संतोषगड हा किल्ला छोटासा आहे परंतु तटबंदी ,बुरूज असे पाहण्यासाखे बरेच काही आहे.गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. पश्चिमेस मोळघाट, दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाई डोंगर व वारुगड किल्ला आहे. संतोषगड हे फलटणचे ऐतिहासिक स्मृतिस्थळ आहे. त्यानिमित्त…..
ताथवडा ता. फलटण गावचे दक्षिणेस डोंगरावर संतोषगड हा किल्ला असून संतोषगड किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्हीकडूनही जाता येते. किल्ल्याच्या पायथ्याला ताथवडे गाव आहे. ताथवडे येथे अनेक मार्गांनी पोहचता येते.फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे.फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मी चे अंतर आहे.दहिवडी ता. माण येथून ३२ किलोमीटर अंतरावर आहे.
सातारा येथून पुसेगाव मोळ घाटमार्गे फलटण जाणाऱ्या बसने ताथवडे येथे उतरुन गडावर जाता येते.पुसेगाव ते ताथवडे हे अंतर साधारण २३ कि.मी. आहे.ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे. महादेव डोंगर रांगेतील उंचीच्या टेकडीवर संतोषगड किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक ताथवडा गावातून जातो तर दुसरा कच्चा रस्ता उत्तरेकडील बाजूस ताथवडा गावापासून आहे. किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो.
संतोषगड या किल्ल्याचे प्रवेशद्वार घडीव दगडांचे असून त्याला बुरुज आहेत. किल्लाचा आकार हा त्रिकोणी असून किल्ल्याच्या रक्षणासाठी तीन तटबंदी असून सर्वात वरची भिंत संपूर्ण टेकडीवर बांधलेली असल्याने किल्ल्यातच बालेकिल्ला तयार झाला आहे. किल्ल्याभोवती सरळ उभा कडा असून त्यावर तटबंदी होती. तटबंदीची पडझड झाली आहे. किल्ल्यावर ठराविक अंतरावर दुर्गरक्षक बुरुज व सेनेच्या सुटकेसाठी गुप्त वाटा आहेत. किल्ला तीन बाजूंनी मजबूत असून बालेकिल्लाच्या खाली बाहेरुन त्रिकोणी बांधकाम केले आहे. संतोषगड या बालेकिल्ल्यात जाण्यासाठी दोन लहान दरवाजे व मुख्य प्रवेशद्वार आहे. किल्ल्याच्या उतर बाजूस एकाखाली एक अशा दोन भिंतीची पुर्व पश्चिम तटबंदी असूज तीन बुरुज आहेत. प्रवेशद्वाराजवळील तटबंदी पडलेली आहे.
संतोषगड बालेकिल्ल्याचा विस्तार ३.२५ हेक्टर क्षेत्रावर असून पुर्वी किल्ल्यात सदर किल्लेदाराचें कार्यालय अशा मोजक्या इमारती होत्या. इमारतींच्या पश्चिमला एक दगडी इमारत होती. धान्य व दारुगोळा साठवण्यासाठी तीन खोल्या होत्या. दक्षिणेस खडकात २१.३४ मीटर खोल खोदलेली पाण्याची
टाकी असून त्यास पुर्वकडील बाजूस पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्या आहेत. टाक्यातील पाणी नळाद्वारे ताथवडा ग्रामपंचायत पिण्यासाठी गावाला उपलब्ध करून देण्यात येत असे त्याचा वापर १९९३ पर्यंत होत होता.
टाक्याच्या बाजूला असलेल्या गुहेच्या बाहेरील बाजूस एक मठ असून तिथे लाईटची सोय करण्यात आली आहे. मठापासून खाली ३० मीटरवर दुसरी गुहा आहे. किल्ल्याच्या पूर्व बाजूला आणखी एक गुहा असून तिच्या पूर्व बाजूस लक्ष्मीचे पड़के देउळ आहे. पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे कोरीव कमान आहे. पायर्या उतरुन गेल्यावर तातोबा महादेव मंदिर असून त्यावरुन किल्ल्यास ताथवडा नाव पडले असल्याची अख्यायिका आहे.
बालेकिल्ल्यावर इमारतीचे अवशेष आढळून येत नाहीत तथापी संतोषगड किल्ल्यावर
मशीद व एक मारुतीची मुर्ती आहे. पहिल्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीखाना असल्याचे दिसून येत आहे. दक्षिणेकडील बाजूस मुख्य टेकडी व पलीकडील टेकडीच्या खोलगट भागात इमारती यांचे अवशेष सापडतात.
संतोषगड किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वरासमोर एका गुहेत गोड्या पाण्याची टाकी असून सध्या बुजलेल्या आहेत. याशिवाय चार पाण्याची टाकी असून त्याही मुजल्या आहेत. संतोषगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला असल्याचे सांगितले जाते. सन १६६५ मध्ये संतोषगड किल्ला फलटण येथील श्रीमंत बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात होता.
1665 साली छत्रपती शिवाजी महाराज व जयसिंह यांच्यात झालेल्या पुरंदरच्या तहानुसार जयसिंह व शिवरायांच्या संयुक्त फौजांनी दि. ७ डिसेंबर १६६५ रोजी जिंकला. विजापूर सरकारने बहुधा तहाने मुघलांकडून परत मिळवला. सन १६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी परत विजापूर कडून जिंकून घेतला.
सन १६७५ व १६७६ साली सभोवतालचा प्रदेश जिंकला. सन१६८९ मध्ये परत हा किल्ला मुघलांनी जिंकून १७२० मध्ये तो शाहूस शाही नजराणा म्हणून इनाम दिला. सन १७९० महसुल अहवालावरुन हा नहिसदुर्ग सरकारमध्ये उपविभागाचे मुख्य ठाणे होते. त्यावेळचा महसूल १ हजार१२० रुपये होता. सन १८१८ पर्यंत हा संतोषगड किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. तो ब्रिटीशांनी प्रतिकाराशिवाय जिंकला.ब्रिटीशांविरुद्ध बंड करणारे उमाजी नाईक १८२७ मध्ये या संतोषगड किल्ल्यावर राहिले होते.
ताथवडा ता. फलटण येथील गावात अनेक मंदिरे असून बालसिध्दा मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिर नगारखाना उंच आहे. प्राकारही प्रशस्त आहे. विटांचे शिखर सोडले तर मंदिरांचे बांधकाम भरीव दगड यांनी केलेले आहे. सभा मंडपाच्या पायरीवर एक शिलालेख आहे. पिसाजी शामराज देशपांडे यांनी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार सन १७६५ साली केला असल्याचे शिलालेखावरुन दिसून येते.
विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे दोन शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगड राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश नजरेस येतो.
फलटण शहर व परिसरातील सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील किल्लेप्रेमी नागरीक संतोषगड किल्यांला भेट देवून या किल्ल्याची जपणूक करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. शासन व सर्वसामान्य नागरिकांनी संतोषगड किल्ला फलटण तालुक्याची ऐतिहासिक स्मृतिस्थळ असल्याने ते जपणे काळाची गरज आहे.
लिखाण आणि माहिती दोन्ही छान आहे
खुप छान माहिती. माझे मित्र श्री संदिप शिंदे ( रहाणार ताथवडा गाव ) यांच्या घरी मुक्कामी असताना दि. २९-०९-२०१९ रोजी या किल्ल्याला भेट दिली होती. किल्ला थोडा दुर्गम आहे पण फारसा उंच नसल्याने सहज चढता येतो. किल्ल्याच्या माथ्यावर आल्यावर तिथून दिसणारा चाहुबाजूचा निसर्ग पाहून सर्व क्षीण निघून जातो.
Pictures ajun pahijet mhnaje kola baghtil aanj vichar kartik janyacha !
Loka*