ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांची देणी मिळणार : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण, दि. 17 :  साखरवाडी ता फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. या कारखाना प्रश्‍नात आपण ठोस भूमिका घेतल्यामुळेच ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांची देणी मिळणार आहेत. कॉसमॉस को-ऑप. बँकेने एन.सी.एल.टी. कडे तक्रार केल्यानंतर कायद्यातील तरतुदीनुसार एन.सी.एल.टी. केवळ वित्त संस्थांचे पैसे देण्यास बांधील असल्याची भूमिका घेतली. त्यावेळी आपण शेतकरी व कामगारांचे प्रतिनिधी म्हणून समितीमध्ये दाखल होवून वित्तसंस्था प्रमाणेच ऊस पुरवठादार शेतकरी व कामगार कारखाना चालविण्यासाठी आवश्यक असल्याने त्यांची देणीही प्राधान्याने दिली पाहिजेत अशी मागणी केल्यानेच या दोन घटकांना न्याय मिळणार असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. 
255 (अ. जा.) फलटण कोरेगाव विधानसभा पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने साखरवाडी भाजी बाजार मैदान येथे मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आ. दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डी.के.पवार, पंचायत समिती उपसभापती व जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, श्रीरामचे उपाध्यक्ष नितीन भोसले, सरपंच विक्रम भोसले, सतीश माने, राजेंद्र भोसले यांच्यासह साखरवाडी व परिसरातील शेतकरी, कामगार, व्यापारी, ग्रामस्थ उपस्थित होते. 
गैर व्यवस्थापनामुळे श्रीराम आर्थिक गर्तेत रुतुन बंद पडला त्याचप्रमाणे न्यू फलटण शुगरही गतवर्षीचा हंगाम सुरु करु शकला नाही. त्यापूर्वीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेेंट आणि कामगारांची थकीत देणी या कारखान्याने दिली नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांबरोबरच सुमारे 500 हून अधिक कामगार  कुटुंबे मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मार्गाने या प्रश्‍नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न झाला तथापी सोडवणूक होवू शकली नाही. त्यादरम्यान कॉसमॉस बँकेने एन.सी.एल.टी.च्या माध्यमातून आपल्या कर्जाच्या वसूलीसाठी प्रयत्न सुरु केल्याने त्या कायद्यातील तरतुदीनुसार अन्य सर्व मार्गाने होणारे प्रयत्न थांबल्यानंतर ऊस उत्पादक व कामगारांची येणी मिळणार कशी असा प्रश्‍न निर्माण झाल्यानंतर आपण एन.सी.एल.टी.कडे संपर्क करुन या दोन घटकांचे प्रतिनिधी म्हणून न्यू फलटण संबंधीच्या समितीमध्ये आपला समावेश करण्याची मागणी केली, समितीमध्ये समावेश होताच आपण कारखाना चालविण्यासाठी वित्तीय संस्थांप्रमाणेच हे दोन घटकही आवश्यक असल्याचे पटवून देवून त्यांची देणी देण्याची आवश्यकता नमूद केली.
  कारखाना पुन्हा सुरु झाला पाहिजे ही मागणी समितीमध्ये लावून धरल्यानंतरच या दोन घटकांसह वित्तीय संस्थांची देणी देण्याबाबत आणि कारखाना पुन्हा सुरु करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे नमुद करीत आगामी काळात या कारखान्याला पूर्ववैभव प्राप्त करुन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना बंद पडल्यानंतर अनेक मार्गाने प्रयत्न झाले मात्र यश येत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपण सहकार कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करुन आतापर्यंत कधीही न झालेला निर्णय करुन 2 सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून एक नवी सहकारी संस्था निर्माण करुन त्या माध्यमातून श्रीराम चालविण्याचा अनोखा प्रयत्न केला. त्यामध्ये यश येवून आज श्रीराम कोट्यावधीच्या कर्जाची परतफेड करुन नव्या जोमाने मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप व साखर उत्पादनासाठी आघाडीवर राहून यशस्वी झाला आहे. ऊस उत्पादक व कामगारांची सर्व थकीत देणी देवून नियमाप्रमाणे ऊसाचे पेमेंट आणि कामगार पगार देत पुन्हा डौलाने उभा राहिलेला श्रीराम पाहिल्यानंतर साखरवाडी बाबतही असा आशावाद व्यक्त करण्यात आपल्याला कोणतीही अडचण दिसत नाही किंबहुना आपण साखरवाडीलाही पुन्हा व्यवस्थीत सुरु झालेला आणि ऊस उत्पादक व कामगारांना दिलासा देणारा साखर कारखाना निश्‍चित पुन्हा उभा करु याची ग्वाही श्रीमंत रामराजे यांनी दिली.  
न्यू फलटण शुगर प्रश्‍नी सुमारे दिड दोन वर्षे सर्वांनीच आपापल्यापरीने प्रयत्न केले परंतू कोणालाही यश आले नाही अशा परिस्थितीत ज्यांनी शेतकरी व कामगारांचे नुकसान केले त्यांच्या पाठिशी उभा राहून शेतकरी व कामगारांना देशोधडीला लावण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर ते कधीच स्विकारले जाणार नाही या कारखान्याच्या प्रश्‍नात पूर्वीच्या सत्ताधार्‍यांच्या डोळ्यात पाणी आले म्हणून ज्यांना वाईट वाटले त्या खासदारांना 545 कामगार कुटुंबातील बायाबापड्यांच्या डोळ्यातील पाणी दिसले नाही का? असा सवाल करीत हा कारखाना वाचविण्यासाठी यापूर्वीही आपण कारखान्याच्या गेटवर थांबून संरक्षण दिले त्यानंतरही वेळोवेळी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून देत या तालुक्यात असलेला दुष्काळ कायमचा संपविण्यासाठी आणलेले कृष्णेचे पाणी, कमिन्सच्या माध्यमातून या तालुक्यातील तरुणांना उपलब्ध करुन दिलेली उद्योग व्यवसायाची संधी, शेतमालाला रास्तदर मिळाले पाहिजेत, ऊसाला योग्य दर मिळाला पाहिजे, याचबरोबर शेती व शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेल्या विविध शासकीय योजना प्राधान्याने राबविल्या गेल्या पाहिजेत, तालुक्यात प्रत्येक कुटुंबाला वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण या मुलभूत सुविधा वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही आपण केलेले प्रयत्न सर्वश्रृत आहेत. फलटण येथे कृषी, उद्यानविद्या, अभियांत्रीकी आणि आर्ट सायन्स, कॉमर्स महाविद्यालये, सक्षमपणे उभी करुन तरुणांना शिक्षणाच्या सर्व सुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्याने शहर व तालुक्यातील विद्यार्थी/विद्यार्थीनींना येेथेच उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. 
या सभेतच खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यपध्दतीवर सडकून टिका करीत साखर उत्पादन होण्यापूर्वीच त्याची विक्री करण्यात आल्याने हा कारखाना आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करीत कारखाना अडचणीत आल्यावर प्रल्हादराव साळुंखे पाटील आणि कामगारांना रामराजे यांची आठवण येते मात्र निवडणूकीत रामराजेंच्या विरोधी भूमिका घेवून अगदी माझ्या भावाचाही पराभव करण्यासाठी ही मंडळी पुढे सरसावतात आणि त्यांना तुम्ही साथ करता ही बाब दुर्देवी असल्याचे स्पष्ट करतानाच तरीही या तालुक्यातील कोणाचेही नुकसान होणार नाही, कोणालाही ते करु देणार नाही ही भूमिका घेवून आपण आतापर्यंत काम केले आणि सतत या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट करीत यापुढेही आपली तीच भूमिका कायम राहणार असून त्यामध्ये कोणी चूकीची भूमिका घेतली तर आपण त्याला विरोधच करणार असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. 
प्रारंभी माजी सभापती शंकरराव माडकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आगामी विधानसभा निवडणूक, न्यू फलटण शुगर व अन्य प्रश्‍नांबाबत आपली मते व्यक्त केली. शेवटी महेश भोसले यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. 
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर साखरवाडी भाजी बाजार मैदान येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, न्यू फलटण शुगर वर्क्स विषयी सविस्तर माहिती देत असताना मोठ्या पावसाला सुरुवात झाली मात्र सभेतील शेतकरी, कामगार, ग्रामस्थ यापैकी कोणीही सभेतून उठले नाही किंवा बाजूला जावून अडोशाला उभा राहून सभा ऐकण्यासाठीही कोणी जागेवरुन हालले नाही भर पावसातही सभा सुरुच राहिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!