फलटण दि. 4 : येथील सराफ यांचा विश्वास संपादन करुन सुमारे १६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे ८४८.१९० ग्रॅम सोने दागिने तयार करण्यासाठी म्हणून घेऊन गेलेला कलाकार दि. ३० ऑगस्ट रोजी फलटण येथुन पसार झाल्यानंतर त्याच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. प. बंगाल येथून या संशयीतास १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे ३७६ ग्रॅम सोन्यासह ताब्यात घेऊन फलटण येथे आणल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली.
फलटण येथील शांतिकाका सराफ पेढीचे नितीन शांतीलाल गांधी यांनी याबाबत फलटण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. पोलीस यांनी गुन्ह्याबाबत माहिती घेऊन तपासाची दिशा निश्चित करुन पोलीस उपनिरीक्षक डी. ए. दळवी, पोलीस नाईक वाडकर, पोलीस कॉन्स्टेबल चतुरे व मेंगावडे यांना प. बंगाल येथे पाठविण्यात आले. सदर संशयीत किशोरपूर, ता. ढेबरा, जिल्हा प. मदिनापूर (प.बंगाल) येथे रहात असल्याच्या माहितीनुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेऊन मोठया कौशल्याने एक महिन्यात त्याला व गुन्ह्यातील सोन्यापैकी काही सोने हस्तगत करुन पोलीस पथक फलटण येथे दाखल झाल्याचे सातारा जिल्हा पोलिस प्रमुख सातपुते यांनी सांगितले.
प. बंगाल येथील अनेक कलाकार महाराष्ट्रात येवून सराफांचा विश्वास संपादन करुन मोठ्या प्रमाणावर सोने दागिने तयार करण्यासाठी उपलब्ध झाल्यावर सोन्यासह पसार होत असल्याची उदाहरणे आहेत, मात्र आतापर्यंत कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांना सदर गुन्हेगारांना ताब्यात घेऊन सोने हस्तगत करण्यात यश आले नव्हते , मात्र फलटण शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने संशयीतास मुद्देमलासह ताब्यात घेण्यात यश मिळविल्याचे सांगून पथकातील सर्वांचे अभिनंदन करीत त्यांना रिवॉर्ड देणार असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनीसांगितले.
जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मोठ्या कौशल्याने संशयीतास ताब्यात घेतल्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी यावेळी सांगितले.