जावलीतील वासोटा हा गड किल्ला गिरिदुर्ग व वनदुर्ग असून त्याला 'मिश्रदुर्ग' म्हणतात

विशेष लेख १३

 सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील वासोटा हा एक किल्ला असून पर्यटनाची वेगळी अनुभूती देणारा  आहे. वासोटा हा गड किल्ला गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्ग असून त्याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे. वासोटा (व्याघ्रगड) असा परिचित असून उंची४२६७ फूट असून हा किल्ला चढण्यासाठी 
मध्यम (परिस्थितीनुसार अवघड) असा आहे. वासोटा किल्ला जवळचे गाव कुसापूर, चोरवणे हे असून महाबळेश्वर कोयना डोंगररांगेत वासोटा किल्ला आहे. वासोटा व्याघ्रगड यानिमित्ताने……
कोयना नदीच्या खोर्‍यात निबिड जंगलात  वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’. ज्ञानेश्वरीत वासोट्या याचा अर्थ ’आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच शिवसागर जलाशयात येत असल्यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली असून डोंगर रांगेला समांतर अशी असणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे. ही रांग महाबळेश्वर येथून दातेगडापर्यंत जाते.  दोन रांगा मधून कोयना नदी वाहत असून जावली खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. यालाच शिवसागर जलाशय म्हणतात. शिवसागर जलाशयाचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत येते. शिवसागर जलाशयाचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्री डोंगराची मुख्य रांग आणि शिवसागर जलाशयाचे पाणी यामधील भागात घनदाट जंगल असून पूर्वेला घनदाट जंगल व पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता  वाढली आहे.
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका सांगितली जाते.’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाले असावेे अशी कल्पना असून शिलाहार कालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
वासोट्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईमध्ये नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे जंगल हे आहे. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते व अजूनही हे हे प्राणी येथे आहेत. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावली जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले परंतु वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखान याच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोरोजी सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला ता तो त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. सन१६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढील काळात सन१७०६ मध्ये ताई तेलिणी यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई करुन ८/१० महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय करुन सन१७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखले यांच्या हाती आला.
याबाबत जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख असून तो पुढीलप्रमाणे आहे. 
श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;
तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा असा आहे. 
वासोट्याला किल्ला येथे जाण्यासाठी दोन मार्ग असून एक कोकणातून व दुसरा घाटमाथ्यावरुन जाता येते. कोकणातील ‘चिपळूण’येथून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत रस्ता मार्ग असून या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एस. टी. बसने (एस.टी.बस) जाता येते.  चोरवणे येथून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा असून सातारा-कास-बामणोली असा रस्ता असून महाराष्ट्र राज्य परिवहन च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर असून येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर जलाशय ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध असून येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते.
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर  वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसत आहेत. 
अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग असून या मार्गाने काही अंतर गेल्यावर पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबत पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे असून हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. या जंगलात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला पहायला मिळतात. जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे असून श्वापदांत गवे व अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने व गोंगाट न करता गड चढाई करावी लागते. कुठला प्राणी केव्हा दर्शन देऊ शकतो. गव्यापासून व अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे .
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवी रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागत असून त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.
गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदी कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा व अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मंत्रमुग्ध करतो. बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले असून पिण्यायोग्य पाणी गडावर येथे आहे. झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे जायचे. गडावर सर्वत्र झाडे वाढली असल्यामुळे गडावर वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष व महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. परंतू येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन  होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा असून म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका असून त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे म्हटले आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणार्या पवनुऊर्जा प्रकल्पातील पवनचक्क्याही दिसतात.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!