विशेष लेख
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात महिमानगड गड हा किल्ला असून 3200 फुट उंच असून चढण्यासाठी सोपा आहे. हा गिरीदुग प्रकारातील किल्ला आहे. सातारा पुसेगाव म्हसवड असा रस्ता मार्ग या किल्ल्यावर जाण्यासाठी आहे. सातार्यापासून ५० कि.मी. अंतरावर महिमानगड हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला आहे. महिमानगड किल्ला यानिमित्ताने…..
महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकीर्डे नावाचे गाव असून उत्तर पायथ्याला महिमानगड वाडी नावाचे गाव आहे. उकीर्डेकडूनही गडावर जाता येते. अर्थात ही वाट नेहमीची चढाईची नसून काहीशी अवघड असून ती तुटक्या तटबंदीतून गडावर जाते.
महिमानगडाच्या पायथा असलेल्या वाडीपर्यंत रस्ता मार्ग आहे. या मार्गाने जाताना महिमानगडाची पश्चिम अंगाची तटबंदी सुरेख दिसत असून महिमानगडवाडी किल्ल्याच्या उतारावरच वसलेली आहे.
वाडीतील मंदिरापासून एक वाट गडावर जाते आणि वाटेवरुन गडाच्या दरवाजाचे बुरुज दिसतात. वळणावळणाने ही वाट दरवाजापर्यंत जाते. वाडीतील जनावरे अनेकदा गडावर चरायला जातात त्यामुळे अनेक वाटा तयार झालेल्या आहेत.
वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीत पाण्याची टाकी कोरलेली आहे. झाडी गच्च भरलेली असून दुसरे गाळाने पुर्ण भरले आहे. तिसर्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा असून येथून खडकावरून चढून आपण गडाच्या मुळे वाटेवर येवू शकतो. गडात जाणारा मार्ग दिसतो तो उत्तरेकडून असला तरी दरवाजा पुर्वाभिमुख बांधलेला होता.
महिमानगडाच्या दरवाजाची कमान ढासळून नष्ट झाली असून कमानीच्या बाजूचे उभे खांब मात्र अजून तग धरून आहेत. सुबक घडीव दगडाच्या खांबांच्या खालच्या बाजूला देखणे असे हत्ती कोरलेले आहेत. दगडमाती निघाल्यामुळे हे हत्ती दिसत आहेत. दरवाजासमोर वळणदार भिंत व पुढे बुरुज बांधून त्याला शत्रुपासून संरक्षण दिलेले होते असे दिसते असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम ही शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ठ होय.
काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून गडामधे प्रवेश केल्यावर डावी वाट गडाच्या माथ्यावर जाते. समोरची वाट तटबंदीकडे जाते. सदर वाटेने तटबंदी आतून गडाला फेरी मारता येते तथापी तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली असल्यामुळे काळजीपुर्वक फिरणे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून तो पुर्वेकडे निमुळता होत गेला आहे. पुर्वेकडील निमुळत्या टोकावर टेहाळणीसाठी बुरुज असून हा निमुळता भाग मधेच तटबंदी बांधून गडापासून वेगळा ठेवला आहे. तटबंदीमध्ये दोन दिंडीदरवाजे असून उत्तरेकडील दिंडी दरवाजा दगडी ढासळल्याने बंद करण्यात आला.
गडाच्या माथ्यावरून आपल्याला मोठा परिसर दिसत असून भूषणगड, वर्धनगड हे किल्ले व जरंडेश्वर डोंगर दिसतो. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे अवशेष एक कबर एक हनुमान मंदिर व किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पहायला मिळत आहेत. माथ्याच्या उतारावर पाण्याचे टाके असून खडकात खोदून नंतर ते चिरेबंदी दगडांनी बांधून काढलेले आहेत.
आदिलशहाच्या काळात विजापूर राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत विजापूर – पंढरपूर – सातारा – वाई – महाड असा रस्ता होता. रस्त्याचे रक्षण करण्यासाठी महिमानगड किल्ल्याची योजना आखली होती. साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरीता छत्रपती शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच महिमानगड किल्ला एक होय. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरीता मिळून ७५ इसम होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुलकर्णी यांच्याकडे चालू आहेत.
सातारा – पंढरपूर मार्गावर पुसेगाव १२ किमी अंतरावर व दहीवडीहून ७ किमी वर महिमानगड गावाला जाणारा रस्ता असून फलटण – दहिवडी मार्गे सातारा किंवा सातारा पुसेगावमार्गे पंढरपूर जाणारी वाहनेदेखील महिमानगडला जातात. महिमानगड वरुन १.५ किमी वर व महिमानगड गावात पायी चालत जाण्यास 20 मिनिटे लागतात. महिमानगड गावाच्या जिल्हा परिषद कार्यालया समोरील रस्ता गडावर जातो. हा रस्ता थेट प्रवेशद्वारात घेऊन जाते. बांधीव व दगडात खोद्लेल्या पायर्या लागत असून वाटेने गडावर जाण्यासाठी २५ मिनिटे लागतात.
दहीवडी येथून ५.५ किमीवर शिंदी बद्रुक गावातून रस्ता जातो. दहीवडीहून रिक्षाने गावात जाता येते. एक पायवाट गडाला वळसा घालून तटबंदी खालून जात असून प्रवेशद्वाराजवळ पायर्यांपाशी महिमानगड गावतून येणार्या वाटेला मिळते.
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही तथापी महिमानगड गावातील शाळेत राहण्याची सोय होऊ शकत असल्याने पर्यटक यांची राहण्यासाठी सोय होते. गडावर जेवणाची सोय उपलब्ध नाही तथापी दहीवडी व गोंदवले येथे जेवणाची सोय होऊ शकते. गडावर पाण्याची सोय आहे तरी पर्यटक यांनी गड किल्ले यांचा मनसोक्त आनंद घ्यावा.