महाराष्ट्रातील जोडकिल्ले म्हणून ओळख व प्रसिध्द असलेला चंदन – वंदन गड किल्ला

विशेष लेख 

सातारा जिल्ह्यातील चंदन – वंदन हे महाराष्ट्रातील जोडकिल्ले म्हणून ओळख असलेले 
गड किल्ले  3800 फुट उंचीवर असून गिरदुग प्रकारात हे गडकिल्ले मोडतात. पर्यटक इतिहास प्रेमी नागरिक यांना  फिरणेसाठी आलेल्या 
 यांना चढाईसाठी हा सोपा किल्ला आहे. कोरेगाव तालुक्यातील चंदन  व वाई तालुक्यातील वंदन या दोन्ही जोड गड किल्ले यानिमित्ताने….. 
सह्याद्री पर्वत रागेतील उप रांग म्हणून  महादेव डोंगर परिचित आहे. या उप डोंगरावर चंदन – वंदन हे किल्ले असून चंदन किल्ल्यांपेक्षा वंदन किल्ला उंच आहे.  वंदन पाच तर चंदन किल्ला तीन टप्प्यात आहे. दोन्ही किल्ल्यांमुळे कृष्णा व वसना नदी खोरे विभागले आहे. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील किकली गाव परिसरात मोडत असून तशी नोंद जुन्या कागदपत्रात आढळून येते.
पुणे-सातारा राष्ट्रीय रस्त्यावर भुईंज गावातून डावीकडे असलेल्या किसन वीर सहकारी साखर कारखाना परिसरातून किकली बेलमाची रस्ता चंदन- वंदन गडांवर जातो. सातारा – फलटण रस्तावर अंबवडे गाव असून गावातून डावीकडे असणार्या रस्त्याने ८ किलोमीटर अंतरावर  बनवडी  गाव आहे.  चंदन वंदन हे दोन गड किल्ले दिमाखात उभे असल्याचे पहावयास मिळते. 
कथा-कादंबऱ्यांमध्ये चित्रपट व नाटक आणि विविध क्षेत्रात जुळ्या भाऊ याविषयी ऐकले पाहिले तथापि  चंदन-वंदन हे जुळे गड किल्ले आपणास पहावयास मिळतात. सातारा जिल्हात सातारापासून २४ कि.मी. अंतरावर ही गडांची जोडी उभी आहे. पुणे-सातारा रस्त्यावरुन  हे दोन्ही किल्ले नजरेस येतात.  दोन्ही गड किल्ले यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर, कल्याणगड, भवानी डोंगर व पश्चिमेला वैराटगड, पांडवगड हे किल्ले उभे आहेत.
इ.स. ११९१-११९२ साली हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधला असल्याची नोंद आहे. नव्या संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे किल्ले १६४२ साली जिंकून स्वराज राज्याची मुहुर्तमेढ रोवली. अफझलखान वध केलेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा किल्ला जिंकून दोन्ही गडांवर चढाई केली. यापूर्वी दोन्ही गडांची नावे शूरगड व संग्रामगड अशी होती ती बदलून चंदन वंदन अशी करण्यात आली आहेत. १६७३ साली छत्रपती शिवाजी महाराज यांनी सातारा प्रांत जिंकला व  सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा  किल्ल्यांसोबत चंदन-वंदन गड किल्ले यांना स्वराज्यात सामील केले. संभाजी राजांच्या कालावधीत सन १६८५ साली फेब्रुवारी महिन्यात अमानुल्लाखान याने चंदन-वंदन येथे असणाऱ्या मराठे तुकडीवर हल्ला केला असता चकमकीत मोगलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. १६८९ पर्यंत हा परिसर मराठ्यांकडे  होता तथापी नंतर मात्र तो मोगलांच्या हातात गेला. छत्रपती शाहू महाराज यांनी सन १७०७ मध्ये हा परिसर जिंकून घेतला. सन १७५२ मध्ये ताराबाई यांचेवर लक्ष ठेवण्यासाठी फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथ यांनी किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली होती. काही कालावधीनंतर किल्ला इंग्रज यांनी घेतला.
चंदनगडावर महादेव मंदिर  असून पंचलिंगी दोन शिवलिंगे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे मंदिर बांधले असे सांगितले जाते. गडावर प्रवेश करतानाच राजा भोजाने बांधलेल्या दोन दगडी मिनारी स्वागत करताना दिसतात.चंदनगडाच्या मध्यभागी एक पायापर्यंत बा़ंधलेला चौथरा आहे.गडाच्या नैर्ऋत्य बाजूस दारूगोळा कोठार आहे.गडाच्या वायव्येस एक बुरूज असून  शिवलिंग असलेली समाधी आहे. तिच्यावर बाजूला मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे.
वंदनगडावर मराठा स्थापत्य एक प्रवेशद्वार असून त्यावर कीर्तिचक्र व गणेशमूर्ती  कोरलेली दिसते. पहिल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार असून ते मातीत बुजले आहे.भोजकालीन प्रवेशद्वार  पन्हाळा गडावरील धर्तीवर बांधण्यात आले असून
 एक शिलालेख पारशी भाषेत तर दुसरा मोडी लिपीत लिहिलेला आहे.  यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख येथे आढळून येतो. वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरुंग असून तुळाजी आंग्रेला येथेच कैद करून ठेवले असल्याचे सांगितले जाते. गडाच्या पूर्व व  पश्चिम बाजूला तटबंदीलगत खंदक आहे. महाराणी ताराबाई यांनी हा बनवून घेऊन तब्बल दोन वर्ष शाहूशी लढाई केली. वंदनगडावर पायऱ्या असलेली पाच तळी असली तरी एक बुजले असून चार तळी सुस्थितीत आहेत.गडाच्या पूर्वेस  पायथ्याला छप्परी मंदिर आहे.गडाच्या वायव्येस काळूबाई मंदिर असून गडावर तीन अज्ञात वीरांच्या समाध्या दिसून येत आहेत. चंदन व वंदन गडावर महानुभाव पंथीय स्वामी यांचेही 12 व्या शतकात काही काळ वास्तव असल्याचे सांगितले जाते. तीन दालन असलेले  कोठार गडाच्या मध्यभागी आहे.गडावर पुरातन राजवाडा असल्याचे अवशेष पहावयाला मिळत आहेत. गडावर एक टेकडी असून यालाच बालेकिल्ला असे म्हटले जाते. एका बुरुजाचे व इमारतीचे अवशेष  असून तिथे जाण्यासाठी पूर्वी पायऱ्या होत्या.गडाच्या पूर्वेस व वायव्य दिशेला अनेक पडक्या घरांचे अवशेष आढळून येतात.गडाच्या दक्षिणेला एक चोरवाट असल्याचे दिसून येते.  वंदनगडावर पूर्वेला एक व दक्षिणेला एक अशी चाके नसलेल्या चुन्याचे घाणे असल्याचे दिसते. 
वंदन गडावर  ३० ते ४० पर्यटक व ग्रामस्थ या लोकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध आहे. गडावर खाण्याची व जेवण सोय उपलब्ध नाही. चंदन गडावर एक विहीर असून  येथील पाणी जुलै ते फेब्रुवारीपर्यंत व वंदन गडावर असणारे ४ तळी यापैकी 3 तळ्यांतील पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
चंदन – वंदन गड किल्ले पाहण्यासाठी येणारे पर्यटक व फिरणेसाठी येणारे इतिहास प्रेमी विद्यार्थी नागरीक अभ्यासक यांनी भेट देवून आपल्या ऐतिहासिक माहितीत भर टाकावी हीच अपेक्षा.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!