विडणी दि. ५ : सासरच्या लोकांनी चार चाकी गाडी घेणेसाठी माहेरहून २ लाख रुपये आण म्हणून नवरा, सासू, नणंद व त्यांच्या दोन मुली यांनी वारंवार केलेल्या शिवीगाळ, शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विडणी ता. फलटण येथील विवाहिता सौ.अर्चना जयपाल जगताप हिने विहीरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केली.
दरम्यान माहेरचे कुटुंबीय व लोकांनी घरासमोरच अत्यंसंस्कार करण्याचा पविञा घेतल्याने वातावरण तणाव पूर्ण बनले होते तथापी फलटण पोलिस प्रशासन यांनी मध्यस्थी करुन पोलिस बंदोबस्तात स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
बागेचामळा (विडणी) ता.फलटण येथील जयपाल ऊर्फ प्रमोद दिनकर जगताप यांचेबरोबर महादेव गाडे (रा.उंबरे पागेचे ता.पंढरपूर जि. सोलापूर) यांची कन्या कु. अर्चना हिचा विवाह दि. १५ जून २०१२ साली झाला आहे.
सौ.अर्चना जयपाल जगताप (वय26) यांना सार्थक वय (6) सिध्दांत वय (4) अशी दोन मुले असून सौ.अर्चना हिचा नवरा जयपाल ऊर्फ प्रमोद दिनकर जगताप, सासू सौ.हिराबाई दिनकर जगताप , नणंद अनिता दिनकर जगताप, सौ.सविता पोळ यांच्या २ मुली ज्योती व कविता यांनी सौ. अर्चना हिला गेल्या २ वर्षापासून चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून 2 लाख रुपये आण म्हणून वारंवार शिविगाळ शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याबाबत तिने आईवडील यांना समक्ष व फोनवर अनेकदा कल्पना दिली होती. आई वडील, भाऊ, मामा यांनी सौ.अर्चना हिचा नवरा जयपाल ऊर्फ प्रमोद, सासू , नणंद यांना आमची घरची परिस्थिती बिकट व गरीब असल्याने आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करु शकत नाही तरी सौ.अर्चनाचा आपण छळ करु नये असे सांगितले होते.
गाडे कुटुंबीय यांचे काही न ऐकता सासरच्या मंडळींनी सौ.अर्चना हिचा चारचाकी गाडी घेण्यासाठी 2 लाख रुपये आण म्हणून शारीरिक व मानसिक छळ सुरु ठेवला होता. सौ.अर्चना हिला आपल्या घरची बिकट व गरीब परिस्थिती माहित असल्याने पैसे कोठून देणार याची तिला कल्पना होती. शुकवार दि. 4 आॅक्टोंबर रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी जगताप यांच्या घरात जोरदार भांडण होऊन सौ. अर्चना हिला नवरा, सासू, नणंद यांनी मारहाण केली. दररोज होणाऱ्या या छळाला वैतागून तीने घरासमोर असणार् या विहिरीत उडी मारुन आत्महत्या करुन आपले जीवन संपविले.
दरम्यान सौ. अर्चना हिचे सासरे दिनकर शंकर जगताप (वय-70) यांनी लगेच विहिरीत उडी टाकून सौ. अर्चनाला वाचविण्याचा प्रयत्न केला तथापी विहिरीत गाळ व पाणी असल्याने तीचा मृत्युदेह गाळात रुतून बसल्याने तीला वाचविण्यात अपयश आले. विहीरीतील पाणी मोटारीच्या साह्यायाने बाहेर काढल्यावर ग्रामस्थांनी अर्चना हिचा मृतदेह दुपारी 2.30 वाजता विहीरीतून बाहेर काढला.
सौ.अर्चना हिच्या माहेरकडे घडलेली घटना कळविल्यावर लगेच उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे शवविच्छेदन करणेसाठी आणलेला मृतदेह पाहिला असता सौ.अर्चना हिला पोहता येत असल्याचे सांगितले. त्यामुळे सौ. अर्चना हिचा मृत्यू संशयास्पद असून सौ.अर्चनाला सासरच्या लोकांनी मारुन नंतर तिला विहिरीत टाकून जिवे मारले असल्याचे सांगितले.
सौ.अर्चना हिला चांगले पोहता येत असल्याने सदरची घटना संशयास्पद असून तिचे शवविच्छेदन इन कँमेरा करावे व संबंधित संशयितास अटक करावी अशी मागणी करुन सौ.अर्चना हिचेवर सासरच्या घरासमोर अत्यंसंस्कार करण्याची भूमिका माहेरच्या लोकांनी घेतल्याने काहीसा तणाव निर्माण झाला. फलटण येथील पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक नितीन सावंत व पोलिस कर्मचारी यांनी मध्यस्थी करुन संशयित यांना ताब्यात घेतले. सौ. अर्चना हिचे शवविच्छेदन करु असे सांगून संबंधितांच्या मागण्या पूर्ण केल्या तथापी अंत्यसंस्कार सासरच्या घरासमोर करणेच्या भूमिकेवर माहेरचे लोक ठाम राहिल्याने अधिकारी यांनी पोलिस बंदोबस्त वाढवून आज शनिवार दि. ५ आॅक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता विडणी ता. फलटण येथील स्मशानभूमीमध्ये
सौ. अर्चनावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सौ. अर्चना हिचा भाऊ धनाजी महादेव गाडे (वय१९ रा.उंबरे पागेचे ता.पंढरपूर जि.सोलापूर) यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून सौ. अर्चना हिचा नवरा जयपाल ऊर्फ प्रमोद दिनकर जगताप, सासू सौ.हिराबाई दिनकर जगताप, नणंद अनिता दिनकर जगताप सौ.सविता पोळ, ज्योती पोळ कविता पोळ यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उस्मान शेख अधिक तपास करीत आहेत.