समाजाची निरपेक्ष सेवा करण्याची मानसिकता यामुळेच मधुबनी, हेमलकसा आणि आनंदवन हे प्रकल्प उभे राहिले

फलटण, दि. 16 : वैचारिक बैठकीचा वारसा, आव्हानात्मक परिस्थितीत काम करताना येणार्‍या संकटांना समोरे जाण्याची तयारी, समाजाची निरपेक्ष सेवा करण्याची मानसिकता यामुळेच मधुबनी, हेमलकसा आणि आनंदवन हे प्रकल्प उभे राहिल्याचे स्पष्ट करीत आम्हाला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या वैचारिक बैठकीचा वारसा आणि मानसिक तयारी लाभल्याचे प्रतिपादन डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले. 
जागतिक अस्थिरोग दिनाचे औचित्य साधुन प्रतिवर्षी जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटणच्यावतीने डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी आणि सहकारी मॅरेथॉन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करतात, त्याप्रमाणे यावर्षीही मॅरेथॉन आणि सामाजिक क्षेत्रात उज्वल काम करणार्‍या संस्था/व्यक्तींचा गौरव अशा संयुक्त कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. प्रकाश बाबा आमटे व सौ. मंदाकिनी प्रकाश आमटे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर, श्रीमती जयश्री जोशी, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी, ह.भ.प. जाधव महाराज, डी.एम. घनवट, काटकर महाराज, सुरेश कोकीळ, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले सुमारे 1200 स्पर्धक आणि फलटणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
हेमलकसा प्रकल्पाची उभारणी करताना भाषेची अडचण त्याचबरोबर तेथील आदिवासीमध्ये असलेली अंधश्रध्दा, मांत्रिकाकडे जाण्याची मानसिकता यामुळे प्रारंभी अनंत अडचणींचा सामना करावा लागला, दूर अंतरावरील रुग्ण, जखमी व्यक्ती, अत्यवस्थ रुग्णांना औषधोपचाराद्वारे आजारातून बाहेर काढण्यात आलेले यश पाहिल्यानंतर अदिवासींचा आमच्यावर विश्‍वास बसला. कोणतीही साधन सुविधा नसताना प्रतिकुल परिस्थितीत गर्भवती महिला किंवा मूल दोन्ही पैकी एकालाच वाचविता येणार असल्याच्या कठीण परिस्थीतीत मातेला वाचविल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या परंतू पुरेशा साधने सुविधां अभावी अन्य पर्याय नसल्याने तो निर्णय घ्यावा लागला आता तिसर्‍या पिढीत सुसज्ज ऑपरेशन थिएटर व साधने सुविधांसह सर्व व्यवस्था उपलब्ध झाल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले. 
आदिवासी काही प्रमाणात सुधारत असले तरी त्यांच्यामध्ये आजही उंदीर, वानराचे मांस खाणारे आहेत परंतू त्यांच्यामध्ये बदल होत असून ते एकमेकांना मदत करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज आमचीही तिसरी पिढी सेवा कार्यात आघाडीवर राहुन काम करीत असल्याने रुग्णालयाबरोबर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे नमुद करीत आपली दोन्ही मुले व सुना आणि त्यानंतर आता नातू या कामात झोकून देवून काम करीत असल्याने या प्रकल्पाला मोठे स्वरुप प्राप्त झाल्याचे डॉ. प्रकाश आमटे यांनी स्पष्ट केले. 
प्रबळ इच्छाशक्ती आणि बाबांच्या विचारावर असलेल्या श्रध्देच्या बळावर आपण उभयतांनी या प्रकल्पात काम केले त्यानंतर आलेली दुसरी पिढी आणि आता तिसरी पिढीही त्याच श्रध्देच्या बळावर प्रबळ इच्छाशक्तीच्या आधारे हा प्रकल्प यशस्वीपणे हाताळत असल्याचे समाधान व्यक्त करीत प्राण्याशी प्रेमळपणे वागल्यानंतर ते ही आपल्याला प्रेम देतात याची अनेक उदाहरणे देत हिंस्त्र श्‍वापदांशीही आमचे आपुलकीचे नाते निर्माण झाल्याचे नमुद करीत साप गळ्यात घालुन फिरणारी छोटी नात हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे डॉ. प्रकाश आपटे यांनी स्पष्ट केले.
जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे 1200 स्पर्धकांचे स्वागत करुन डॉ. जोशी यांनी या क्षेत्रात केलेले काम कौतुकास्पद असून जोशी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी दिलेली वैद्यकिय सेवा आणि सामाजिक कार्यात आघाडीवर राहुन राबविलेले विविध उपक्रम याचा आम्हा फलटणकरांना सार्थ अभिमान असल्याचे नमुद करीत आज विविध क्षेत्रात काम करुन समाजाला दिलासा देणार्‍या पाचही संस्था/व्यक्तींचे काम असेच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट करीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील विविध धर्मियांची एकजुट आणि येथील प्राचीन मंदिरे हे फलटणचे वैभव असल्याचे नमुद केले. मानवतेच्या भूमिकेतून आमटे दाम्पत्य किंबहुना संपूर्ण कुटुंबाने केलेले काम इतरांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणारे असल्याचे गौरवोद्गार श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केेले. 
पाणी फौंडेशनच्या माध्यमातून डॉ. अविनाश पोळ यांनी उभे केलेले काम, भिकार्‍यांचे डॉक्टर डॉ. अभिजीत सोनवणे यांनी वैद्यकिय क्षेत्रात केलेले काम, लक्ष फौंडेशनच्या माध्यमातून  अनुराधा प्रभूदेसाई आणि साधना व्हिलेजच्या श्रीमती मेधा टेंगशे यांनी आपल्या क्षेत्रात केलेेले काम प्रेरणादायी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुकुलाला असलेले महत्त्व आणि त्या माध्यमातून नव्या पिढीला दिले जाणारे शिक्षण निश्‍चितच समाज घडविणारे आहे या कामात युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी भगवान मामा कराडकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभे केलेले राष्ट्रबंधू राजीव दिक्षीत गुरुकुल ही संकल्पनाच समाजहिताला प्रोत्साहन देणारी आणि खर्‍या अर्थाने नवसमाज निर्मितीची मुहूर्तमेढ असल्याचे नमूद करीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ. मंदाताई आमटे यांनी या संस्थांचे कौतुक केले. त्यानंतर या संस्थां/व्यक्तींना जोशी हॉस्पिटलच्यावतीने गणेशमूर्ती, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप सन्मानपत्र आणि देणगीचा धनादेश देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या दरम्यान या 5 ही संस्थांच्या सामाजिक कार्याची माहिती देणारी व्हिडीओ क्लीप उपस्थितांना दाखविण्यात आली. त्यानंतर हेमलकसा व अन्य सामाजिक उपक्रमांची/प्रकल्पांची माहिती देणारी व्हीडीओ क्लिपही उपस्थितांना दाखवून डॉ. प्रकाश आमटे व कुटुंबियांच्या सामाजिक कार्याची महती आणि माहिती उपस्थितांसमोर ठेवण्यात आली. 
यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सौ. मंदाताई आमटे यांचा विशेष सत्कार शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप, गणेश मूर्ती व मानपत्र देवून ह.भ.प. बंडातात्या कराडकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ध्यास पर्व या  स्मरणीकेचे व पथदिप या सुहास इतराज यांच्या कवितेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
जागतिक अस्थिरोग दिनाचे निमित्ताने 3, 5, 10, कि.मी. मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती आणि फलटण येथील सुमारे 1200 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये 6 वर्षे वयापासून 85 वर्षेवयाच्या स्पर्धकांचा समावेश होता. या स्पर्धेत मॅरेथॉन व वॉकेथॉन मध्ये सहभागी होवून प्रत्येक गटात प्रथम आलेल्या तीन स्पर्धकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक 5 हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक 2 हजार रुपये रोख सन्मानपत्र, रौप्य पदक, तृतीय क्रमांक 1 हजार रुपये रोख सन्मानपत्र, कास्यपदक याप्रमाणे पुरस्काराचे वितरण करण्यात आले.  
यावेळी डॉ. प्रणिल भोईटे यांचा आयर्नमॅन स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल तसेच सायकल ग्रुप तर्फे डॉ. प्रसाद जोशी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने झाली तर डॉ. प्रसाद जोशी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात गेल्या 5/6 वर्षात जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम उपक्रमांविषयी माहिती देवून त्याविषयी सविस्तर विवेचन केले. डॉ. सौ. प्राची जोशी यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेषा जोशी यांनी केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!