विशेष लेख 14
वर्धनगड हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एक किल्ला असून सह्याद्रीची एक रांग माणदेशातून जाते तिचे नाव महादेव डोंगर रांग आहे. किल्ल्याला लागूनच असलेल्या ललगूण व रामेश्वर ह्या दोन डोंगरांवरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे. वर्धनगड किल्ला १५०० फूट उंच असून हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून चढण्यासाठी सोपा आहे. जवळ वर्धनगड ,पुसेगाव गावे आहेत. वर्धनगड गड किल्ला यानिमित्ताने…..
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील वर्धनगड हा किल्ला आहे. डोंगर रांगेवर भांडलीकुंडल नजिक कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगावपासून ७ किलोमीटर अंतरावर व सातारा पासून १७ किलोमीटर वर वर्धनगड हा किल्ला बांधलेला आहे.
वर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्क्कम तटबंदी नजरेस पडते. आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. पायथ्याला वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त रस्ता आहे. हा रस्ता थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचतो. रस्त्याने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो. वर्धनगड गावात शिरतांना दोन तोफा आपले स्वागत करण्यासाठी मोठ्या डौलाने उभ्या आहेत. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसऱ्या टोकाशी येऊन पोहचते. ही तटबंदी आजही चांगली आहे.
दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ असून या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोर रस्ता तयार केलेला आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या असून या टेकाडावर चढून जातांना रस्तातच हनुमान यांची भग्न दगडी मूर्ती आहे. शंकराचे छोटेसे मंदिर असून बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी १५ मिनिटे लागतात.
टेकाडावर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून रंगरंगोटी केलेले मंदिर आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी असते. मंदिराच्या गाभाऱ्यात कासवाची सुंदर मूर्ती कोरलेली असून मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून एक रस्ता खाली जातो. या वाटेने गड खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळते.
दि. ५ मे १७०१ रोजी मोगल यांनी पन्हाळा जिंकला. औरंगजेबाने आपले लक्ष्य साताऱ्यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने बादशहांनी खटावला छावणी करावी म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील असा सल्ला दिला होता. याला औरंगजेब यानेही मंजुरी दिली . दि. ८ जूनला फतेउल्लाखान यानेआपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटाव बंदोबस्तासाठी गेला व खटाव ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. मग मोगलांची फौज खटाव येथील ठाण्यात जमा होऊ लागली. आज न उद्या हे सैन्य वर्धनगड गडाला वेढा घालणार हे निश्चित होते, म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील लोकांना आक्रमणाबाबत कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायकां मुलांना किल्ल्यावर नेले. वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखानाकडे पाठविला. किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे. फतेउल्लाखान याने विनंती ताबडतोब मान्य केली. फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळकाढूपणा होता. मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू असल्याने किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील खरा हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार येईल म्हणून वाट पहात राहिला, परंतु एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला नाही. फतेउल्लाखानाला मराठ्यांचा खेळ लक्षात आला व त्याने दि. १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या 40 लोंकाना कैद केले. मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाड्या जाळून टाकल्या. लढाईत मोगलांचे सैनिक प्राणास मुकले. दि. १९जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी “मीर ए सामान ‘ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून 675 मण धान्य, 40मण सोरा व बंदुकीची दारू, 6 मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. औरंगजेब याने किल्ल्याचे नाव बदलून सादिकगड’ असे ठेवले. औरंगजेबाची पाठ फिरताच हा किल्ला मराठ्यांनी परत जिंकला आणि सादिकगड हे नाव बदलून वर्धनगड केले.