सातारा जिल्हा व पाटण तालुक्यातील एक किल्ला दातेवाडी गड उफ सुंदरगड किल्ला

विशेष लेख 7

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील टोळेवाडी येथील बामणोली डोंगर रांगेतील दातेवाडी हा गड किल्ला असून उंची  1027 मीटर आहे. गिरिदुर्ग प्रकारातील आणखी हा एक किल्ला असून चढण्यासाठी सोपा आहे. हा गड किल्ला प्रेक्षणीय असून पाहता क्षणी नजरेत भरतो. दातेवाडी उफ सुंदरगड किल्ला यानिमित्ताने….. 
पाटण तालुक्यातील दातेवाडी या गडाजवळ पाटण, टोळेवाडी डोंगररांग  हे गाव आहे. पाटण जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून आजपर्यंत उपेक्षित राहिला आहे. गडाच्या चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची (खडक) तटबंदी या दातेगडाला लाभलेली असून  दातेगडाचे दुर्ग वैशिष्ट्य म्हणजे  गडावरील बऱ्याच वास्तू दगडामध्ये फोडून व खोदून करुन तयार केलेल्या आहेत.
पर्यटक यांना दातेगडवर जाण्यासाठी कराड-कोयनानगर रस्त्यावरुन पाटण गावातून चाफोली रस्त्याने जावे लागते. त्यानंतर येथे जाण्यासाठी फक्त १५ मिनिटे चालल्यावर, डाव्या बाजूला लाल माती असलेली पाऊलवाट आहे.  सदरची पाऊलवाट थोड्या अंतरावर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेला मिळते. रस्त्याने ४५ मिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागत असून दर्ग्यासमोर असणार्या टेकडीच्या धारेपासून पाऊल वाटेने पठारावर जाता येते. साधारण २० मिनिटे अंतरावर गडाच्या पायथ्याला टोळेवाडी गाव आहे. परिसरातील हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे आवश्यक असून आपण पर्यटक नवीन असल्याने अन्यथा इतरत्र भरकटत जाण्याची दाट शक्‍यता आहे.
एक रस्ता चाळकेवाडी मागे तर दुसरा रस्ता टोळेवाडी येथून गडाकडे जातो. टोळेवाडी गाव पार केल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला परत एक लाल मातीची  पाऊलवाट आहे. या पाऊल वाटेने टेकडी पार केल्यावर पुढे पायरी वाटेने दातगडावर पोहोचतो. दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यास साधारण दोन तास लागतात.
दातेगडाचे क्षेत्रफळ 2 हेक्‍टर असून गडाच्या पश्‍चिम बाजूला भग्न प्रवेशद्वार असून याचा दरवाजा १९६७ च्या प्रलयकारी कोयना भूकंपामध्ये कोसळला असल्याचे सांगितले जाते. बाजूला जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळ कातळात खोदलेल्या 30 पायर्‍या आहेत. 
दातेगडालाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुंदरगड असे नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातील असल्याचे स्पष्ट होत आहे. दातेगडावर छत्रपती शिवाजी महाराज स्थापित कचेरी व कायमची शिबंदी होती ही शिबंदी करिता गडाशेजारील गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. दातेगड किल्ला काही काळ मोगल यांच्या अधिपत्याखाली होता तथापी मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट यांनी दातेगड किल्ला न लढताच जिंकला.
दातेगड उफ सुंदरगड पश्चिम तटावरील भग्न दरवाज्याशेजारी 6  फूट उंचीची गणेशमूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. गणेश मूर्तीशेजारी उजव्या हाताला 10 फूट उंचीची हनुमान मूर्ती आहे. दातेगड परिसर पाहून झालेवर पायरी मार्गाने वर गेल्यावर 30 मीटर खोल खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते.
दातेगडावर तलवारीचा आकार असलेली भव्य विहीर असून  ती इतिहासकालीन शिल्पकलेची चुणूक दाखवते. किल्ल्याच्या पश्चिम टोकावर अखंड खडकात खोदलेली ही विहीर किल्ल्याच्या दक्षिणेला आहे. विहिरीत उतरण्यासाठी ४१ पायऱ्या आहेत. त्यापैकी काही पायऱ्या मोडलेल्या अवस्थेत असून पायऱ्या उतरून विहिरीत उतरल्यानंतर विहिरीच्या मध्यभागी पश्चिम बाजूला महादेव मंदिर खोदले आहे. त्याचा आकार सुमारे आठ फूट लांब, सात फूट रुंद सहा फूट उंच आहे. या मंदिरावरूनच या तलवार विहिरीची भव्यता दिसून येते. मंदिरात शिवलिंग आहे. मंदिरापासून खाली काही अंतरावर पाणी आहे.तलवार विहिरीची खोली किती हे सांगता येत नाही. मात्र वरून पाण्यात दगड टाकला की विशिष्ट आवाज येतो. पर्यटक यांनी हे ऐकल्याने गडावर येणारा प्रत्येक जण विहिरीत दगड टाकून आवाज ऐकण्याचा प्रयत्न करतो मात्र यामुळे विहीर दगडाने भरून काढण्यास हातभार लावतो.
 विहीरीला असणारे पायर्‍यांनी खाली तळाकडे गेल्यानंतर पाण्याच्या थोडे अलीकडे डाव्या हाताला खडकात खोदलेले महादेव मंदिर येथे आहे. छोट्या मंदिरात शिवलिंग व नक्षीदार नंदी असून वैशिष्ट्यपूर्ण विहीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे.  विहीर पाहून परत वर येऊन गडाच्या उत्तर बाजूला गेल्यावर कातळात ८-१० फूट खोदलेला चौकोन दिसत असून  दातेगडाच्या उत्तर बाजूला असणारी तटबंदी मात्र अजून चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसून येते आहे. दातेगड संपूर्ण फिरण्यासाठी फक्त दोन तास पर्यटक यांना वेळ द्यावा लागतो.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!