भिलकटी ता.फलटण येथील अमित डिसले व अमर पवार यांनी “आयर्न मॅन” 70.3 ही गोवा येथे झालेली *जागतिक दर्जाची ट्रायथलॉन स्पर्धा* यशस्वीपणे पूर्ण केली.
या स्पर्धेचे मूळ स्वरुप म्हणजे एकावेळी ३ क्रिडा प्रकार पूर्ण करावे लागतात. त्यामध्ये प्रथम 1 तास 10 मिनिट एवढ्या वेळेत १.९ किलोमीटर समुद्रामध्ये पोहणे, त्यानंतर लगेच 90 किलोमीटर सायकल चालवणे, ह्यासाठी पोहणे व सायकलिंग करणेसाठी चा वेळ 5 तास आणि 30 मिनिट असतो, त्यानंतर २१ किलोमीटरचे अंतर पळून पूर्ण करणे अशी ही स्पर्धा 8.30 तासात पूर्ण करावी लागते.
अमित डिसले यांनी ही स्पर्धा ६ तास २७ मिनिटे आणि २७ सेकंद या विक्रमी वेळेत पूर्ण केली तर अमर पवार यांनी ही स्पर्धा ७ तास १६ मिनिटे या वेळेमध्ये पूर्ण केली. ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सराव करून या दोन तरुणांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून फलटण तालुक्याचे नाव जगात उंचवण्याचे काम केलेल आहे. हे दोघेही युवक भिलकटी तालुका-फलटण जिल्हा- सातारा या गावचे रहिवासी आहेत. अशा प्रकारच्या अनेक साहसी मोहिमा तसेच साहसी स्पर्धांमध्ये आतापर्यंत या दोन युवकांनी सहभाग घेऊन त्या यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत.
टाटा फुल मॅरेथॉन मुंबई, लडाख हाफ मॅरेथॉन लडाख, सातारा हिल मॅरेथॉन, पुणे हाफ मॅरेथॉन, सातारा हिल सायकलोथान, कोल्हापूर रगडियन मॅरेथॉन, हिमालयातील स्पिती व्हॅली सायकल सफर, मोटारसायकलवरून लेह-लडाख सफर अशा अनेक साहसी स्पर्धांमध्ये यशस्वीपणे सहभागी होऊन आपला छंद जोपासला आहे. तसेच सामाजिक उपक्रम म्हणून कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये हे युवक सहभागी झालेले आहेत. आयर्न मॅन ही जागतिक लेव्हलची स्पर्धा यावर्षी गोव्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असताना मिळवलेल हे यश नक्कीच अभिमानास्पद आहे. अमित डिसले हे श्रीराम सहकारी साखर कारखाना येथे एन्व्हायरमेंट इंजिनियर म्हणून काम करतात. दिवसभर कारखान्यांमध्ये काम करून सकाळी व सायंकाळी दररोज पळणे, पोहणे व सायकलिंग याचा सराव त्यांचा चालू असतो. ऊन, वारा, पाऊस कशाचाही विचार न करता एकही दिवस या सर्वांमध्ये खंड पडू न देता केलेल्या मेहनतीच फळ आज त्यांना मिळाल आहे. तसेच अमर पवार हे इंडियन एअर फोर्स मध्ये कार्यरत आहेत. देश सेवा करत असतानाच अशा प्रकारच्या मोहिमा व स्पर्धा मध्ये सहभागी होऊन त्यामध्ये यश मिळविण्याचा छंद त्यांनीही जपलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश कसे संपादन करायचे, तसेच अशा प्रकारचे यश मिळवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे सगळं या स्पर्धा प्रकारातून शिकायला मिळालं असे मनोगत अमित डिसले व अमर पवार यांनी व्यक्त केले. या दोघांनाही डॉक्टर प्रणील भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या अफाट यशासाठी समस्त ग्रामस्थ भिलकटी, फलटण तालुक्यातील तमाम क्रीडाप्रेमीं कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.