महाबळेश्वर येथील डोंगर रांगेत अनेक ऐतिहासिक गड

विशेष लेख ९

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महाबळेश्वर परिसरातील कमळगड हा किल्ला असून नाव  कमालगड असे उच्चारले जाते. कमळगडावरील गेरूची भिंत व जिना हे खास वैशिष्टय़े असून उंची ४२०० फूट आहे. कमळगड किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारातील असून चढण्यासाठी सोपा आहे. नांदगणे, वाई, महाबळेश्वर येथील कमळगड यानिमित्ताने…… 
सह्याद्री डोंगररांगमधील महाबळेश्वर वर कमळगड आहे. महाबळेश्वर येथील डोंगर रांगेत अनेक ऐतिहासिक गड किल्ले यांनी अलंकार रुप धारण केले आहे. धोम धरण जलाशय असलेले मागील बाजूस एक डोंगररांग आलेली असून दोन्ही बाजूला पाण्याचा वेढा असलेल्या या पर्वतरांगेत कमळगड एक अनोखे पाषाण निर्माण झाले आहे. दक्षिण बाजूला कृष्णा नदी खोरे व उत्तर बाजूला वाळकी नदी खोरे यांच्यामध्ये  दिमाखदार कमळगड किल्ला उभा आहे.
कमळगडावर जाण्याचे अनेक मार्ग असून पर्यटक यांना  ट्रेकिंगचा मनमुराद आनंद देणारे हे ठिकाण आहे.
महाबळेश्र्वर केट्स पॉईंटवरून खाली येणार्‍या सोंडेवरून कृष्णा नदीच्या खो-र्‍यात उतरले की सुमारे दोन तासांत समोर डोंगर उतारावरील नांदवणे गाव आहे . पर्यटक पहाडावरून वर गेले की दोन ते अडीच तासांत कमळगडावर पोहचतो. वाई येथून नांदवणे गावी जाण्यास सकाळी ९.३० वाजता एस.टी. बस आहे.
उत्तरेकडून वाळकी नदीच्या खोर्‍यातील असरे, रानोला वासोळे येथे जाणेसाठी वाई येथून एस.टी.  बस जाते. 
१५ ते २०  मिनिटांच्या गडाच्या जवळ निकट जाता येते. गडावर गेलेवर गड माथ्याच्या सपाटीवर प्रवेश होतो व आजुबाजूला असणारा डोंगरदर्‍यांचा सुंदर निसर्ग आपल्याला पहायला मिळतो. नेहमी किल्ल्यावर आढळणारे प्रवेशद्वार, बुरूज असे येथे काही दिसत नाही.
कमळगडाला जोडून एक डोंगर रांग लक्ष वेधून घेत असून तिला नवरानवरी चा डोंगर असे संबोधले जाते. जमीन चिरत गेलेले ४०-५० फूट लांबीचे एक रुंद भुयार दिसत असून त्यामध्ये उतरायला मजबूत पायर्‍या आहेत. त्याला गेरू अथवा कावे विहीर म्हटले जाते. ५० – ५५ खोल पायर्‍या उतरताना डोंगराच्या पोटात जात असल्यासारखा भास होतो. तळाशी पोहचल्यावर चहोबाजूला खोल कपारी असून सर्वत्र गेरू किंवा काव यांची ओलसर लाल रंगाची माती आपणाला दिसते. 
कमळगडावर दक्षिणेला कातळ नैसर्गिक भिंत तयार झाली असून तिच्यावर बुरुजाचे थोडेफार बांधकाम झाले आहे. गडावर कोठेही पाण्याचे टाके नसून दक्षिणेकडे गवतातील चौथर्‍यांचे अवशेष दिसतात. नैर्ऋत्ये बाजूला केंजळगड, पाठीमागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार व पश्चिमेला पाचगणी, पूर्वेला धोम धरण अशी रम्य सोबत या कमळगडाला लाभली आहे. धोम येथील हेमाडपंती शिवमंदिर प्रेक्षणीय असून हे मंदिर धोम ऋषीं यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झाले आहे. मराठी कवी वामन पंडित यांची भोमगाव येथे जवळ समाधी आहे. कमळगडावरील कोरीव शिड्यांचे बांधकाम नजरेस पडते.
वासोळा येथून धोम गाव पासून सुरू झालेला धोम धरण जलाशय थेट गावापर्यंत साथ देतो. वासोळे गावातून पाणवठ्याच्‍या दिशेने गड चढणीला सुरुवात केली असता साधारण एक ते दीड तासात गडाजवळ माची येथे जाता येते.
वासोळे गाव हे डोंगराच्या कुशीत वसलेले असून निसर्ग सौंदर्याने नटलेले खेडे गाव आहे. वस्तीला लागून मागे उत्तुंग कडा व डोंगरमाथा असून दुसर्‍या बाजूला खोल दरी आहे. पुढे गेल्यावर यू टर्न घेतला असता चालत राहिलेवर पाऊण तासानंतर किल्ल्याचा मुख्य पहाड लागतो. डोंगरमाथ्यावरील घनदाट वृक्षांच्या छायेत गोरखनाथ मंदिर दिसत असून थोडे पुढे ५ – १० मिनिटे चालत गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला एक पाण्याचे टाके लागते. पाऊलवाटेने वर गेले की १५ – २० मिनिटांचा घनदाट जंगलाचा छोटा टप्पा लागतो. नंतर मात्र एक मोकळे मैदान लागते. धनगरांची वस्ती असून याच पठारावरून कमळगड पूर्णपणे दृष्टिपथात येतो. वस्तीपासून उजवीकडे गडावर जाण्याची वाट आहे.
गडावर रहाण्याची सोय नाही. माचीवरील गोरखनाथ मंदिर येथे ५/६ जण राहू शकतात.
पाण्याची सोय  गडावर नाही, गोरखनाथ मंदिराच्या थोडे पुढे छोटे टाके आहे. कमळगडावर नांदवणे मार्गे अडीच तास लागतात.
गड किल्ले पर्यटक यांना पर्यटन करणेस प्रवृत् करत असले तरी ऐतिहासिक नजराणा खुप काही सांगुन जातो आणि हीच खरी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली संपत्ती असून ती आपण जपणे हे सर्वाचे आद्य कर्तव्य आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!