पै.काकासाहेब किसन पवार
मराठवाड्यातील लातूर जिल्हा व त्यातील “साई” नावाच्या छोट्याशा गावात 3 ओक्टॉबर 1970 साली काकासाहेबांचा जन्म.लातूर जिल्हा दुष्काळी क्षेत्रातील जिल्हा,मात्र या जिल्ह्याने महाराष्ट्रालाच नव्हे तर उभ्या देशाच्या कुस्तीक्षेत्राला अनेक दैदिप्यमान हिरे दिले,त्यापैकी एक म्हणजे काकासाहेब पवार.
लातूर जिल्ह्याला पाण्याचा भलेही दुष्काळ असेल मात्र शूरवीर नररत्नांचा सुकाळ आहे.इथे जन्म घेणारे प्रत्येक लोक अतिशय कडवे आणि तत्वाने वागणारे होय.प्राण गेला तरी तत्वे न सोडणारी अतिशय चिवट लढवय्ये लोक इथे जन्मतात.
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका व त्यातील रामलिंग मुदगड या गावी जन्मलेले रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार.
बिराजदार मामा कुस्तीक्षेत्राला आकाशाला गवसणी घालणारे मल्ल ठरले मात्र त्यांच्या कारकिर्दीत शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कित्येक मल्लांची वैभवशाली परंपरा निर्माण केली,आणि त्याच परंपरेतील मेरुमणी असावेत असे नाव म्हणजे काकासाहेब पवार.
घरची तुटपुंजी जिरायती जमीन आणि पाच जन भाऊ भाऊ.
घरची अतिशय गरिबी परिस्थिती.
शेतीत जे काही पिकेल त्यावरच पवार घराण्याचा चरितार्थ चालायचा.
आजोबा पै.नारायण पवार हे पंचक्रोशीतील अतिशय नावाजलेले पैलवान.
आजोबांच्या पावलावर पाउल ठेवत हे पवार घराणे मल्लविद्येच्या सेवेत आले.
थोरले बंधू पै.विठ्ठल पवार,दुसरे महादेव पवार ,तिसरे काकासाहेब पवार,चौथे हनुमंत पवार आणि पाचवे गोविंद पवार.
ब्राम्ह्देवानी सृष्टीच्या समतोलासाठी अग्नी,पृथ्वी,जल,आकाश,वायू अशी पंचमहाभूते बनवली अगदी तशीच मल्लविद्येचा समतोल राहावा यासाठी नियतीची जणू पंचमहाभूतेच हि..!
एकेका भावाकडे निसर्गाचे एक एक चमत्कारिक गुण उतरले होते.
काकानी गावातील तालमीत कुस्ती मेहनत करत करत रानात काबाड कष्ट करून यांनी त्याकाळी कुस्ती क्षेत्रात चांगलाच दबदबा निर्माण केला.
पुढे गावात तगडी लढत मिळत नसे त्यामुळे थोरल्या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली काकासाहेबांनी कोल्हापूर चा रस्ता धरला.
कोल्हापुरात त्याकाळी जणू मल्लांचे माहेरघर असे.
जसे पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर डोके टेकवल्याशिवाय इहलोकातून मुक्ती नाही अशी धारणा आमच्या लोकांची आहे,अगदी तशीच धारणा जोवर पोराचे पाय कोल्हापूरच्या लाल मातीला लागत नाही तोवर कुस्तीला अर्थ नाही अशी कोल्हापूर बाबत पूर्वी आख्यायिका असायची.
महाराष्ट्रातील गावागावातील नवोदित मल्लांचे पाय कोल्हापुराकडे वळत असे त्यामुळे ठीकठिकाणाचे आखाडे भरून गेले असत आणि नवोदित मल्लाना प्रवेश नाकारला जात असे.
काकाना प्रवेश मिळवता आला नाही.
मात्र नशीब एका ठिकाणी अपयश देते तर लगेच संधीचा दुसरा दरवाजा उघडते.
सांगलीचे वसंतदादा कुस्ती केंद्र हे सुध्दा मल्लांचे केंद्रस्थान त्या काळी बनले होते याचे कारण तिथे असणारे कुस्ती मार्गदर्शक पै.दिनकर सूर्यवंशी होय.
दिनकरराव सुर्यवंशी म्हणजे जणू काही वडाचे भले मोठे थोरले झाड,त्याची सावली सर्वानाच मिळायची.
दिनकर सूर्यवंशी सरांनी काकांच्यातील गुण ओळखून त्याना प्रवेश दिला आणि कालांतराने त्यांच्यातील खुबी लक्षात घेऊन त्याना पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीत वस्ताद रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामान्च्याकडे जावे असे सुचवले.
झाले ,पुन्हा पेटी उचलून हे पवार घराणे पुण्याच्या रस्त्याला लागले.
पुण्यात गोकुळ वस्ताद तालीम म्हणजे त्या महावीर मल्लाची तालीम ज्याने महाबली सत्पाल नामक वादळाने एकेकाळी महाराष्ट्राला आव्हान दिले होते अश्या महाबली सत्पाल ला चारी मुंड्या चीत करून महाराष्ट्राचे नाव इतिहासात अजरामर करणारे रुस्तुम एक हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा यांची तालीम म्हणून ओळखली जायची.
काकांचा गोकुळ वस्ताद प्रवेश झाला आणि महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आणखी नवीन चेहरा मिळाला.
बिराजदार मामा म्हणजे रत्नपारखी व्यक्तिमत्व.
काका म्हणजे अस्सल हिरा….मामांच्या सारख्या रत्नपारखी वस्तादाने हळूहळू एक एक पैलू पडायला सुरुवात केली आणि बघता बघता त्या हिऱ्याला सोन्याचे कोंदण मिळाले.
कुस्ती मैदानात एखाद्या मुलाकडे पाहून मामा ओळखत असे कि हा मुलगा राज्य,राष्ट्र का अंतरराष्ट्रीय स्तरावर चालणार.
काकांचे गुण मामानी ओळखले आणि मामानी काकाना कुस्तीतील सूक्ष्म बारकावे शिकवायला प्रारंभ केला.
काकांसाठी ते स्वता बाजार करत असे.त्यांची विश्रांती ,मालिश सर्व गोष्टी काटेकोरपाने होत असत.
हे सर्व सुरु असताना काकांच्या आयुष्यात अनेक घटना घडत होत्या.
गावाकडे ३-३ वर्षे दुष्काळ असल्याने पैशाचा ओघ थांबत आसे.
आंतरराष्ट्रीय मल्ल बनायचे तर यात्रा जत्रेतील कुस्तीकडे पाठ फिरवावी लागत असे.
हि गोष्ट मामाना जाणवली आणि त्यांनी परिसरातील अनेक साखर कारखान्यांचे मानधन काकाना सुरु केले.
गोकुळ वस्ताद तालमीचे वस्ताद शामराव यादव यांनी त्यांची कायमस्वरूपी दुधाची सोय केली.
खराडी चे कुस्तीभीष्माचार्य पंढरीनाथ पठारे यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि काकाना अर्थित चणचनीतून मार्ग काढून कुस्तीकडे लक्ष देण्यास सांगितले..!
माग मात्र काकासाहेब पवार यांनी मागे पाहिलेच नाही.
हे वादळ तालुका,जिल्हा,राज्य याच्या सीमा भेदत देशात धुमाकूळ घालू लागले आणि एवढ्यावरच न थांबता अंतरराष्ट्रीय स्तरावर एकेका सुरमा मल्लांची अक्षरश फन्ना उडवू लागले…!
एक काळ असा होता की “काका पवार” हे नाव एखाद्या स्पर्धेत उच्चारले की भले भले लढवय्ये मल्ल स्पर्धेसाठी वजन न देताच जात असे…त्यांना माहिती होते की काकांशी कुस्ती म्हणजे १०-० ने पराभव.
अनेक जुने वस्ताद सांगतात की ग्रीको रोमन असो किंवा फ्रीस्टाइल…काकांचे थ्रो बघायला कुस्ती प्रेमींची तोबा गर्दी स्टेडियम वर उसळत असे.
मॅट वर कोणी खाली सापडला की पत्रावळ्या उडाल्या सारख्या त्याची अवस्था होत असे.
काकांच्या पदकांचा तक्त्याचा आलेख सतत चढता जात होता.
पाहुया त्यांच्या कुस्ती कारकिर्दीतील पदकांचा तक्ता
तक्ता पाहून तोंडात बोट जरूर जाईल…तब्बल 31 आंतरराष्ट्रीय पदके,14 राष्ट्रीय पदके..गदा,ढाली आणि सर्टिफिकेट तर अगणित…..
*वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदत तक्ता*
१९८९ ते १९९८ सलग १० वर्षे १० सुवर्णपदके
१) १९८९-पिंपरी चिंचवड -सुवर्णपदक
२) १९९०-टाटा जमशेदपूर -सुवर्णपदक
३) १९९१ -वाराणसी – सुवर्णपदक
४) १९९२–भिलवाडा राजस्थान-सुवर्णपदक
५) १९९३ सांगली सुवर्णपदक
६) १९९४ चंडीगड पंजाब -सुवर्ण
७) १९९५ दिल्ली सुवर्ण
8) १९९६ जालंधर सुवर्ण
९) १९९७-हैद्राबाद सुवर्ण
१०) १९९८ नाशिक सुवर्ण
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पदक तक्ता
३ सुवर्ण आणि एक कांस्य पदक
१) १९९७ बेंगलोर कर्नाटक सुवर्ण
२) १९९५ पुणे सुवर्ण
३) १९८७ केरळ कांस्य
४) १९९८ मणिपूर सुवर्ण
आंतरराष्ट्रीय स्पर्धांची कामगिरी
१) १९८९ – आंतरराष्ट्रीय चाम्पियनशिप बगदाद इराण सुवर्ण
२)१९९० – आंतरराष्ट्रीय चाम्पियनशिप दमासकस सिरीया रौप्य
३) १९९१- आशियायी चाम्पियानशिप तेहरान सहावा क्रमांक
४) १९९२-एशियन गेम्स बीजिंग सहभाग
५) १९९0 – फ्री आशियायी चाम्पियानशिप – पाचवा
६) १९९२-आंतरराष्ट्रीय चाम्पियनशिप तख्ती-तेहरान इराक चतुर्थ
७) १९९५-इंटरनश्णाल चाम्पियानशिप आलेक्झांडरिया इजिप्त रजत
8) १९९५ – आशियायी चाम्पियानशिप – मनिला पहिलीपाईन्स चतुर्थ
९) १९९६-तख्ती कप आशियायी चाम्पियानशिप स्ताज इराण कांस्य
१०) १९९३ आशियायी चाम्पियान शिप – हिरोशिमा जपान पाचवा
११) १९९७ -रशिया आंतरराष्ट्रीय कप रौप्य
१२) १९९६ तख्ती कप संताज इराण-कांस्यपदक
13) १९९७ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कैरो इजिप्त-रौप्य
१४) १९९८ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कैरो ग्रीस-सुवर्ण
१५) १९९८- आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा रशिया-कांस्यपदक
याशिवाय कित्येक वेळा सहभाग आहे ते या तक्त्यात नोंदवले नाही.
काकांच्या एवढ्या वादळी कुस्ती कारकिर्दीची दखल महाराष्ट्र शासनाने १९९० मध्ये घेऊन त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देवून सन्मानित केले.
त्याचबरोबर १९९८ साली भारत सरकार ने खेळाडूंच्या जीवनातील सर्वोच्क असा अर्जून पुरस्कार देवून त्यांच्या कीर्तीमुगुटात मानाचा तुरा रोवला.
भारतीय रेल्वे ने त्याना कायमस्वरूपी सेवेत घेतले.
कुस्ती निवृत्ती नंतर काका स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल नावाने तालीम स्थापन केली.
त्यांच्या पावलावर पाउल ठेवत आजच्या घडीला तिथे अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल निर्माण होत आहेत ज्यामध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता राहुल आवारे,नामदेव कोकाटे,शरद पवार,उत्कर्ष काळे यासारखे अनेक मल्ल निर्माण झाले आहेत.
चालू घडीचा महाराष्ट्राचा क्रमांक एकचा मल्ल ज्याने तब्बल 55 कुस्त्या या वर्षी एकतर्फी विजयी केल्या,असा बाहेरून आकडी डावाचा बादशहा पै.किरण भगत ,उप महाराष्ट्र केसरी विकी जाधव,कौतुक डाफळे,अतुल पाटील,ज्ञानेश्वर गोचडे असे कित्येक मल्ल काकासाहेब पवार यांनी घडवले.
MAT ची कुस्ती जितकी महत्वाची तितकीच मातीची कुस्ती टिकली पाहिजे यासाठी मातीतील तगडे मल्ल जे आज दिल्लीस्वर मल्लांशी चार हात करू शकतात असे कित्येक मल्ल निर्माण केले.
यामध्ये आवर्जून सांगावे वाटते ते विकास जाधव,कौतुक डाफळे,किरण भगत,ज्ञानेश्वर गोचडे,योगेश पवार,गोकुळ आवारे यासह अजून कित्येक जण.
केवळ चांगले मल्ल घडवून काका स्वस्थ नाही बसले तर गुणी मल्लांच्या नोकरीची व्यवस्था त्याने केली आहे.
आजवर १०० च्या वर अनेक मल्लाना कायमस्वरूपी भारतीय रेल्वे मध्ये नोकरी लावली आहे.
आज जिथे जिथे म्हणून कुस्ती मैदान असते तिथे तिथे काका पवार आणि त्यांचे बंधू गोविंद तात्या पवार हे स्वताहून हजर राहून आपल्या मल्लांचे मनोधर्य वाढवत असतात.
२०१४ च्या अहमदनगर च्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्यांच्या तब्बल १९ मल्लांनी पदकांची कमाई करून एक नवीन इतिहास रचला आहे.
2015 च्या नागपूर अधिवेशनात सुद्धा तब्बल 18 पदके याच तालमीत होती व विकी जाधव हा उप महाराष्ट्र केसरी होता.
काका मोठे पैलवान होते,त्यांनी अनेक मोठे पैलवान घडवले ही त्यांची कुस्तीची ओळख,पण एक माणूस म्हणून त्यांच्या व्यक्ती मत्वाची उंची खरोखर मोजता येणे अशक्य आहे.
मदतीसाठी हाक मागणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार नक्कीच मदत करतात.
आयुष्यात आपल्या महाराष्ट्रातील मुलानी कुस्तीमध्ये मोठमोठी पदके आणावी एवढेच स्वप्न ते सतत बघत असतात.
आज त्यांच्या तालमीत प्रवेश मिळावा म्हणून चढाओढ सुरु असते कारण स्वता काकासाहेब 4-4 तास मुलांचा सराव घेत असतात.
मुलांचा घाम पडतोच,पण वस्ताद पण ओरडून ओरडून घामाघूम झालेले असतात..!
का ?
कशासाठी ?
कोणीही जिंकलेल्या गदेची चांदी आणून देणार आहे का कोणी जिंकलेले पदक बहाल करणार आहे ?
नाही….त्याचे कारण एकच की महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले जावे व जोवर चंद्र सूर्य आहे तोवर महाराष्ट्राचे नाव कुस्ती क्षेत्रात अमर रहावे..एवढीच अपेक्षा…दुसरे काही नाही.
एवढे उत्तुंग काम करूनही कुस्तीमधील इतका दैदीप्यमान इतिहास निर्माण करणारा एक अवलिया आजही आपले जीवनमान अतिशय साध्या पद्धतीने जगताना दिसून येते.
साधी राहणी ,अगदी साध्याताला साधा माणूस त्याना सहज भेटू शकतो.
इतर vip सारखी appointment ची गरज भासत नाही.
आज काकांचा वाढदिवस.
काकांसाराखी नररत्ने हे खरे महाराष्ट्राचे भूषण आहे.
त्यांच्या कारकीर्दीचा आलेख असा बहार जावो..!
आई जगदंबा त्याना उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून अशीच मल्लविदेची सेवा घडो अशी प्रार्थना करतो.
आणि माझ्या लेखणीला विराम देतो ..!
धन्यवाद