फलटण दि. ६ : एन. सी.एल.टी.च्या माध्यमातून श्री दत्त इंडिया प्रा. लि., मुंबई यांनी न्यू फलटण शुगर साखरवाडी ता. फलटण ची जबाबदारी स्विकारली असून शेतकरी व कामगार यांची देणी देण्यासह यावर्षीच्या गळीत हंगामात कारखाना सुरु करण्याची तयारी दाखविली आहे. शेतकरी, कामगार व अन्य घटकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
साखरवाडी ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना सुरु करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि कारखाना सुरु होत असल्याची माहिती देण्यासाठी लक्ष्मी विलास पॅलेस निवासस्थानी पत्रकार परिषदेत श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, श्रीरामचे उपाध्यक्ष नितीन भोसले, माजी सभापती शंकरराव माडकर, कामगार संघटनेचे सचिव राजेंद्र भोसले व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
बँकांमधील थकीत येणी वसुलीसाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या दिवाळखोरी कायद्यांतर्गत एन. सी. एल. टी. कार्यरत असून बँकांनी उद्योग व्यवसायांना केलेले अर्थसहाय्य थकीत राहिल्यास या कायद्यान्वये बँकेने विनंती केल्यास एन सी एल टी च्या माध्यमातून कायदेशीर कार्यवाही सुरु होते, त्याप्रमाणे कॉसमॉस को-ऑप. बँकेने मागणी केल्यानंतर दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू फलटण शुगर वर्क्स बाबत कार्यवाही सुरु झाल्याचे निदर्शनास आणून देत कॉसमॉसने २/३ वर्षांपूर्वी २५ कोटी रुपये दिले, त्यापैकी १२ कोटी येणे असल्याचे व स्टेट बँक, आय डी बी आय व अन्य बँकांची मोठी देणी असल्याने एन सी एल टी प्रयत्नशील असताना आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बैठकांना उपस्थित राहुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ४९ कोटी आणि कामगारांचे १५/१६ महिन्यांचे पगार व अन्य येणी प्राधान्याने मिळाली पाहिजेत यासाठी आग्रही असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने इसेन्शियल कम्युडीटी कायद्यातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयात शेतकरी/कामगारांची थकीत येणी मिळण्यासाठी दावा दाखल केला. (PIL) एन सी एल टी ही उच्च न्यायलयाच्या दर्जाचे ट्रॅब्युनल असून यांचे कामकाज एकाद्या संस्थेबाबत सुरु होते त्यावेळी कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयासह अन्य कामकाज थांबुन एन सी एल टी प्रक्रिया सुरु राहत असल्याचे निदर्शनास आणून देत आपण कायद्याचा अभ्यास केला असल्याने एन सी एल टी प्रक्रिया पूर्ण करण्याला प्राधान्य दिले, त्यासाठी शेतकरी व कामगारांना फॉर्म उपलब्ध करुन देऊन आपली मागणी नोंदविण्याचे आवाहन केले, त्यावेळी ज्यांनी फॉर्म भरुन दिले त्यांना प्राधान्याने ऊसाची थकीत बिले मिळतील उर्वरित सर्वांना तसेच कामगारांनाही त्यांची थकीत येणी मिळाली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही याची ग्वाही यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
फलटण तालुक्यात ऊसाचे क्षेत्र वाढत असताना तालुक्यात सर्व प्रथम सन १९३२ च्या दरम्यान सुरु झालेला फलटण न्यू फलटण शुगर आणि सन १९५६ मध्ये सुरु झालेला श्रीराम हे दोन्ही साखर कारखाने चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे कोट्यवधींची कर्जे डोक्यावर घेऊन बंद पडले, त्यापैकी श्रीराम आर्थिक संकटातून बाहेर काढून व्यवस्थितरीत्या सुरु करण्यात यश आले तरी फलटण शुगर बंद पडल्याने शेतकरी आणि सुमारे ५४५ कामगार कुटुंबांचे काय होणार या विवंचनेत अस्वस्थ असताना एन सी एल टी ची प्रक्रिया सुरु झाल्याने आपण त्याबाबत, त्या कायद्यातील तरतुदिंची माहिती घेतली असता यातून शेतकरी व कामगारांचे हित साधता येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण स्वतः त्यामध्ये प्रतिनिधित्व करीत सहकार्य केल्याने आज हा कारखाना सुरु होण्याबरोबर शेतकरी/कामगारांचे हिताला प्राधान्य देणारे निर्णय होतील याची ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
आपण आपली पदे बारामतीला विकून पाणी आणल्याचा आरोप होतो परंतू त्यातून पाणी तरी मिळाले आता खासदारकी माणला विकून काय मिळणार असा सवाल करीत आपण कधीही कोणाला व्यक्तिगत नुकसान केले नाही, मात्र सर्वसामान्यांचे हिताविरुद्ध काही चुकीचे होत असेल तर त्याला विरोध केला, यापुढेही आपली तीच भूमिका राहणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.