पांडवगड हा वाई तालुक्यातील एक किल्ला

विशेष लेख 16

पांडवगड हा वाई तालुक्यातील एक किल्ला असून पांडवगडाची उंची ४१८५ फूट आहे. पांडवगड हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून चढण्यासाठी मध्यम आहे. सातारा जिल्ह्यातील पांडवगड किल्ला असून जवळचे गाव मेणवली, गुंडेवाडी ही आहेत. महाबळेश्वर डोंगर रांगेतील पांडवगड यानिमित्ताने…. 
सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला असून कृष्णा नदीच्या उत्तर बाजूला रायरेश्वर येथून निघणारी महादेव रांग आहे. सह्याद्रीच्या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे. शिलाहार राजा भोज यांनी सातारा जिल्ह्यात जे काही दुर्ग बांधले त्यांतला पांडवगड हा एक आहे.
समुद्रसपाटीपासून १२७३ मीटर उंची (४१७०फूट) असलेल्या पांडवगडाला जाण्यासाठी वाईमधून जावे लागते. वाई शहर पुणे-बंगलोर महामार्गाच्या पश्चिमेला आहे.
पांडवगडावर जाण्यासाठी दोन रस्ते प्रचलित आहेत. दक्षिणेकडे म्हणजे मेणवली मार्गे असलेला रस्ता खड्या चढाईचा असून दमछाक करणारा आहे.  उत्तरेकडील धावडी गावच्या हद्दीतून जाणारा रस्ता तुलनेने सोपा आहे. वाई मांढरदेव रस्तावर धावडी हे गाव असून वाईहून ७ किलोमीटर अंतरावर आहे. 
पांडवगडाच्या उत्तर बाजूला असलेल्या भग्न दरवाजातून गडामध्ये प्रवेश होतो. वाटेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत. गडावर हनुमंताचे मंदिर आहे. मंदिर बांधलेले नसल्यामुळे मूर्ती उघड्यावर आहे. गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे. गडाच्या चारही बाजूंना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे गडावर फारशी तटबंदी बांधलेली नाही. गडाचे गडपण दाखविणारी घरांची जोती व कोरडी पडलेली पाण्याची टाकी आहेत.
पावसाळा संपला की गडावर बेसुमार  उंचीचे गवत उगवते. पायवाटही झाकून जाते. वाट शोधून चालताना साऱ्या अंगाला कुसळी काटे टोचू लागतात. पायांत चांगले बूट असल्याखेरीज गडावर येणे धोक्याचे आहे. गडावर असलेले पांडजाईचे मूळ मंदिर पडले आहे. नवीन पडायला आले आहे. मूर्तीची सुद्धा झीज झाली असून मंदिरात जागोजाग मोठाल्या पाली नजरेस पडतात. त्यांचे रानटी रूप पाहून अंगावर काटा येतो.
गडावरून धोम धरणाचा जलाशय सुरेख दिसत असून जलाशयामागे कमलगडाचा उंचावलेला माथा दिसतो. त्यामागे महाबळेश्वर व पाचगणीचे पठार दिसून येते. पांडवगडाच्या माथ्यावरून खाली वाई व कृष्णा नदीही दिसते. केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन किल्ले तसेच वैराटगड सुद्धा पहाता येतो. 
साधारणपणे  सन ११७८ ते ११९३ या काळात राजा भोजाने हा किल्ला बांधला असावा. पुढे तो आदिलशाहीत गेला. पांडवगड परत छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये स्वराज्यात आणला व सन १७०१ मध्ये तो मोगलांकडे गेला. अखेर मेजर थॅचरने सन १८१८मध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात आणला.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!