भूषणगड शत्रूवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त

विशेष लेख 5

सह्याद्रीची उपरांग असणार्या डोंगर रांगेतील वडूज ता. खटाव येथे भूषणगड हा 904 मीटर उंचीचा गड किल्ला असून तो गिरीदुग प्रकारातील गड किल्ला असून शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला उपयुक्त होता. भूषणगड किल्ला यानिमित्ताने….. 
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तालुक्याचे गाव म्हणून वडूज प्रसिद्ध आहे. वडूज हे गाव सातारा, कर्‍हाड, फलटण, दहिवडी या तालुक्याशी रस्ता मार्गाने जोडले गेले असून वडूज गावच्या दक्षिण बाजूला साधारण 26  किलोमीटर अंतरावर भूषणगड हा किल्ला आहे. भूषणगण हा डोंगर एकच असल्यामुळे तो खूप लांबून नजरेला पडतो. वडूज येथून भूषणगडाला जाण्यासाठी काही एस.टी. बस असून वडूज-पुसेसावळी रस्त्यावर पळशी गाव येथे बसने जाता येते तेथून चालत भूषणगड वर जाता येते. सदरचे अंतर 5 किलोमीटर असून रस्ता कच्चा आहे.
भूषणगड ता. खटाव येथील किल्ल्याच्या पायथ्याला भूषणगड  गाव आहे. गावात येण्यासाठी चारही बाजूने रस्ते असून गडाची गडदेवता म्हणून हरणाईमाता भाविक भक्त यांचे श्रद्धास्थान आहे. भूषणगड गावातून किल्ल्याकडे गेल्यावर स्वागतासाठी कमान उभी आहे. गडावर जाण्यासाठी पायरी रस्ता मार्ग नवीन बांधला आहे. ग्रामस्थ व भक्तांच्या देणगीतून रस्ता व गडाची देवता हरणाईमातेचे मंदिर बांधले आहे.
भूषणगड चढण्यासाठी पर्यटक यांना खालपासून २० मिनिटे लागतात. भूषणगड दरवाजा २५ फूट असून खाली एक वाट तटबंदी खालून उजवीकडे गेली असून भूषणगडाच्या पश्चिम बुरुजाला वळसा मारुन मागच्या बाजूला असणाऱ्या मंदिरापर्यंत वाट जाते. येथे घुमटीवजा मंदिर असून घुमटात देवीची मूर्ती आहे. तिला भुयारी देवी म्हणून ओळखले जाते. पुन्हा फिरुन दरवाजाकडे यावे लागते. दाराजवळ म्हसोबा मंदिर असून या दरवाजाची बांधणी नजरेस पडते. पायऱ्यांच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून दरवाजाची सुरक्षितता कायम ठेवली आहे. पायर्‍यावर बाजुंना भक्कम बुरुज बांधून आतील बाजूला दरवाजा घेवून दोन्ही बुरुंज कायम ठेवले आहेत. वळणदार मार्गावर दरवाजा खालून तोफांचा मारा करणे अशक्य होते.
दरवाजाची कमान पडलेली असून पुढे गेल्यावर सरळ वाट पश्चिम कड्यावर जाते. डावी वाट माथ्याकडे घेवून जाते. भूषणगड याचा विस्तार लहान असून माथाला चारी बाजूने तटबंदी करुन सुरक्षीत केली आहे. ठिकठिकाणी पहारा देण्यासाठी बुरुज बांधले आहेत. 
भूषणगड याचा आकार साधारण त्रिकोणी असून तिन्ही टोकावर टेहाळणीसाठी बुरुज आहेत. तिन्ही टोकांच्या मध्यभागी उंचवटा असून वर हरणाई मातेचे मंदिर आहे. पुर्वी हे मंदिर जमिनीच्या पातळीखाली असल्याने आता उचलून नव्याने बांधले आहे. मंदिरासमोर दिपमाळ असून मंदिराच्या बाजूला धर्मशाळा असून पर्यटन करण्यासाठी आलेल्या यांना मुक्काम करणार्‍यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भूषणगडाला लागून एकही डोंगर नसल्यामुळे गडावरून चारही बाजूला दूरपर्यंत शत्रूवर नजर ठेवणे शक्य होते. भूषणगड यावरुन औंध येथील यमाई देवी महिमानगड, शिखर शिंगणापूर ही देवस्थाने नजरेस पडतात.
गडावर पाण्याची सोय  उपलब्ध नाही तथापी पूर्व बाजूला कड्याच्या पोटात म्हणजे भूषणगड वरील अर्ध्या डोंगरात कपारीत पाण्याचे टाके असून तेथून पंपाने पाणी वर घेवून पाणी पुरवठा केला आहे.
आदिलशाही यांच्या कालावधीत हा भूषणगड किल्ला मराठे शिवशाहीत दाखल झाला. काही काळ हा भूषणगड किल्ला औरंगजेब याच्या ताब्यात होता. त्यानंतर भूषणगड किल्ला पेशवाई काळात हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला असे सांगितले जाते.
वडूज ता. खटाव येथील हा किल्ला म्हणजे स्वराज्याचे भूषण असल्याने या गडाला भूषणगड हे नाव पडले असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्र तसेत इतर जिल्ह्यातील पर्यटक येथे पर्यटन करण्यासाठी येत असून भूषणगडाची पवित्रता कायम राखली जावी असे आवाहन परिसरातील ग्रामस्थ यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!