फलटण, दि. 3 : फलटण शहर व परिसरातील महिला भाविक व भक्तांचे आराध्यदैवत तुळजाभवानी देवी (तळ्यातील देवी) मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त सुशोभिकरण व फुलांची सजावट करण्यात आली असून भाविकांची विशेषत: महिला वर्गाची देवीच्या दर्शनासाठी सकाळी व सायंकाळी गर्दी होत आहे.
फलटण येथील तुळजाभवानी मंदिर पूर्वाभिमुखी असून या मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. सुमारे 350 वर्षापूर्वीचे बांधले आहे. हे मंदिर छोटेखानी असून त्यास शिखर आहे. मुख्य मंदिरासमोर होमकुंड व दीपमाळ आहे. नवरात्रात मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि मंदिराचा मुख्य मंडप व खांब प्रवेशद्वारावर फुलांची उत्कृष्ट सजावट करण्यात आली आहे.
मुख्यमूर्तीस दररोज परंपरेनुसार वेशभूषा केली असून मुख्य मंडपानजिक भवानीमातेची प्रतिमा लावली आहे. भाविक मुख्य मूर्तीनंतर या प्रतिमेची पूजा करतात. मुख्य मंदिराचे परिसरात भाविकांना विश्रांती घेण्यासाठी दक्षिणेकडील बाजूस तात्पुरता मंडप उभारण्यात आला आहे.
यावर्षी रविवार अश्विन शु 1 शके 1941 दि. 29 सप्टेंबर रोजी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते घटस्थापना करण्यात आली. चांदीचा मुकुट असलेल्या देवीच्या मूर्तीची सजावट दररोज केली जात आहे. दर्शनरांगेची सोय तात्पुरत्या स्वरुपात दोर व कळक बांधुन करण्यात आली आहे.
फलटण शहराच्या दक्षिणेकडील भागात अधिकार गृह इमारतीनजिक माळजाई (अंबाई) देवीचे पुरातन मंदीर असून तेथेही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
वड, पिंपळ, अशोक, गुलमोहर, इंडियन कार्क, नारळ आदी वृक्षराजींनी वेढलेल्या परिसरात माळजाई मंदिर असल्याने येथे वेगळे नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर कमिटीचे चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व परिसराची स्वच्छता करण्यात आली असून मंदिर परिसरात बसण्यासाठी बाकांची सोय केली आहे. मुख्य मंदिर हेमाडपंथी असून त्यावर 25 ते 30 फूट उंचीच्या शिखराची डागडुजी व रंगरंगोटी केली आहे.
मंदिर परिसरात शिखरापर्यंत विद्युत रोषणाई केली आहे. दर्शन रांगेसाठी तात्पुरत्या स्वरुपात कळक बांधून सोय केली आहे. मंदिरासमोर प्रशस्त मंडप असल्याने हा परिसर भाविकांना आकर्षित करित आहे. या मंदिरातही मुख्य प्रवेशद्वाराचे दोन्ही बाजुस तुळजापुरचे देवीची प्रतिमा रेखाटल्या आहेत. नवीन बाके बसविली असून लायन्स क्लब फलटण अंतर्गत माळजाई उद्यान समीतीचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर व त्यांच्या सहकार्यांनी बागेतील लहान मुलांसाठीची सर्व खेळणी दुरुस्त केली आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण बागेत विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात आल्याने गेल्या काही वर्षापासून घाणीचे साम्राज्य, तुटलेली खेळणी, विद्युत प्रकाशाची सुविधा नसल्याने या बागेत फारसे कोणी फिरकत नसत केवळ देवीचे दर्शन करुन परतणारांची संख्या मोठी होती मात्र या सप्ताहात येथील बदलत्या व्यवस्थेमुळे, सुशोभीकरण व स्वच्छतेमुळे दररोज सायंकाळी महिला, वृध्द आणि मुलांची संख्या वाढू लागली आहे.
विजया दशमी दिवशी (दसरा) राजघराण्यातील मंडळी मोठ्या लवाजम्यासह परंपरागत पध्दतीने येथे शीलंगणासाठी (सिमोलंघन) येत असल्याने परिसराला यावर्षी लाभलेली झळाळी अधिक प्रेरणादायी ठरेल आणि त्यातून या बागेची अधिक सुधारणा होईल अशी अपेक्षा फलटणकरांमधून व्यक्त होत आहे.