प्रतापगड किल्ला यानिमित्ताने……

विशेष लेख १२

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील प्रतापगड हा एक महत्वाचा व पुरातन किल्ला आहे. प्रतापगड किल्ला याची उंची ३५५६ फूट असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून चढण्यासाठी सोपा आहे. जवळचे गाव महाबळेश्वर, आंबेनळी घाट असून प्रतापगड हा किल्ला डोंगररांग मध्ये आहे. प्रतापगड किल्ला यानिमित्ताने…… 
सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागातील जावली तालुक्यातील महाबळेश्वर येथील पश्चिमेला १० किलोमीटर अंतरावर प्रतापगड डोंगर असून पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका डोंगरावर प्रतापगड किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वर येथून महाडला जाणारी एस. टी. बस कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगड येथे जाता येते.
मुंबई पुणे येथील पर्यटक व अन्य भागातील पर्यटक यांना वाई येथून महाबळेश्वर मागे अंबेनळी घाटातून प्रतापगड येथे जाता येते. महाड मागे येथूनही प्रतापगड येथे जाता येते. 
प्रतापगड गडावर वाहनतळ येथे गाडी लावली की  गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद केला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती असून ही मूर्ती छत्रपती शिवाजी महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली आहे . या मूर्तीशेजारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे जाताना उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमान मूर्ती दिसते. पुढे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेव मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग असून या मंदिराशेजारी प्रशस्त सदर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत रांगा  दिसून येतात आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.
केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूला राजमाता जिजाबाई यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. उजवीकडे बगीचाच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असून या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. पुतळ्याशेजारी शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम दृश्य नजरेस पडते. किल्ल्याला महादरवाज्या खेरीज घोरपडीचे  चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज असे  बुरूज आहेत.
अफजलखानान याने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले असा इतिहास सांगतो. भवानी मातेच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानी मंदिरात सभामंडप व नगारखाना असून मंदिरापासून १५० पाऊले गेल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागत असून तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा असून विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार असून इतर गडापेक्षा प्रतापगड या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच असून बालेकिल्ल्याच्या ईशान्येस बाजूला किल्यातली दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार असून त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!