फलटण दि. २ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित झाला असून तो चांगला व सज्जन असेल आणि जाण असणारा असेल. आपले राजकारण हे त्यागाचे असून आपण दोन दिवसांत विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे. युवा पिढीच्या भवितव्यासाठी राजकारण करावे लागणार असल्याचे विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे राजेगट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद मेळाव्यात युवकांना मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते . यावेळी आ. दिपकराव चव्हाण,जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर फलटण पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर ,फलटण नगर परिषद नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे, पंचायत समिती सभापती सौ.प्रतिभा धुमाळ, उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर महानंद डेअरी चे उपाध्यक्ष डी. के. पवार ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांची उपस्थिती होती.
१९९१ साली श्रीमंत शिवाजीराजे यांनी आम्हाला राजकारणात आणून आम्हाला फलटण तालुका सांभाळावा लागेल असे सांगितले. मात्र आता काहीजण रडीचे राजकारण करीत आहेत. विकासाचे राजकारण मागे पडत असून आपण राजकीय कारकिर्दीत दूरदृष्टी ठेवून विकासाचे राजकारण केले आणि त्याला जनतेनेही साथ दिली . राजकारण जनहितासाठी करावयाचे असते. समोर कोण कोणत्या पक्षातून उभे आहे याची चिंता नसल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर नाही तर महाऑस्कर द्यायला हवे. मला शिव्या घातल्याशिवाय यांना झोप लागत नाही. दूध डेअरी विकणाऱ्यांनी व ज्यांना पाणी यातील काही कळत नाही त्यांनी आपण मंत्रिपदासाठी पाणी विकले असे सांगून आपली पाट थोपटून घेवू नये. आमचं राजकारण त्यागाच व विकासाचे असून विकृत मनोवृत्तीची माणस एकत्र येतात तेव्हा कधीही चांगलं घडत नाही. आपल्याला एकत्र राहावे लागणार असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
कंपनी ही नोकरीसाठी असते तर दूध संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्यासाठी असते. दूध डेअरी काढली ती कशी काढली , हे सर्वाना माहीत आहे . पाच वर्षे ज्यांनी टीका केली ते भाजपात गेले . त्यांनी ८० कोटीं कर्ज कार्यकर्त्यांच्या नावावर घेतले आहे. आपणास कोणतेही पद मिळण्यासाठी निवडणूक लढवायची नाही परंतु चुकीच्या प्रवृत्तींना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपणास जिंकायची आहे . जिल्हा व तालुका सुखरूप ठेवायचा असेल तर चूक करून चालणार नाही. फलटण तालुका व जिल्ह्यासाठी आपण गेली ३० वर्षे कष्ट घेतले आहेत. हा जिल्हा सुखरूप ठेवायचा असेल तर आपला मतदार संघ सुरक्षित ठेवणे गरजेचे असून त्यांच्या हातात सातारा जिल्हा गेला तर एक वर्षात ११ तालुके संपायला वेळ लागणार नसल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले. .
नीरा – उजवा कालवा व पाण्याशी माणचा काडीमात्र संबंध नसताना नीरा – उजवा कालवा समितीवर एकाची स्वराज कारखान्याचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे. समितीवर दुसऱ्या तालुक्याचा आमदार कसा असा सवाल उपस्थित करून अशा प्रवृत्ती येथे आल्याने विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. दहशतीमुळे येथे काम करण्यास आता अधिकारी व कर्मचारी धजावत नसल्याचे श्रीमंत रामराजे यांनी सांगितले .
श्रीमंत रामराजे हे फक्त फलटण तालुक्याचे नव्हे ,तर पश्चिम महाराष्ट्राचे भगीरथ असून रामराजेंवर काहीजण टीका करतात. त्यांचा पाण्याचा संबंध फक्त कशासाठी आहे हे जनतेला माहीती आहे. तालुक्यास श्रीमंत मालोजीराजे यांच्या विचारांचा वारसा लाभला असून, हे कोणी विसरून चालणार नाही. आ . दीपक चव्हाण यांना जे मताधिक्य मिळाले त्यापेक्षा जास्त ताकदीने आता आपला उमेदवार निवडून आणावा अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
आपल्या विरोधातील काहीजण सोशल मीडियावर टीका करीत असून त्यांना उत्तर देताना आपण कमी पडणार नाही. गेल्या २५ वर्षात सुरक्षित राजकारण केले आहे. विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावी . मालोजीराजे याचा वारसा लाभलेला फलटण तालुका आहे. कुत्र्यांच्या छत्र्या जशा उगवतात तसे नेते उगवत असून आपल्या मागं एवढं भगदाड पडलंय , सगळं सील झालं आहे आता तालुक्याला सील करणार का असा सवाल उपस्थित करून तालुक्यातील काही व्यक्ती लॉटरी लागून झालेले खासदार आहेत. फलटण येथे अटीतटीची निवडणूक कधीच नव्हती आणि नाही. आम्ही घर भरण्यासाठी कधीही राजकारण केलं नाही. युवकांनी आपली ताकद एकत्र ठेवून आणि आपली ताकद मतदानातून विरोधकांना दाखवून द्या असे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.
आम्हाला राजकारण आता नवीन राहिलेले नाही काही वर्षांपूर्वी माझ्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला होता. आपण न डगमगता त्याला सामोरे गेलो . मात्र आता तालुक्याला विश्वजीतराजेंना बहाल करणार असल्याचे सांगून कोणतीही परिस्थिती आली तरी रामराजे विश्वजीतराजे यांना सांभाळून घेतील. यापुढे जशाच तसेच उत्तर दिले जाईल. येणाऱ्या काळात रामराजेंच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहन फलटण कषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
खासदारकीची निवडणूक ही नुरा कुस्ती होती असे खुले आव्हान देत. हिंमत असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या व श्रीमंत संजीवराजे यांच्या विरोधात लढून दाखवा मग बघू. आपण तालुक्यातील विकासाची चौकट मोडू देणार नाही. कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय ठेवू नका परंतु कोणी नाहक त्रास दिला तर त्याला सोडू नका ही स्व .श्रीमंत शिवाजीराजे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे. विकासाची साधने असलेली जिल्हा बँक , जिल्हा परिषद व अन्य सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोडतोड करू देणार नसल्याचा स्पष्ट इशारा श्रीमंत रघुनाथराजे यांनी दिला.
श्रीमंत रामराजे यांनी फलटण तालुका व सर्वसामान्य जनतेसाठी २५ वर्षे घेतलेले कष्ट , त्यांनी तालुक्यासाठी केलेला त्याग विसरून चालणार नाही. तालुका चुकीच्या माणसांच्या हातात न देता युवा वर्गाने राजे गटाच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, विरोधकांना अंगावर घेण्याची व तशी वेळ आलीच तर आपण सवात पुढे असू असे सांगून तालुक्यात कोणीही येईल आणि तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करील. स्वाभिमान विकू नका व कुणालाही घाबरु नका राजेगट व आम्ही तुमच्या सोबत आहे. तरुणवर्गाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार आहे . तरुणांनी त्याची बिलकुल काळजी करु नये ; मी तुमच्या सोबत आहे असे आवाहन पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित युवकांना केले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांचेही समयोचित भाषणे झाले.
प्रारंभी युवा संवाद मेळाव्यात तरुण व तरुणी यानी मनोगते व्यक्त केली. शेवटी पराग भोईट यांनी आभार मानले .
राजेगट यांच्यावतीने आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यास नगरसेवक व नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व सदस्या, तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.