विशेष लेख
फलटण व माण तालुक्याच्या सीमेवरून सह्याद्री डोंगर रांग गेलेली असून फलटण तालुक्यातील दक्षिण बाजूने ही डोंगर रांग पुढे जाते. दोन्ही तालुक्यांतील पूर्व-पश्चिम दिशेने धावणा-या डोंगररांगेत संतोषगड सीतामाई व वारुगड किल्ला एकाच रांगेत आहेत. माण तालुक्यातील वारुगड किल्ला त्यानिमित्त…..
वारुगड किल्ला ट्रेकींग व फिरण्याच्या दृष्टीने उपयुक्त असून याच डोंगर रांगेतून माण तालुक्यातील माणगंगा नदी उगम पावते त्या सीताबाई डोंगरात डाव्या कुशीत वारुगड किल्ला दहिवडी गावच्या पश्चिमेस 22 किलोमीटर अंतरावर आहे.
वारुगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला अशी माहिती असून विजापूर येथून होणाऱ्या स्वा-यांना जरब घालण्यासाठी व स्वराज्याची सातारा बाजू मजबूत रहावी यादृष््टीने छत्रपती शिवाजी महाराजांनी संतोषगड आणि वारुगड हे दोन किल्ले निर्माण केले. वारुगड किल्लेदार व दोनशे पहारेकरी व मंंडळी होती. वारुगड किल्ला साताऱ्याच्या राजाच्या विठ्ठलपंत फडणवीस यांनी 200 लोक पाठवून दुसऱ्या बाजीरावांपासून 1818 मध्ये घेतला.
वारुगडा किल्ला याचे बांधकाम भक्कम असून किल्ल्याचा मुख्य फलटण दरवाजा गोमुखी आहे. किल्ला फलटणपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या कमानी ढासळलेल्या असून तटबंदीतील बुरूजांनाही तडे गेलेले आहेत. उर्वरित तटबंदी सुस्थितीत आहे. किल्ल्याची विभागनी दोन भागांत आहे. एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला. बालेकिल्ला आकर्षक असून तिथून खालपर्यंत बांधलेली भिंत जमिनदोस्त होत चालली आहे. भिंतीवरून बालेकिल्ल्यावर जाण्याची वाट आहे.
वारुगड किल्ला माचीवर गेल्यावर मोठा घेर लक्षात येतो. किल्ल्याच्या माचीचा पूर्वकडील भाग तटबंदीने वेढलेला असून गडावरील माची शाबूत आहे. पूर्वी माचीत शिरण्यासाठी पाच दरवाजे होते; मात्र सद्यस्थितीत फक्त दोन दरवाजे आहेत. गिरवी-जाधववाडी ता. फलटण मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाज्यातून तर मोंगळ-घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुसऱ्या दरवाज्यातून गडावर येते. माचीवर घरांचे, वाड्यांचे काही अवशेष असून पाण्याचे दोन-तीन टाकी व तळीसुद्धा आहेत. टाके नव्याने बांधले असून उतरण्यासाठी पाय-याही आहेत. गडावर एक विहिर असून ती पांडवकालिन असल्याचे सांगितले जाते. पृष्ठभागापासून खोल असल्याने तेथे उन्हाळ्यातही थंडावा राहत असून वारुगडावर भैरोबा जीर्णोद्धारित मंदिर असून मंदिर प्रशस्त असल्याने तेथे राहण्याची सोय आहे. वारुगडावरील माची फिरण्यास पर्यटक यांना दोन तास लागतात.
गिरवी-जाधववाडी ता. फलटण येथून वारुगड माचीवर जाणारा रस्ता दरवाज्यातून पुढे गेल्यावर विभागला असून उजवीकडे व डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडी वस्तीकडे जातो तर सरळ जाणारी वाट 15 मिनिटांत बालेकिल्ल्या प्रवेशद्वारापाशी जाते. दरवाज्याची तटबंदी शाबूत असून बालेकिल्ल्याच्या समोर इमारत आहे. ती नव्याने बांधलेली आहे. पाण्याचे टाके व विहीर असून किल्ल्याच्या टाक्यांमधील पाण्याचा साठा वर्षभर टिकून राहतो. पाण्याचा फायदा गडाखालील गावकरी यांना होतो. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहिला की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे असे दिसते. यावरुन सीताबाई डोंगर, महादेव डोंगर रांग असा परिसर दिसतो. संतोषगडावरील वाट सीताबाई डोंगरातून वारुगडावर पोचते. वातावरण स्वच्छ असल्यास गडावरुन पुरंदर आणि वज्रगड हे दोन किल्ले दिसतात. येथून महादेव डोंगर रांगेतील शिखर शिंगणापूर हे मंदिर देखील नजरेस पडते.
वारुगडावर जायचे असल्यास फलटणपासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग असून फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असे जाता येते. दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड या मार्गानेही वारुगडापर्यंत जाता येते. फलटण – दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर 20 किलोमीटर अंतरावर बिजवडी गाव लागते. गावातून एक कच्चा रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत जातो. फलटण – दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंतर 20 किलोमीटर अंतरावर मोगराळे फाटा लागतो. फाट्यापासून एक कच्चा रस्ता तोंडली मार्गे थेट माचीवरील घोडेवाडीतून वारुगडावर जातो. मोगराळे ते घोडेवाडी अंतर 15 किलोमीटर आहे.
वारुगडाला जाण्यासाठी जवळचा मार्ग फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा असून फलटण ते गिरवी अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. गिरवी गावातून 5 किलोमीटर जाधववाड्यापर्यंत पायी चालत जाता येते. जाधववाडा हे किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. तेथून वारुगड माचीवर जाण्यास 2 तास लागतात. माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास 20 मिनिटे लागतात.
वारुगडावर भैरवगड मंदिरात 100 लोकांची राहण्याची सोय आहे व धर्मशाळेत 25 जणांची राहण्याची सोय होऊ शकते तथापी गडावर जेवणाची सोय उपलब्ध नाही. माचीवर बारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. वारुगडावर मुक्काम करावयाचा असल्यास अमावास्या सोडून इतर दिवशी यावे. दर अमावास्येला पंचक्रोशीतील लोक गडावरील भैरोबा मंदिरात जमून तेथे भंडारा असतो व रात्रभर किर्तन चालते. धर्मशाळेत राहण्यासाठी जागा नसते. वारुगडावर मुक्काम केल्यास दुस-या दिवशी परिसरातील इतर वास्तू पाहता येतात.
जवळच माण तालुक्यातील 40 किलोमीटर अंतरावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत शिखर शिंगणापूर मंदिर आहे. परिसरात शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीं राजेंनी बांधलेला तलाव व किल्ल्यापासून 25 किलोमीटरवर असलेला महिमानगड या वास्तूंचा समावेश आहे. वारुगडावर पर्यटन करण्यासाठी उन्हाळा पावसाळा व हिवाळा या 3 ऋतुंमध्ये जाता येते आणि मनसोक्त आनंद घेता येतो.
पर्यटक यांनी फिरण्यासाठी आल्यास येथे निसर्ग व किल्ल्याचा मनमुराद आनंद घेता येत असल्याने अनेक पर्यटक येथे भेट देत आहेत.