हजार 636 मते मिळाली असून आ. दिपक चव्हाण यांनी 30 हजार 981 मताधिक्य घेवून तिसर्‍यांदा विजयी होण्याचा बहुमान पटकाविला आहे. 
सोमवार दि. 21 आक्टोबर रोजी झालेल्या मतदानात 3 लाख 30 हजार 321 मतदारांपैकी 1 लाख 15 हजार 116 पुरुष आणि 98 हजार 712 स्त्रीया अशा एकुण 2 लाख 13 हजार 828 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आज (गुरुवार) या सर्व मतपत्रिकांची मतमोजणी केल्यानंतर पहिल्या फेरीपासून आ. दिपक चव्हाण यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखत भाजपा महायुतीचे उमेद्वार व निकटचे प्रतीस्पर्धी दिगंबर आगवणे यांचा  30981  मतांनी पराभव करीत विजयश्री खेचून आणली  या मतदार संघातील अन्य उमेद्वार व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे- प्रदिप उर्फ प्रेम सुरेश मोरे (बहुजन समाज पाटी) 934, अमोल अबाजी पवार (प्रजासत्ताक भारत पक्ष)  342, अरविंद बाबुराव आढाव (वंचित बहुजन आघाडी) 5460, अमोल मधुकर कारंडे (अपक्ष) 216, पांडू समुद्रलाल अहिवळे (अपक्ष) 182, कांचनकन्होजा धोंडीराम खरात (अपक्ष) 780, चंद्रकांत अंबर अहिवळे (अपक्ष) 739 चंद्रकांत नारायण साळवी (अपक्ष) 308, नंदू संभाजी मोरे (अपक्ष) 673 आणि नोटा 1717 याप्रमाणे मतदान झाले आहे. 
मतमोजणी केंद्रापासून सुमारे अर्धा कि.मी. परिसरातील वाहतूक पूर्णत: बंद करुन बॅरेगेटींग लावून त्याठिकाणी लावण्यात आलेल्या मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे मतमोजणी केंद्र परिसरात संपूर्ण शांतता होती मतमोजणी केंद्र परिसरात असलेला केंद्रीय राखीव पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल आणि सातारा जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला चोख बंदोबस्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हनुमंत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा असि. रजिस्टार (सहकारी संस्था) सुनील धायगुडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेले नियोजन यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली तथापी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ठोस भूमिका घेवून निकाल जाहीर करताना ती तत्परता न दाखविल्यामुळे पहिल्या 4 फेर्‍यापर्यंत मतमोजणीची कसलीही माहिती पत्रकार अथवा मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या विविध पक्षाच्या समर्थकांसह मतदारांना उपलब्ध झाली नाही त्यामुळे प्रशासन यंत्रणे विषयी मोठी नाराजी व्यक्त झाली. त्यानंतर मात्र सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आल्याने समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. 
मतमोजणी प्रक्रिया सुरु असताना आ. दिपक चव्हाण यांचे मताधिक्य जसजसे वाढत जाईल तसतसा शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राजेगट समर्थकांचा उत्साह सतत वाढत होता. त्यातून गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि खा. शरदराव पवार, श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांचा जयघोष वाढत होता. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराज जगताप यांनी आ. दिपक चव्हाण यांच्या विजयाची घोषणा करताच कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आणि त्यांनी शहरातील चौकाचौकात त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील गावागावात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालांची उधळण करीत पेढे वाटून आपल्या नेत्याचा जयघोष केला. 
राज्यात असलेली भाजपाची लाट, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत या मतदार संघातून भाजपा, उमेद्वार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेतलेली मतांची आघाडी पहाता यावेळची निवडणूक कठीण जाणार असे चित्र निर्माण झाले होते राज्यात अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाला जवळ करीत आपले भविष्य घडविण्याचा निर्णय घेतला असताना काही काळ श्रीमंत रामराजे व त्यांच्या सहकार्‍यांमध्येही चलबिचल दिसून आली परंतू विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी मेळावे घेवून चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी सोबत राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर उमेद्वार कोण याचीही चर्चा चांगलीच सुरु झाली मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ठाम भूमीका घेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि दिपक चव्हाण हे समीकरण न बदलण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांनीही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करीत आता आ. दिपक चव्हाण हॅटट्रीक करणारच असा निर्धार करीत गेले 10/15 दिवस जीवाचे रान करुन या मतदार संघात परिवर्तन परवडणारे नसल्याचे प्रत्येकाने आपल्यापरीने पटवून देत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी आणि दिपक चव्हाण यांनाच विजयी करण्याचा निर्धार प्रत्येकाने केला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केल्यामुळेच आजचा विजय झाल्याचे दिसून आले आहे. 
या विजयानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी, राजेगटाचे समर्थक आणि शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी करुन जल्लोष केला. त्यावेळी आ. दिपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक व उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, अ‍ॅड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितसिंहराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती सौ. प्रतिभाताई धुमाळ, व  त्यांचे सहकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे व त्यांचे सहकारी नगरसेवक, नगरसेविका, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांच्यासह अनेकांनी मतदारांना धन्यवाद देत त्यांनी दाखविलेल्या विश्‍वासाबद्दल सर्वांचे आभार मानले. 
सन 1995 पासून या तालुक्यातील सर्वसामान्यांनी आपल्याला सतत पाठींबा दिला आहे. 1995 च्या विधानसभा निवडणूकीत अपक्ष असूनही आपल्याला सुमारे 42 हजारांचे मताधिक्य मिळाले त्यानंतर 1999 च्या निवडणूकीतही 32 हजाराचे, सन 2004 मध्ये 40 हजाराचे, सन 2009 मध्ये दिपक चव्हाण यांना 40 हजाराचे, सन 2014 मध्ये दिपक चव्हाण यांना 33 हजाराचे मताधिक्य दिले आता त्यांना हॅटट्रीक करताना पुन्हा 30 हजाराहून अधिक मताधिक्य देवून राष्ट्रवादी आणि राजेगटाच्या कार्यपध्दतीवर मतदारांनी सुवर्ण मोहोर उठवून या कार्यपध्दतीला एक प्रकारे पाठींबाच दिला असल्याने आगामी काळात तालुक्यात विकासाची योजना आणि तरुणांना प्राधान्य या दोन गोष्टी पूर्ण करण्याचे सुतोवाच करीत आता शेजारच्या किंवा अन्य कुठल्याही बाहेरच्या नेतृत्वाने येथे हस्तक्षेप न करता आमचा तालुका आम्हाला विकासाच्या सर्वोच्च स्थानावर नेवूद्या अशी अपेक्षा श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केली आहे. 
फलटण प्रमाणेच सातारा जिल्ह्यातही मतदारांनी खा. शरद पवार यांच्या पुरोगामी विचाराला आपण केलेली साथ स्विकारुन केलेले मतदानाबद्दल जिल्ह्यातील मतदारांनाही आपण धन्यवाद देत असून आगामी काळात केवळ फलटण नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा खा. शरद पवार यांच्या पुरोगामी विचारावर पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून त्यासाठी साथ करण्याचे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!