फलटण दि. ४ : बरेच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला परतीचा पाऊस (मान्सून) आज शुक्रवार दि. ४ रोजी फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक परिसरात मोठय़ा प्रमाणात झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले मात्र या परतीच्या पावसामुळे शेतकरी वर्ग काहीसा आनंदी झाला आहे तथापी काढणीसाठी आलेले बाजरी पिक व अन्य पीके याचे नुकसान झाले आहे.
फलटण तालुक्यातील पश्चिम भागातील आदर्की बुद्रुक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून यावर्षी पावसाने हूलकावणी दिली होती मात्र आज झालेल्या मुसळधार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी दुपारी आदर्की बुद्रुक परिसरातील डोंगर व गावच्या आसपास चांगला पाऊस झाला त्यामुळे खटकाळी व खराडेवस्ती (पवार वस्ती) ओढ्याला पुर आला त्यामुळे फलटण सातारा रोडवर असणार्या या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार चाकी वाहने व दुचाकी वाहनांची वाहतूक काही काळ बंद होती मात्र अवजड वाहने जात होती.
पावसाने ओढ्याला पुर आल्याने दोन्ही ओढ्याचे पाणी रस्त्यावर आल्याने येथील तरुण यांनी प्रवाशी वाहनांना सहकार्य करुन पाण्याचा प्रवाहातून वाहने बाहेर काढणेसाठी मदत केली.
आदर्की बुद्रुक परिसरात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. शेतातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.