स्वामी समर्थ रामदास स्थापित स्थान व गड किल्ला सज्जनगड

विशेष लेख 6

सातारा जिल्हा व तालुक्यातील सज्जनगड समर्थ रामदास स्वामी स्थापित स्थान व गड किल्ला याची उंची ३३५० फूट
असुन हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला पर्यटक यांना चढाई करण्यासाठी मध्यम प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्य़ातील कारी, परळी व गजवाडी ही जवळपासची गावे असून सज्जनगड स्थान व गड किल्ला यानिमित्ताने….. 
प्रतापगड पायथ्यापासून सहयाद्रीची उपरांग शंभू महादेव डोंगर रांग नावाने पूर्वेकडे जाते. रांगेचे तीन फाटे फुटत असून पैकी एका रांगेवर समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ परळीचा गड किल्ला वसलेला आहे. सातारा शहराच्या नैर्‌ऋत्ये बाजूला 10 किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग गड किल्ला उभा आहे.
 सज्जनगड किल्ल्याचा आकार शंखाकृती असून परीघ १ किलोमीटर पेक्षा अधिक आहे. पश्चिम बाजूला  खेड – चिपळूण , उत्तरेला महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिण बाजूला  कळंब, ईशान्येकडे सातारा शहर व अजिंक्यतारा गड किल्ला आहे.
प्राचीनकाळी डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य असल्यामुळे किल्ल्याला ‘आश्वलायनगड’ म्हणून ओळखले जाते. किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज यांनी ११ व्या शतकात केली असून दि. २ एप्रिल  १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सज्जनगड हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विनंतीवरून स्वामी समर्थ रामदास हे गडावर कायम वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नाव सज्जनगङ असले तरी पुढे राज्याभिषेकानंतर १६७९ पौष शुक्ल पौर्णिमेस छत्रपती शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.
दि. १८ जानेवारी १६८२ रोजी गडावर रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दि. २२ जानेवारी १६८२ मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला. दि. २१ एप्रिल १७०० मध्ये फतेउल्लाखान याने सज्जनगडाला वेढा घातला. दि. ६ जून १७०० रोजी सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व या गडाचे ‘नवरससातारा’ म्हणून नामकरण झाले.  १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला तथापी पून्हा हा गड किल्ला १८१८ मध्ये इंग्रजांच्या हाती गेला.
सज्जनगड हा गड किल्ला सातारा शहराच्या पश्चिमेस  10 किलोमीटर अंतरावर आहे. स्वामी समर्थ रामदास यांच्या वास्तव्याने  गडाला सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले असून गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर असून एका बाजूस मारुती व दुसऱ्या बाजूला गौतमी मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजा श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहा यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराला डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूर कृष्णा नदी डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाई दैवीची मूर्ती सापडली होती. अंगलाई मंदिर समर्थांनी यांनी बांधले. शके १६०३ माघ नवमी सन १६८२ रोजी रामदासांनी समाधी घेतली म्हणून  तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती असून  समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधिस्थान असून समाधी मागील ठिकाणी पितळी पेटीमध्ये दत्तात्रेय याच्या पादुका आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती व दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन असून मंदिरापुढे उत्तर बाजूला  एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे.
 माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या कालावधीत दासनवमी उत्सव साजरा केला जातो. 
सज्जनगड यावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला ‘छत्रपती शिवाजी महाराजद्वार’असे म्हटले जात असून हे द्वार आग्नेय दिशेला आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला ‘समर्थद्वार’ असेही म्हटले जाते.  हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद केले जातात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. त्याचा मराठी अर्थ ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे. तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात.
परळी किल्ल्यावर इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने याचे काम करुन घेतले आहे. ज्या पायऱ्यांवरुन गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या आत एक झाड लागत असून या झाडापासून एक रस्ता उजवीकडे जातो. या रस्त्याने ५ मिनिटे गेल्यावर एक रामघळ लागत असून रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळालेवर सव घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घोडाळे तळे आहे. घोडाळे तळ्या मागच्या बाजूला एक मशीद वजा इमारत आहे समोर आंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळ राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली होती. 
सज्जनगड गडावरील समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर प्रमुख आकर्षण असून समर्थ रामदास यांच्या निर्वाणानंतर संभाजी राजे यांच्या सांगण्यावरून भुयारात असणारे स्मारक व त्यावर श्रीराम मंदिर बांधले आहे. 
मंदिरात शेजारी अशोकवन, वेणाबाई वृंदावन, ओवऱ्या, अक्काबाइ वृंदावन व समर्थां यांचा मठ वास्तु आहेत. जीर्णोद्धार झालेल्या मठात शेजघर नावाची खोली असून पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पान डबा, वल्कले व प्रताप मारुती मूर्ती आणि गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे.
राममंदिर व मठ या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडील बाजूस गेल्यावर उजव्या बाजूला  एक चौथरा व  शेंदूर फासलेला गोटा आहे. त्याला ब्रम्हपिसा म्हटले जाते.
सज्जनगड गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्याला धाब्याचा मारुती असे म्हटले जाते.
सज्जनगडाच्या उत्तरेला बाटेवर गायमारुती व कल्याण स्वामी मंदिर असून गायमारुती देवळाजवळ कड्याच्या कडेने एक पाय वाट आहे. १०० मीटर अंतरावर एक गुहा असून त्याला रामघळ म्हणतात.
सज्जनगड पायथ्याला परळी गावा लगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे असून तेथील कोरीव शिल्प पाहण्यालायक आहेत. कुस गावापासून जवळ मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ अशी आहे. सज्जनगडावर जाण्यासाठी दोन रस्ते असून एक गाडी रस्ता आहे.
सातारा ते परळी हे अंतर १० किलोमीटर इतके आहे. परळी हे गडाचे पायथ्याचे गाव असून परळी गावापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.  १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागत असून सज्जनगडावर जाण्यास परळीपासून एक तास लागतो.
सातारा परळी रस्त्यावर परळी गावचे अलीकडे ३ किलोमीटर अंतरावर  गजवाडी गाव असून  गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडी रस्ताने जाता येते.  १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागत असून रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे लागतात.
महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाच्या बस सातारा स्थानकातून सूटतात. सज्जनगड पायथ्याला परळी गावा शेजारीच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर ही २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. येथील कोरीव शिल्प पाहण्यासारखी  आहेत. कुस गावापासून जवळ मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ अशी असून सज्जनगडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. गडावर धर्मशाळा असून सज्जनगड येथे राहण्यासाठी उपलब्ध होतात.
महाराष्ट्र  व परराज्यातील असंख्य भाविक भक्त यांच्यासह अनेक पर्यटक सज्जनगडाला भेट देवून मनमुराद आनंद घेत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!