कोजागिरी पौर्णिमा महत्त्व

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त देवी मंदिरातील विशेष पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी (मोती तयार करणारी) असेही संबोधिले जाते.
 पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति’ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.
आश्विन पौर्णिमेस होणारा प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटले आहे. बौद्धकाळात हा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. या दिवशी बळीराजाची पूजा करावी असे वामन पुराणात सांगितले आहे.
सुरासुरेंद्रादिकिरीटमौक्तिकैर्युक्तं सदा यत्तव पादपंकजम्।
परावरं पातु वरं सुमंगलं नमामि भक्त्याखिलकामसिद्धये।।
भवानि त्वं महालक्ष्मी: सर्वकामप्रदायिनी।।
सुपूजिता प्रसन्ना स्यान्महालक्ष्मि नमोस्तु ते।।
नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात्।।
ॐ महालक्ष्म्यै नम:, प्रार्थनापूर्वकं समस्कारान् समर्पयामि।
या श्लोकाने लक्ष्मी देवतेची पूजा केली जाते.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते.
या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते. उपोषण, पूजन व जागरण या तीनही अंगांना या व्रतात सारखेच महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी व इंद्र बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात व मग त्या दोघांना पुष्पांजली समर्पित करतात. अशी पूजा झाल्यावर पोहे व नारळाचे पाणी देव-पितरांना समर्पून व आप्तेष्टांना देऊन स्वत: सेवन करतात. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात.दुसऱ्या दिवशी प्रात:काळी बळीराजा-लक्ष्मीची पूजा करून व सर्वांना भोजन घालून पारणे करतात. 
ब्रह्मपुराणात या व्रताची कृत्ये थोडी निराळी सांगितली आहेत. रस्ते झाडावेत. घरे सुशोभित करावीत. दिवसा उपवास करावा. गृहद्वाराजवळ अग्नी प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवावा. भार्येसह रुद्र, स्कंद, नंदीश्वर, ज्यांच्याकडे गायी असतील त्यांनी सुरभी, मेंढे बाळगणाऱ्यांनी वरुण, हत्ती बाळगणाऱ्यानी विनायक व घोडे बाळगणाऱ्यांनी रेवंत व निकुंभ या देवतांची पूजा करावी.
विविध मंदिरांमध्ये कोजागरी पौर्णिमा पूजा- अर्चा करून साजरी केली जाते. लक्ष्मीची उपासना केली जाते.
कोजागरी पौर्णिमा या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची ‘आश्विनी’ साजरी करतात.
कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते.
निसर्गाबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी कोकणात नवान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या, कुरडूची फुले, नाचणी, वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते.
या दिवशी घरांघरांत नवीन धान्य आलेले असते. भात, नाचणी, वरी आदी प्रकारच्या धान्याची एकप्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नवान्न पौर्णिमा. या दिवशी नवीन तांदळाचा भात, खीर करण्याची प्रथा आहे. पक्वान्न म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात, अशी प्रथा कालविवेक या ग्रंथात नोंदविलेली दिसते. घरासमोर लावलेल्या हरतऱ्हेच्या भाज्या नवान्न पौर्णिमेला महत्त्वाच्या ठरतात. नवीन धान्य, भाज्या यांची रेलचेल असते. हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते.]यासाठी नवान्न पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात.मुख्य प्रवेशद्वारावर व घरातील महत्त्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात. (नवे(अनेकवचन नवी) म्हणजे आंब्याच्या पानात भात, वरी, नाचणी यांच्या लोंबी, तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र करून बांधलेली जुडी.
दमा किंवा अस्थमा यासारख्या आजारांच्यावरील औषधे खिरीमध्ये मिसळून कोजागरीच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात ठेवली जाते. चंद्राचे किरण या खिरीवर पडल्याने त्याचा गुणधर्म बदलतो आणि अशी खीर आजारी व्यक्तीला दिल्यास तिला आराम मिळतो असे मानले जाते.
भारतातील विविध वांशिक जनजाती कोजागरी साजरी करतात. या रात्री होजागरी नृत्य केले जाते. मायलोमा आणि खोलोमा या देवतांची पूजा या रात्री केली जाते. मायलोमा ही भात शेतीची रक्षण करणारी देवता मानली जाते. लक्ष्मी पूजेशी साम्य असणारी हे परंपरा आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!