18 व्या शतकातील राजकारणाचा साक्षीदार कराड तालुक्यातील किल्ला सदाशिवगड

विशेष लेख 8

सदाशिवगड  हा गड किल्ला कराड तालुक्यात असून गड किल्ल्याची उंची ३०५० फूट असून हा गड सुर्ली घाट डोंगर रांगेतील गड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. चढण्यासाठी हा गड किल्ला सोपा असून कराड, ओगलेवाडी, हजारमाची ही गडाजवळची गावे आहेत.  18 व्या शतकातील राजकारणाचा साक्षीदार असलेला सदाशिवगड किल्ला यानिमित्ताने….. 
 सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर किल्ले सदाशिवगडचा डोंगर आहे. समुद्र सपाटी पासून या किल्ल्याची उंची सुमारे ३०५० फूट आहे. पायथ्याशी असलेल्या ओगलेवाडी (हजारमाची)  गावातून  सदाशिवगड डोंगरावर जाता येते. संपूर्ण रस्ता पायऱ्यांचा असून सुमारे १००० पायऱ्या आहेत.
सदाशिवगड डोंगर अफझल खानाच्या वधानंतर (दि. १० नोव्हेबर १६५९ ) छत्रपती शिवाजीच्या महाराज यांच्या ताब्यात सदाशिवगड गड किल्ला आला. 
कऱ्हाड शहर व परिसरावर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराड येथून पलूस-विटा याकडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्या द्रष्टीने  व सोयीसाठी छत्रपती शिवाजी राजे यांनी सदाशिवगड बांधून घेतला.
सदाशिवगडावर महादेव मंदिर असून तिथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. समोर एक आड (चौकोनी विहीर) असून त्यामध्ये १२ महिने पाणी असते. शेजारीच मारुती छोटेखानी मंदिर आहे. गडावर किल्ल्याबाबत कोणतेही अवशेष शिल्लक नसून काही ठिकाणी केवळ जोतीच शिल्लक असल्याचे दिसून येते.
सदशिवगडाखाली घेर्‍यामध्ये जिथे वस्ती आहे तो भाग हजारमाची, बाबरमाची, राजमाची आणि वनवासमाची (गडमाची) या नावाने ओळखले जात आहेत. येथील प्रत्येक वस्तीमधून गडावर येण्यासाठी पाऊल वाटा आहे. हजारमाची पासून सदाशिवगडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या असून पायरीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. खाजगी वाहने पायरीपर्यंत जातात. पायरी रस्त्याने सदाशिवगड माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजूस चिंचेच्या झाडाखाली एक विहीर असून चिंच विहिर या नावाने ओळखतात. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत.  विहिरीत 12 महिने पाणी असते. विहीर पाहून गडावरील मंदिराच्या दिशेने निघाल्यावर एक कोरडा तलाव दिसतो. तलावाजवळ नक्षत्र उद्यान निर्माण करण्यात आले असून तलावाच्या पुढे महादेव (सदाशिव) मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठी विहीर असून विहिरीला बारमाही पाणी असते. विहिरीच्या बाजूला कड्या लगत हनुमान मंदिर आहे. महादेवाचे दर्शन घेउन विहीरीपुढे थोडे अंतर चालत गेल्यावर एक उद्यान आहे. उद्यान उजवीकडे आणि दरी डावीकडे असून  किल्ल्यावर झेंडा लावलेल्या ईशान्य टोकाकडे चालत जावे लागते. उद्यानानंतर एक कोरडा मोठा तलाव असून तो पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या ईशान्य टोकाच्या अलिकडे डाव्या बाजूला दोन पाण्याची टाकी आहेत. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला कड्याला लागून ३ टाकी आहेत. याठिकाणी टाक्यांपर्यंत जाण्यासाठी कातळात पायर्‍या खोदलेल्या असुन टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही.
सदाशिवगडावर जाताना वाटेत दुर्गादेवी मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर 7 मोठ्या तोफा वाटेत ठेवल्या आहेत.  ब्रिटिश राजचिन्ह तुटलेल्या अवस्थेचा दगडी भाग ठेवला आहे. सदाशिवगड याविषयी इतिहास सांगणारा फलक मंदिरात लावलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मंदिराला 2  वेळा भेट दिल्याची नोंद आहे. १७१७ साली सौंधेकर राजा बसवलिंग यांनी बांधून आपल्या पराक्रमी पित्याचे नाव सदाशिव गडाला दिल्याची नोंद आहे. १७९९ साली ब्रिटिशांनी हा गड ताब्यात घेतल्यावर ब्रिटिश राजचिन्ह येथे लावले. दुर्गादेवी मंदिर गडाच्या मध्ये आहे तर खाली भव्य दर्गा आहे. दर्गा मध्ययुगातील ऍबिसिनियातून आलेल्या एका अवलिया याचा असून दुर्गादेवी मंदिर पाहून आपण मंदिराच्या वरच्या भागात असणारा किल्ला फक्त प्रवेशद्वार आणि थोडीफार तटबंदी एवढाच शिल्लक आहे.
सदाशिवगड 18 व्या शतकातला इतिहास फारच रंजक असून सन १७५० मध्ये पोर्तुगीज गव्हर्नर कोंदी-द-ताव्हरने पोर्तुगीज राज्य विस्तारासाठी सदाशिवगड ताब्यात घेतला.  काही काळाने परत सौंधेकर यांच्या ताब्यात दिला. सन १७६४ साली हैदरअली याने सौंधेकरांचे राज्य जिंकून सदाशिवगड किल्लाही घेतला. सन १७६८ मध्ये पोर्तुगीज यांनी हैदरच्या सैन्याकडून सदाशिवगड घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सौंधेकर राजा पोर्तुगिजांच्या आश्रयास बांदोडा येथे येऊन राहिला. पोर्तुगिजांनी सौंधेकरास हैदर अलीकडून राज्य परत मिळवून देण्याचा करार केला परंतु पोर्तुगीज राज्य परत मिळवून देण्याच्या बाबतीत बराच काळ स्वस्थ बसले. तेव्हा सौंधेकराने पुणे दरबारात पेशव्यांना पत्र व्यवहार करून राज्य हैदरकडून परत मिळविण्यासाठी विनंती केली.  पेशव्यांनी सौंधेकरांस पुण्यास वास्तव्यास येण्याचे सांगितले ही बाब पोर्तुगिजांना कळालेवर सौंधेकर राजास पुण्याला जाण्यास विरोध केला व पोर्तुगीज देत असलेल्या तनख्यावर कायमस्वरूपी बांदोडा येथेच राहावे असा करार करून घेतला. करार होण्यापूर्वीच पोर्तुगिजांनी टिपू सुलतान यांच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन सदाशिवगड ताब्यात घेतला. दि. २४ जानेवारी १७९१ रोजी पेशव्यांच्या आरमाराने पोर्तुगिजांकडून किल्ला जिंकून घेतला तथापी दि. ३० जानेवारीला लगेच तो परत पोर्तुगीज यांनी ताब्यात घेतला.  
पुणेतून पोर्तुगीज यांना सदाशिवगड ताब्यात घेतल्याबद्दल अनेक पत्रे आली परंतु पोर्तुगिजांनी आपण सौंधेकरांसाठी सदाशिवगड ताब्यात घेतला असल्याचे कळविले परंतू पोर्तुगिजांना हा किल्ला सौंधेकरांना द्यायचा नव्हता. पोर्तुगिजांनी सदाशिवगड ताब्यात घेतल्यापासून दीड वर्ष पुणे दरबारातून सदाशिवगडाविषयी बरेच राजकारण झाले. 
पेशव्यांचे सरदार परशुरामभाऊ पटवर्धन टिपू सुलतान विरुद्धच्या मोहिमेनिमित्ताने कारवार भागात आले होते. तेव्हा त्यांनी आणि काणकोण भागातील देसाई निळू नाईक यांनी पोर्तुगिजांकडे सदाशिवडगडाबाबत बरेच राजकारण केले.
पोर्तुगिजांनी टिपू सुलतानशी स्नेह वाढवून टिपूला सदाशिवगड देण्याचे ठरविले. परशुराम भाऊंबरोबर पेशव्यांचे आरमार दर्यासारंग बाबूराव साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कारवार जवळच होते. मराठा आरमाराने सदाशिवगडावर हल्ला करत सदाशिवगड ताब्यात घेतला.  टिपू आणि पेशवे यांच्यात तह झाला. तहाच्या अटीनुसार सदाशिवगड परत टिपूला मिळाला. लवकरच इंग्रजांनी टिपूचे राज्य जिंकले व त्यांमध्ये सदाशिवगडही मिळाला. 
सदाशिवगडाच्या अलीकडे पोळे येथे पोर्तुगीज यांची चौकी पोर्तुगीज ब्रिटिश राज्यांची सीमा बनविली. यानिमित्ताने 18 शतकातही राजकारण किती अस्थिर होते हे समजते. सर्व राजकारणाचा साक्षीदार म्हणून सदाशिवगड आजही  थोड्या अवशेषांसह उभा आहे.
व्यतिरिक्त सदाशिवगड गडावर इतर अवशेष नाहीत.
संपूर्ण गड फिरण्यास अर्धा तास लागतो.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!